पुणे : कोरोनानंतर आता भारतात २० लोकांना ब्रिटेनमधील नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. असे असताना ब्रिटेनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. सर्वांचा शोध घेतला जात असून ही बाब चिंतादायक असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापौर मोहोळ यांनी यावेळी सांगितले की, "ब्रिटेनहून मुंबई आणि त्यानंतर पुण्यात येणार्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क तपशील उपलब्ध नाहीत. हे लोक गेल्या १५ दिवसात पुण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेची अनेक पथके सातत्याने त्यांचा शोध घेत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडूनही मदत घेण्यात आली आहे. त्यांची माहिती नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यांनी लोकांना पुढे येऊन तपास करून घेण्याचे आवाहन केले आहे. महापौरांनी लोकांना त्यांच्या शेजारी येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
पुणे महानगरपालिकेने जारी केले हेल्पलाईन नंबर
पुणे महानगरपालिकेच्या निर्देशानुसार, मध्य पूर्व आणि युरोपियन देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना शहराजवळील हॉटेलमध्ये सात दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य आहे. निर्देशानुसार प्रवाशात कोरोना विषाणू आढळल्यास त्याला थेट पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. मागील 15 दिवसांत ब्रिटेनमधून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांना ०२०- २५५०६८००/०१/०२/०३ या पीएमसीच्या हेल्प डेस्ककडे रिपोर्ट करणे अनिवार्य केले आहे.
देशात ब्रिटेनमधील जास्त धोकादायक नव्या कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांची संख्या वाढून २०वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. मंगळवारीच यापैकी ६ लोक नवीन कोरोना संसर्गामुळे पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले. दरम्यान पुणे, हैदराबाद आणि भुवनेश्वरमध्ये ब्रिटेनहून परतलेले अनेक लोक बेपत्ता आहेत.