मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाले असून मेट्रो सेवेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबईत पंतप्रधान तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करणार आहेत. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे ४२ किलोमीटरने वाढणार आहे.
यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-१० वरील ९.२ किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-११ वरील १२.७ किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-१२ वरील २०.७ किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
पंतप्रधान अद्ययावत मेट्रो भवनचे भूमीपूजनही करणार आहेत. ही ३२ मजली इमारत असून ३४० किलोमीटर अंतराच्या १४ मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. पंतप्रधान कांदिवली पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन ते करतील. महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन पंतप्रधान करणार आहेत.
प्रत्येक मुंबईकरांसाठी सुरक्षित, जलद आणि उत्तम प्रवास
देणे हा या मेट्रो बांधणीचा महत्वाचा उद्देश आहे. या मेट्रोच्या झाल्यामुळे
मुंबईकरांचा काही तासांचा प्रवास आता काही मिनिटांमध्येच होणे शक्य होणार आहे. या
मेट्रो मार्गांमुळे इंधन आणि वेळेची बचत होईल तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी
व्हायला मदत होईल.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-१० कॉरिडॉर
९.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर ४ उन्नत स्थानकं असतील
मोघरपाडा इथे कार डेपो
गायमुख (मेट्रो-४ A) आणि दहिसर (मेट्रो-९) येथे मार्ग बदलता येणे शक्य
दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये २१.६२ लाख
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-११ कॅरिडॉर
१२.८ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर १० स्थानकं (८ भूमीगत, २ उन्नत)
मोघरपाडा/आणिक बस आगार येथे कार डेपो
सीएसएमटी, सीएसएमटी (मेट्रो-३), शिवडी (हार्बर रेल्वे), वडाळा (मेट्रो-४) आणि भक्ती पार्क (मोनो रेल) येथे मार्ग बदलणे शक्य
दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- २०३१ मध्ये १६.९० लाख
कल्याण ते तळोजा मेट्रो-१२ कॅरिडॉर
२०.७ किलोमीटरची ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असून त्यावर १७ स्थानकं असतील
पिसावे येथे कार डेपो
एपीएमसी मार्केट, कल्याण (मेट्रो-५) येथे मार्ग बदलणे शक्य
दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- २०३१ मध्ये २.६ लाख
मेट्रो भवन
हरित भवन वैशिष्ट्यासह अद्ययावत परिचालन नियंत्रण केंद्र
हे ३२ मजली केंद्र ३३७ किलोमीटर १४ मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल
२०,३८७ चौरस मीटर भूखंडावर हे बांधण्यात येईल
१,१४,०८८ चौरस मीटर बांधकाम योग्य क्षेत्र
यापैकी २४,२९३ चौरस मीटर परिचालन नियंत्रण केंद्रासाठी राखीव
९,६२४ चौरस मीटर मेट्रो प्रशिक्षण संस्थेसाठी
८०,१७१ चौरस मीटर मेट्रोसंबंधी तांत्रिक कार्यालयांसाठी
कार्यादेश तारखेपासून ३६ महिन्यात प्रकल्प पूर्ण केला जाणार
बाणडोंगरी मेट्रो स्थानक
ऊर्जा कार्यक्षम एलिव्हेटर्स, एस्केलेटर्स, सौर ऊर्जेचा वापर असलेले एलईडी दिवे
दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्टमध्ये ब्रेल बटन
ऑटोमॅटिक रिस्क्यू डिव्हाईस आणि आपत्कालीन परिचालनासारखी विशेष वैशिष्ट्य
सार्वजनिक माहितीसाठी डिस्प्ले, घड्याळं, पेयजल
फायर डिटेक्टर्स आणि सप्रेसर्स उपलब्ध असतील
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सिंक्रोनाइज प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
५० कॅमेऱ्यांसह सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा, अनोळखी वस्तूंचा शोध घेणारी यंत्रणा
नवीन मेट्रो डबा
मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत पहिला मेट्रो डबा
अद्ययावत डब्याची निर्मिती विक्रमी वेळेत-३६५ च्या तुलनेत ७५ दिवस
नियमित डब्याची सर्व वैशिष्ट्य यात समाविष्ट-एका डब्यात सुमारे ३५० प्रवाशांची क्षमता
डब्याची रुंदी ३.२ मीटर, उंची ३.९ मीटर आणि लांबी २२.६ मीटर
दिव्यांगांसाठी अनुकूल, डब्याचे आर्युमान 35 वर्षे, आवाज करत नाही
सायकली अडकवण्यासाठी विशेष जागा
प्रवासी भागात स्मार्ट प्रकाश योजनेसह स्वयंचलित तापमान नियंत्रण
डिझाईन स्पीड ताशी ९० किलोमीटर, परिचालन वेग ताशी ८० किलोमीटर
स्वयंचलित देखरेख, दार उघडणे बंद होणे, उष्णता, धूर आणि आग शोधक
व्हिडीओद्वारे देखरेख
२ गाड्यांचे परिचालक, प्रवासी, परिचालन नियंत्रण केंद्र यांच्यात संपर्क शक्य
महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅन्ड व्हिजन डॉक्युमेंट
मुंबईच्या नागरिकांना आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एमएमआरडीएने ब्रॅन्ड व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे
हे डॉक्युमेंट मुंबई मेट्रोच्या सर्व संबंधितांना ‘मुंबई महानगर परिसरातील जागा एकमेकांशी जोडणे आणि प्रवाशांना प्रवासाचा आनंददायी अनुभव देण्याच्या एमएमआरडीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मार्गदर्शन करेल.