मुंबई विद्यापीठाच्या वन क्लॉक टॉवरला युनेस्कोचा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |

 
 
 
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान झाला.

 

'१६२ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलपती म्हणून राजाबाई क्लॉक टॉवर आणि विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या जीर्णोद्धारासाठी मिळालेला सांस्कृतिक वारसा संवर्धनाचा एशिया पॅसिफिक पुरस्कार स्वीकारताना मोठा सन्मान वाटतो. युनेस्कोकडून हा पुरस्कार मी मुंबई विद्यापीठ,नागरिक आणि वारसा प्रेमींच्या वतीने स्वीकारतो.आधुनिक माध्यमांच्या मदतीने आपण आपल्या वारशाची जाहिरात करुन जगापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे', अशी भावना पुरस्कार स्वीकारताना राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.

 

राव म्हणाले, वारसा संवर्धन प्रकल्पात आर्थिक सहाय्याइतकेच महत्त्व लोकसहभागाला आहे. राजभवन येथील बंकरच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सामील करुन घेऊन शहराचा इतिहास आणि वारसा यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. याचबरोबर ग्रंथालयाची इमारत जतन करणे पुरेसे नाही. आपण संपूर्ण लायब्ररीचे डिजिटलायझेशन करून ती सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली पाहिजे.

 

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले की, मुंबई आणि राजाबाई टॉवर हे एक समीकरण आहे. वन क्लॉक टॉवर अशी याची ओळख आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररीला युनेस्कोकडून मिळालेला पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वारसा जतनाबाबत शिक्षण देण्यासाठी याबाबत अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. वारसा जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासाठी विद्यार्थी, नागरिक यांनी सामूहिक पद्धतीने योगदान देणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि विकास झाल्यास महाराष्ट्रातील वारसा पाहण्यासाठी पर्यटक येतील आणि यामुळे महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळतील असा विश्वास युनेस्कोचे भारतातील संचालक एरिक फाल्ट यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, युनेस्कोचे भारतातील संचालक एरिक फाल्ट, भारतीय हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, एन.जी. सुब्रमण्यममुख्य वास्तु विशारद डॉ. ब्रिंदा सोमय्या, कुलसचिव अजय देशमुख इतर मान्यवर आणि सांस्कृतिक वारसाप्रेमी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@