म्युच्युअल फंडातून परत मिळवा आपल्या घर कर्जाचे हप्ते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
Home Loan EMI _1 &nb



गृहकर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास घर कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील, गृहनिर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का ही भीती निर्माण होते. भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृहकर्जरकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा.




आपण नोकरीला लागलो कि आपलं पहिलं स्वप्न असतं, ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच गृहकर्ज घेण्याची गरज भासतेच. काहीजण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे कि आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० टक्के इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृहकर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो.
 
बऱ्याचवेळा असे होते कि आपण तणावा खाली फक्त घराचे हप्ते भरत राहतो व आपल्याकडून आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणजेच मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी आपल्या कडून काहीच बचत होत नाही. असे होते कि २० वर्षात आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता तयार झाली मात्र तणावामुळे इतर काहीच बचत न झाल्याने इतर काही संपत्ती निर्माण करण्यात मागे पडलो. आता आपल्या उतारवयात थोडी फार संप्पती बनवण्यासाठी म्हणा किंवा आपण घरकर्जावर भरलेले व्याज परत मिळवण्याकरिता आपल्याला जीवनविमा कंपन्या व म्युच्युअल फंड मदत करतात. कसे ते आपण जाणून घेऊ.
 
गृहकर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील, गृहनिर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का ही भीती निर्माण होते. भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृहकर्जरकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा. मुदतीच्या विमामध्ये विम्याचा हप्ता खूप कमी असतो मात्र सुरक्षाकवच खूप मोठे असते. आपल्याला काहीवाईट झालेतरी आपल्या पश्चात विमाकंपनी आपल्या गृहकर्ज हप्त्यांची काळजी घेईल तसेच उर्वरित विमारकमेतून आपल्या कुटुंबाच्या इतर घरखर्चाची व्यवस्था होऊन जाईल.
 
आता आपण पाहू म्युच्युअल फंड कसे आपल्याला मदत करतील. समझा आपण २५ लाखाचे २० वर्ष मुदतीचे कर्ज घेतले जे आपल्याला गृहनिर्माण कर्ज कंपनीने ८.२० टक्के व्याजाने दिले. आपण आपला मासिक हप्ता पहिला तर तो साधारण रु २१,२२३ असेल. आता आपण पुढील २० वर्षात गृहनिर्माण कर्जकंपनीला मुद्दलाचे रु.२५ लाख व व्याजाचे रु. १३ लाख असे एकूण रु. ३८ लाख परत करणार.
 
आपण काय करायचे तर आपला जो गृहकर्जाचा हप्ता आहे त्याच्या १० टक्के म्हणजेच फक्त रु २,१०० ची इक्विटी म्युच्युअल फंडात एस आईपी चालू करायची व ती घर कर्जाची मुदत संपेपर्यंत म्हणजेच पुढील २० वर्ष चालू ठेवायची. म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास पहिला तर इक्विटी फंडातील एसआईपीने अगदी १५ टक्के ते १८ टक्के किंवा त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपण जरी येणाऱ्या काळात मुद्दाम कमी असा १२ टक्के परतावा गृहीत धरला तरी आपल्या छोट्याशा रु. २,१००च्या एसआईपीची रक्कम २० वर्षात वाढून रु १९ लाख होऊ शकते. म्हणजेच आपल्याला गृहकर्जावर भरलेले व्याज परत मिळवल्याचे समाधान व आपल्या हाती काही संपत्ती निर्माण करू शकल्याचे अधिक समाधान. दीर्घकालीन एसआईपीमध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा अधिक होतो.
 
समझा आपण आपले गृहकर्ज २० वर्ष मुदतीचे केले तर आपला गृहकर्जाचा मासिक हप्ता साधारण रु. १९,६३८ होईल, आपण आपली रु. २१०० ची एसआईपी २५ वर्ष चालू ठेवली तर एसआईपीतील वाढ रु. ३५ लाख होईल. म्हणजेच गृहकर्जावरील मुद्दल व व्याज दोन्ही आपण परत मिळवू शकतो. तसेच आपल्या उतार वयात चांगली संपत्तीही निर्माण झालेली असेल.
 
आपण जर का शिस्तबद्ध पद्धतीने थोडा आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला म्हणजेच, आपले उत्पन्न हे दरवर्षी वाढत असते त्या प्रमाणात जर आपण एसआईपीची रक्कमही वाढवली तर आजकाल म्युच्युअल फंड आपल्याला स्टेपअप एसआईपीची सेवा देतात. रु २१००ने चालू केलेली एसआईपी आपण दरवर्षी ठराविक रकमेने वाढवू शकतो. जर आपण आपली एसआईपीची रक्कम दरवर्षी किमान रु ५०० ने वाढविली आणि पुढील २० वर्षात म्युच्युअल फंडाचा १२ टक्के परतावा गृहीत धरला तर आपली एसआईपीची रक्कम वाढून रु. ५० लाख होऊ शकते. म्हणजेच मुलांचे उच्चशिक्षण, लग्न, निवृत्ती नियोजन अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली संपत्ती निर्माण केल्याचे समाधान.
 
इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे कि आपला देश जेव्हा आर्थिक महासत्ता होईल त्यानंतर मिळणार परतावा हा थोडा कमी होईल. त्यामुळे वरील आकडेवारी फक्त ढोबळ अंदाज बांधण्यासाठी वापरावी. आपल्या आर्थिक सल्लागाराकडून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार व्यवस्थित नियोजन करून घ्यावे. आपले स्वतःचे तणावमुक्त गृहकर्जाने, मालकी हक्काच्या घराचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद !

 
- निलेश तावडे
९३२४५४३८३२ , [email protected]


(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)







@@AUTHORINFO_V1@@