नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा अध्यक्षपदावरून मतभेद सुरु झाले आहे. या पराभवासाठी दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरले होते. याचे समर्थन करत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे अशी मागणी काँग्रेस वरिष्ठांकडे केली आहे.
संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ थरूर यांनी ट्वीट केले की, 'संदीप दीक्षित जे म्हणाले ते देशभरातील डझनभर नेते व कार्यकर्ते खासगीरित्या सांगत आहेत. यातील बरेच नेते पक्षात सध्या जबाबदार पदे भूषवित आहेत. कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी ही काँग्रेस कार्यकारिणीला विनंती आहे.'
तसेच या निवडणुकीत मतदान कोण करणार याबाबतची स्पष्टता करताना ते म्हणतात, ‘काही जण म्हणतात कुणी आणि कशासाठी मतदान करावे. अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या देशभरातील १० हजार सदस्यांमार्फत मतदान व्हावे हे मी आठ महिन्यांपूर्वी सांगितले होते. समितीमधील निर्वाचित सदस्यांसाठी हा मतदानाचा अधिकार असावा’,असे शशी थरुर म्हणाले.
संदीप दीक्षित यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "इतके महिने झाले तरी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते नवीन अध्यक्ष नियुक्त करू शकले नाहीत. यामागचे कारण असे आहे की मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल हा विचार करण्यास ते सर्व घाबरतात." ते पुढे म्हणाले होते की, कॉंग्रेसमध्ये अनुभवी नेत्यांची कमतरता नाही. आताही कॉंग्रेसमध्ये किमान ६ ते ८ नेते आहेत जे अध्यक्ष बनण्यासाठी सक्षम असून पक्षाचे नेतृत्व करू शकतात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करताना ते म्हणाले की, कधीकधी तुम्हाला निष्क्रियता हवी असते, कारण आपणास काहीही घडू नये असे वाटत असते.