नववर्ष स्वागताला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

2021_1  H x W:
 
 
 
 
नववर्षाच्या निमित्ताने जमाखर्चाचे हिशेब करताना व्यक्तिगत विचार न करता, ज्या समाजाचे आपण एक अंग आहोत त्या समाजाचा, देशाचा विचार करणे अगत्याचे आहे. थेंब-थेंब पावसानेच नद्या, तलाव, समुद्र प्रवाहित होतात. प्रत्येक थेंबाला सारखेच महत्त्व असते. केवळ शहरे ‘स्मार्ट’ झाल्याने देश ‘स्मार्ट’ होत नाही. खेड्यांचे, छोट्यामोठ्या गावांचेही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना जास्त महत्त्व आहे.
 
जुन्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचे स्वागत करताना जमा-खर्चाचा हिशोब मांडावा, असे म्हणतात. म्हणजे, आपण कमावले काय, गमावले काय, याचे चिंतन करायचे, आपणच आपल्याला तपासायचे. काय चुकले? का चुकले? असे प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांचे उत्तर शोधायचे, त्यानुसार आपले आपणच सुधारायचे. समजायला लागले की, आपणच आपली उत्तरे शोधायची असतात. कारण, आपल्या प्रश्नांची उत्तरे दुसर्‍याजवळ नसतात. त्यांच्या जवळ अनुभव असतो. थोडेफार ज्ञानही असतेच. पण, ते सगळे जसेच्या तसे आपल्याला उपयोगी पडेलच असे नाही.
 
 
कारण, परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे आयुष्य, वेगवेगळे भविष्य दिले आहे. एक दुसर्‍यासारखा नसतो. आपले वर्तमान, आपले भविष्य हे कुणाशीही मिळते जुळते नसते. त्यामुळे आपणच आपला मार्ग शोधावा, हे बरे. या प्रक्रियेमुळे सगळी जबाबदारी आपली आपल्यावरच येते. आपण दुसर्‍याला विचारले, दुसर्‍याचे ऐकले की, पुढे जे काही बरे-वाईट घडेल त्याची जबाबदारी आपण दुसर्‍यावर ढकलून मोकळे होतो. हे काही खरे नाही. आपल्या कृतीसाठी, आपल्या निर्णयासाठी, त्याच्या संभाव्य परिणामांसाठी आपणच जबाबदार असले पाहिजे.
 
हा जमाखर्च लिहिताना एक भान ठेवणे गरजेचे. केवळ आपण आपलाच एकट्याचाच विचार करुन चालणार नाही. ज्या समाजात आपण राहतो, ज्या प्रांतात, देशात आपण राहतो, त्याचाच आपण एक अंश असतो. अविभाज्य भाग असतो. त्यामुळे आपले आयुष्य, आपले भविष्य, आपले वर्तमान हे अवती-भवतीच्या परिस्थितीवर, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून असते.
 
 
ही अवती-भवतीची परिस्थितीच आपल्याला घडवत असते. म्हणजे आपण जे म्हणतो की, योग्यता असूनही यश मिळत नाही. आपल्या कर्तृत्वाची कदर केली जात नाही. गुणवत्तेला वाव मिळत नाही. झालेच तर नशीब साथ देत नाही, या सगळ्या तक्रारींमागे आपल्या अवतीभवतीच्या आसमंताचा कार्यकारणभाव कारणीभूत असतो.
 
 
याचा अर्थ असा की, अवतीभवतीचे वातावरण स्वच्छ राहिले, तर आपणही निरोगी असू. अवतीभवतीची मंडळी सचोटीची, प्रामाणिक असली, तर आपणही तसे प्रयत्न करु. अवतीभवती गुणवत्तेसाठी स्पर्धा, धडपड सुरु असेल, तर आपणही त्या धडपडीच्या जत्रेत सामील होवू. पण, अवतीभवतीचे वातावरण असे प्रोत्साही, पोषक, गुणवर्धक आहे का? हा खरा प्रश्न आहे.
 
आज फक्त वातावरणातच प्रदूषण नाही, तर ते समाजमनातदेखील आहे. आपल्याला नियंत्रित (गव्हर्न) करणार्‍या सरकारातदेखील आहे. या सरकारला नियंत्रित करणार्‍या राजकारणातदेखील आहे. या वेगवेगळ्या प्रदूषणांचा आपल्यावर, स्वास्थ्यावर (शारीरिकच नव्हे, मानसिकदेखील) परिणाम होणे स्वाभाविक आहे. एक-दोन उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल.


आजकाल महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उंचीची नको तितकी चर्चा चालली आहे. गुजरातमध्ये सरदार पटेलांच्या पुतळ्याने जागतिक उंचीचा विक्रम केल्याबरोबर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवरुन वाद सुरु होतो. आंध्र प्रदेशचे विधान भवन हे सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा वरचढ असणार अशाही बातम्या येतात. जे पुतळ्यांचे तेच स्मारकांचे. कुणाचेही स्मारक छोटे असून चालत नाही. ते भव्य नव्हे, अतिभव्यच हवे. या पुतळ्यांपासून, या स्मारकांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असा दावा केला जातो. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक, राजकीय पुढार्‍यांचे लाखो पुतळे निश्चितच असतील. पण या पुतळ्यांच्या ‘दर्शनाने’ किती युवकांनी प्रेरणा घेतली, त्या-त्या पुढार्‍याचा आदर्श समोर ठेवून किती जणांनी भवितव्याची वाटचाल केली, त्यांच्यासारखे योगदान दिले हा सारा संशोधनाचाच विषय!
 
 
प्रेरणाही पुतळ्यांच्या दर्शनाने किंवा स्मारकांना भेटी दिल्याने मिळत नाही. त्या-त्या क्षणांपुरते आपण मोहित, प्रभावित होतो, हे खरे. पण हा प्रभाव तेवढ्यापुरताच (दर्शनाच्या कालावधीपुरताच) मर्यादित असतो. प्रेरणा मिळाली असे केव्हा समजायचे? त्या-त्या महान व्यक्तींचे विचार आपण आचारात आणले तरच... ते विचार, ते तत्त्वज्ञान आजच्या वर्तमानाच्या सामाजिक संदर्भात कसे आत्मसात करता येतील, कसे पुढे नेता येतील याचा विचार केला त्यावर चिंतन, मनन, अध्ययन केले तरच त्यासाठी शिवचरित्र वाचावे लागेल. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र लिखाणाचे खंड वाचावे लागतील. त्यासाठी महात्मा गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ समजून घ्यावे लागतील, सावरकरांचे ‘काळे पाणी’, ‘माझी जन्मठेप’, नेहरुंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया...’ असे बरेच काही खोलात जाऊन वाचावे, अभ्यासावे लागेल. (दिलेली यादी प्रातिनिधिक, अपुरी आहे हे ध्यानात घ्यावे.)
 
 
 
आपण आपल्या भविष्याच्या प्रवासाचे नियोजन करताना या सर्व ऐतिहासिक, राजकीय पुढार्‍यांचे जीवन, त्यांचा खडतर प्रवास, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांना पडलेले प्रश्न, त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यांची वैचारिक जडणघडण, विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, हे सगळे सगळे अभ्यासावे लागेल. प्रेरणा या अभ्यासातून, चिंतन-मननातून खडतर परिश्रमातून मिळेल. देशाची उंची जास्त महत्त्वाची. ती उंची तुमच्या आमच्या चारित्र्याच्या, बुद्धिमत्तेच्या उंचीवर अवलंबून असणार. पुतळे किती उंच आहेत किंवा स्मारके किती भव्य आहेत, त्यावर नव्हे. आपल्याला जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. समाजाला भेडसावणारे कितीतरी प्रश्न आहेत, आपल्याच अवतीभवती विखुरलेले शेतकर्‍यांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, पाण्याच्या नियोजनाचे प्रश्न, स्वच्छ इंधनाचे प्रश्न, शिक्षण-आरोग्याचे प्रश्न...
 
 
अवतीभवती समस्यांची रांगच रांग आहे. आपण म्हणा, सरकार म्हणा वैयक्तिक, सामाजिक विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी सत्य वेगळेच आहे. कारण, एकीकडे आपण खूप विकास झाला, प्रगतीची घोडदौड चालली आहे, असे म्हणतो अन् दुसरीकडे समाजात मागासलेल्या वर्गांची संख्या वाढतेच आहे, असे सर्वेक्षण करतो. आपल्याकडे आरक्षण हे सामाजिक आर्थिक मागासलेपणाशी संबंधित आहे. पूर्वी ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित होती. आता प्रत्येक ‘वर्ग’ मागासलेपणाचा दावा करतोय. त्यामुळे ही टक्केवारी ६०-७० पर्यंत पोहोचतेय. ज्या देशात ६०-७० टक्के जनता आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेली आहे, त्या देशाला ‘प्रगत’ कसे म्हणायचे? विकास झाला असे कसे म्हणायचे? हे गणित आपण नीट समजून घेतले पाहिजे.
 
नववर्षांच्या निमित्ताने जमाखर्चाचे हिशेब करताना व्यक्तिगत विचार न करता, ज्या समाजाचे आपण एक अंग आहोत त्या समाजाचा, देशाचा विचार करणे अगत्याचे आहे. थेंब-थेंब पावसानेच नद्या, तलाव, समुद्र प्रवाहित होतात. प्रत्येक थेंबाला सारखेच महत्त्व असते. केवळ शहरे ‘स्मार्ट’ झाल्याने देश ‘स्मार्ट’ होत नाही. खेड्यांचे, छोट्यामोठ्या गावांचेही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना जास्त महत्त्व आहे. ज्यांच्या जवळ आधीच भरपूर आहे त्यांना आणखीन मिळत गेले, तर तो विकास नव्हे. ज्यांच्याजवळ काहीही नाही त्यांना थोडेफार मिळाले, त्यांचे प्रश्न सुटले, ते वाहत्या प्रवाहात सामील झाले, तर तो खरा विकास. त्या विकासाच्या जमाखर्चासाठी फक्त सरकारवर अवलंबून चालणार नाही. आपल्याला प्रत्येकाला अंकमोड करावी लागेल. त्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवसासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही. चला, कामाला लागूया आजच आताच...!
 
- डॉ. विजय पांढरीपांडे
@@AUTHORINFO_V1@@