नवी दिल्ली : नुकतेच पाकिस्तानमध्ये आशियाई क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार नाही अशी माहिती आशियाई क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली होती. बीसीसीआयच्या तीव्र निषेधानंतर हे पाऊल उचलले होते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या बातमीचे खंडन केले आहे. याउलट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयलाच इशारा दिला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात येणार नसेल तर, २०२१मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी टी-२० स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ भाग घेणार नाही." असा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे हे प्रकरण?
बीसीसीआयच्या तीव्र निषेधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशनने पाकिस्तानकडून आशिया चषक २०२० स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. आधीच्या आशिया कपच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, आता ती स्पर्धा दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी एका देशात आयोजित करण्याचा विचार करण्यात येणार होता. बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचेही घोषणादेखील केली होती. आता यावर आयसीसी आणि आशियाई क्रिकेट असोसिएशन काय भूमिका घेते यावर लक्ष असणार आहे.