
जळगाव : सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावली असून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याऐवजी चिंताग्रस्त केले आहे, असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपने आक्रमक पवित्र घेतला असून आता त्यासाठी भाजप नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराच गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
दरम्यान बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू असे म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केले आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यात सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.”
त्याचबरोबर मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी पंकजा मुंडे आंदोलनाला बसल्या होत्या त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वीज, पाणी यांसारख्या स्थानिक मागण्या वेळेवर पूर्ण न झाल्यास या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल असा इशाराच गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.