‘कोरोना’ लस, भारत आणि जग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020   
Total Views |

pfizer_1  H x W
 
वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाला प्रतिबंध करणारी लस आगामी काही आठवड्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळे भारतीयांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. कोरोनावर लस यावी यासाठी जागतिक व्यासपीठावरदेखील यापूर्वी अहोरात्र प्रयत्न करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनाही अधूनमधून कोरोनावाढीचे संकेत देत असते. २०२० या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने कोरोनाच्या सावटाखाली गेले. कोरोनाचा प्रभाव नियंत्रित आणण्यासाठी लस हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.
 
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जगातील अनेक देश हे लसनिर्मितीसाठी प्रयत्न करू लागले. कोणत्याही आजारावरील लसनिर्मितीच्या प्रक्रियेला साधारण दशकभराचा कालावधी हा लोटत असतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता बघता लसनिर्मितीची प्रक्रिया विद्युतवेगाने पार पडत असल्याचे दिसून येत आहे. जगातील ‘फायझर’, ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोविशिल्ड’, ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’ अशा विविध लसींची निर्मिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून त्यांची परिणामकारकताही सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
अमेरिकेतली ‘फायझर’ ही फार्मा कंपनी जर्मनीच्या बायोटेक कंपनीसह कोरोनाविरोधी लसींची निर्मिती सध्या करत आहे. या लसींची परिणामकारकता ९५ टक्के असल्याचे या दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये लसीची परिणामकारकता ९४ टक्के आहे. ‘मॉडर्ना’च्या लसीनेही ९४.५ टक्के परिणामकारकता दाखवली आहे. मात्र, लसनिर्मितीचं काम वेगाने होण्यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बँसल यांनी म्हटले आहे. तसेच लसीबाबत अधिक संशोधन होण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच ‘भारत बायोटेक’ आणि ‘आयसीएमआर’च्या सहकार्याने तयार होत असलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या पहिल्या दोन चाचण्यांचे निकाल सकारात्मक आहेत.
 
 
कंपनीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. लसीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्यांना सुरूवात झाली असून २८,८०० लोकांवर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर या लसीची परिणामकारकता तपासली जाईल. तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्यांच्या निकालांबाबत उत्सुकता आहे. ‘ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या लसीनेही चांगले परिणाम दाखवले आहेत. ही लस ज्येष्ठांवरही चांगलीच परिणामकारक ठरत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. येत्या जानेवारीपासून ‘सीरम इन्स्टिट्यूट’ दर महिन्याला पाच-सहा लाख कोटी डोस तयार करणार आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतर लसीचा पुरवठा सुरू होणार आहे.
 
 
भारत आणि ब्राझीलसह अमेरिका, जपान, दक्षिण आफ्रिका, केनिया आणि लॅटिन अमेरिका आदी देशांमध्ये सध्या कोरोना लसीच्या चाचण्या सुरु आहेत. यात ६० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. याचबरोबर ’झायडस कॅडिला’ या कंपनीची लसही भारतात तयार होत आहे. जगाच्या पातळीवर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीनेही चांगली परिणामकारकता दाखवली आहे. ही लस ९५ टक्के परिणामकारक ठरत असल्याची बाब समोर आली आहे. भारतातही या लसीच्या मानवी चाचण्या होत आहेत. या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातल्या चाचणीत ४० हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
 
 
या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत. लस घेणार्‍या कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ही लस स्वस्तात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. ‘फायझर’ आपली लस किती प्रमाणात उपलब्ध करू शकते, याची चाचपणी सुरू आहे. तसेच, भारतात मानवी चाचण्या झालेली लस आपल्या नागरिकांना द्यायची, अशी भारत सरकारची भूमिका आहे. ‘फायझर’च्या मानवी चाचण्या भारतात झालेल्या नाहीत. त्यामुळे ‘फायझर’ भारतीय नागरिकांसाठी योग्य ठरेल किंवा नाही, हा ही एक प्रश्न आहेच.
 
त्यातच, फ्रान्स येथे असलेल्या जागतिक सुरक्षा यंत्रणा ‘इंटरपोल’ने कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक पातळीवरील काही गुन्हेगार बनावट लस बाजारात आणण्याचा तसेच लसीचा साठा करण्याचा धोका ‘इंटरपोल’ने व्यक्त केला आहे. लसनिर्मिती प्रकियेत जागासह भारताने दाखवलेली शीघ्रता ही नक्कीच आश्वासक असून ‘इंटरपोल’च्या इशार्‍यावरदेखील भारतासह जगातील इतर राष्ट्रे लवकरच मार्ग काढतील, हीच आशा आहे.




@@AUTHORINFO_V1@@