बारामती ते बाबरमती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |


agralekh_1  H x

 


हिंदू, हिंदुत्वाला लाथाडायचे आणि गठ्ठा मतांसाठी मुस्लिमांना जवळ करायचे धोरण शरद पवारांनी नेहमीच अवलंबले. 'अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट तर मशिदीसाठी का नाही,' या विधानातूनही शरद पवारांनी तेच केले आणि 'बारामती ते बाबरमती' असे आपले प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाल्याचे दाखवून दिले.


"राम मंदिरासाठी ट्रस्ट तर मशिदीसाठी का नाही? देश तर सर्वांचा, सर्वांसाठी आहे," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच लखनौ येथे केले. नावात 'राष्ट्रवादी' असले तरी राष्ट्रव्यापी सोडाच, महाराष्ट्रव्यापी होता होताही दमछाक होणाऱ्या आपल्या पक्षाच्या उत्तर प्रदेश राज्यस्तरीय संमेलनात ते बोलत होते. वस्तुतः अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिर निर्मितीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा आणि मुस्लीम पक्षाला पाच एकर जागा देण्याचा आदेश गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावा आणि तिची उभारणी सरकारनियुक्त मंडळींनी करावी, असे अजिबात सांगितले नव्हते. परंतु, स्वतःला संविधानिक आणि लोकशाही व्यवस्थेचे पाईक म्हणविणाऱ्या शरद पवारांसारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत नेत्याला न्यायालयीन भाषा समजत नसावी किंवा 'बारामती ते बाबरमती' असे आपले प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाल्याचे दाखवून देण्यासाठी शरद पवारांनी मशीद-बांधणी ट्रस्टची मागणी केली असावी. आता शरद पवारांनी मागणी केलीच आहे, तर आणखीही काही मागण्या पुढे रेटायला हरकत नाही; नव्हे त्यासाठी त्यांनी मुस्लिमांत फिरून जनजागृतीही करावी. कारण, सध्यातरी देशातील सर्वच मशिदी-दर्गा वगैरेंवर वक्फ बोर्डाचे नियंत्रण असते. वक्फ बोर्डाच्या माध्यमातूनच त्या त्या मशिदी-दर्ग्यातला कारभार चालतो. म्हणूनच पवारांनी देशातील सर्वच मशिदी व दर्ग्यांवर सरकारनियंत्रित ट्रस्ट असावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करत सर्वोच्च न्यायालयात तशी याचिकाही दाखल करावी. रमजानच्या काळात इफ्तार पार्ट्यांना जाऊन आणि हज हाऊस बांधून शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुस्लिमांशी तयार झालेले मधुर संबंध तर जगजाहीर आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील मुस्लीम बांधवही पवारांनी मागणी केलेल्या मशिदी व दर्ग्यांच्या राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा देतील.

 

विशेष म्हणजे शरद पवारांचा उल्लेख त्यांचे समर्थक नेहमी 'भावी पंतप्रधान' असा करतात. ही निवडणूक नाही तर पुढली निवडणूक, पवार नेहमीच 'भावी पंतप्रधान' असतात. शिवाय पवारांच्या काही खुशमस्कऱ्यांच्या मते ते 'देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान'ही असतात. परंतु, सध्यातरी पवारांना पंतप्रधानपदी विराजमान होण्याची कुठलीही संधी नाही. म्हणूनच देशातील सर्वच मशिदी व दर्ग्यांसाठी ट्रस्टची स्थापना करून शरद पवारांना त्याचे प्रमुख नेमावे, जेणेकरून पवारांची पंतप्रधानपदाची दुधाची तहान ताकावर भागेल आणि संपूर्ण देशभरात त्यांचे हार-तुऱ्यांनी जंगी स्वागतही होत राहिल. शरद पवारांच्या ताज्या विधानातून आणखी काही गोष्टी उघड होतात, त्यापैकी एक म्हणजे सत्तेत परत येताच त्यांचा मूळ स्वभाव जागा झाला. हिंदू, हिंदुत्वाला लाथाडायचे आणि गठ्ठा मतांसाठी मुस्लिमांना जवळ करायचे धोरण पवारांनी नेहमीच अवलंबले. कदाचित असल्या वागण्यामुळेच मागे राष्ट्रीय वारकरी परिषदेने शरद पवारांना 'हिंदूविरोधी' म्हणून जाहीर केले. उल्लेखनीय म्हणजे, पवारांनी आपल्याला दिलेले विशेषण योग्यच असल्याचे सिद्ध करण्याचा चंग बांधत लगेच मशिदीसाठी ट्रस्ट का नाही, म्हणून आरोळी ठोकली. पण, स्वतःला 'जाणता राजा' म्हणवून घेणाऱ्या याच पवारांनी कधी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची काळजी वाहिल्याचे दिसले नाही. वर्षानुवर्षे सत्ता गाजवूनही वारकऱ्यांच्या मागण्या त्यांनी कधी पुऱ्या केल्या नाहीत. पंढरपुरातील 'वारकरी भवन' बांधायलाही देवेंद्र फडणवीसांना सत्तेत यावे लागले आणि विठ्ठलभक्तांची ती एक मागणी पूर्ण झाली. तथापि, शरद पवार नेहमी असेच का बोलतात, वागतात? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कितीही धर्मनिरपेक्षतेचे, पुरोगामित्वाचे लेबल लावून प्रचार करण्याचे काम शरद पवारांनी केले तरी तो पक्ष तसा कधीच नव्हता. पक्षातल्याच मूळच्या मराठा जातीयवादी किंवा वर्चस्ववादी लोकांमुळे दलित, मुस्लीम आणि ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले. आता त्याच लोकांना पुन्हा पक्षाकडे आणण्यासाठी आणि त्यातून आपली मतांची झोळी भरून घेण्यासाठी शरद पवारांकडून हा 'चाटू आनंदे' चा खेळ सुरू झाल्याचे दिसते. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमातील हिंसाचार व 'एनआयए' तपासाच्या संदर्भाने पवारांचा चाललेला थयथयाट हेदेखील त्याचेच निदर्शक. मुस्लिमांना, दलितांना सुखावणारी भावनिक विधाने, आवाहने करायची आणि स्वतःची सत्तेची भूक भागवायची, असा हा पवारांचा खाक्या. मात्र, या सगळ्यातून मुस्लीम वा दलित समाज खरेच विकसित व्हावा, त्यांचे मागासलेपण दूर होऊन प्रगतीचा उजेड पडावा, यासाठी पवारांनी कष्ट घेतल्याचे कधी दिसले नाही.

 

शरद पवारांचे मित्र आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना करणाऱ्या हमीद दलवाई यांनी मुस्लिमांतील मागासलेपण दूर व्हावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मुस्लिमांतील तिहेरी तलाक, महिलांना पोटगी नाकारणे, यांसारख्या अनेक अनिष्ट प्रथांविरोधात हमीद दलवाईंनी चळवळ-आंदोलने केली. शरद पवारांनी मात्र आपल्या मित्राच्या म्हणजेच दलवाईंच्या या सामाजिक सुधारणांच्या कामाला कधीच हातभार लावला नाही, मदत केली नाही वा त्यात भाग घेतला नाही. तथापि, दलवाईंशी असलेली मैत्री जगाला दाखवून देत पवारांनी स्वतःचे पुरोगामित्व मात्र चांगलेच मिरवून घेतले. यातूनच पवारांच्या राजकारणातली नीतिमत्ता आणि नैतिकता दिसून येते. शरद पवारांनी लखनौत असेही म्हटले की, "देश तर सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे." म्हणूनच एका श्रीराम मंदिराच्या उभारणीवरून पोटशूळ उठणाऱ्या पवारांना त्यांच्याच विधानाच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावेसे वाटतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, "देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा," असे वक्तव्य केले होते. तेव्हा मात्र मनमोहन सिंगांच्या खांद्याला खांदा लावून मंत्रिमंडळात सामील झालेल्या पवारांना देश सर्वांचा आणि सर्वांसाठी असल्याची आठवण झाली नव्हती. वर्षानुवर्षे सरकारी पैशाच्या मदतीवर शेकडो मुस्लीमधर्मीय हजयात्रेला जात राहिले. परंतु, तेव्हाही पवारांना देश सर्वांचा आणि सर्वांसाठी असल्याचे बोलायला सुचले नव्हते. ही केवळ वानगीदाखल दिलेली उदाहरणे, अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्यात देश तर सर्वांचा आणि सर्वांसाठी हे तत्त्व राबवायला हवे होते. पण, ना ते काँग्रेसने केले ना काँग्रेसमध्ये असताना वा बाहेर पडून वेगळी चूल मांडल्यानंतर पवारांनी केले. अर्थात आपल्या धर्मनिरपेक्षतेचा खुंटा बळकट करण्यासाठी देशातल्या राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींना 'देश सर्वांचा' पासून फारकत घेत 'देश केवळ मुस्लिमांचा', असे म्हणत हात जोडावेच लागतात. तसे न केले तर त्यांची धर्मनिरपेक्षता-पुरोगामित्व धोक्यात येते आणि हिंदूहिताची गोष्ट केली तर त्यांना 'सांप्रदायिक' ठरवले जाते, पवारही त्या सगळ्यातलेच एक. म्हणूनच ते असली विधाने करताना दिसतात. सोबतच शरद पवारांचे आताचे विधान शिवसेनेबरोबर जाऊनही आपली धर्मनिरपेक्षता जशीच्या तशी असल्याचे दाखवून देण्यासाठीही आहे. आमच्याशी पाट लावला तर तुम्हीही मशिदीच्या नावाने गळा काढून दाखवावा, असे पवारांनी शिवसेनेला केलेले हे आवाहनही ठरते. कारण, संजय राऊतांनी जाहीर केलेल्या उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीखही जवळ येतेय, तेव्हा पवारांनी मशीद-मशीद करत ठाकरेंना संकेत देणे साहजिकच!

 
 
@@AUTHORINFO_V1@@