नवी दिल्ली : राज्यसभेत युएपीए (बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे. विधेयकाच्या बाजूने १४७, तर विरोधात ४२ मते पडली असून तिहेरी तलाक विधेयकानंतर हे दुसरे महत्वाचे विधेयक मंजूर करून घेण्यात यश आले आहे. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. या विधेयकाचे कायदयात रूपांतर होण्यासाठी हे विधेयक राज्यसभेत मंजूर होणे गरजेचे होते.
१९६७ साली यूएपीए हा कायदा करण्यात आला होता. या कायद्यानुसार एखादी संस्था व संघटनेला दहशतवादी घोषित करता येऊ शकत होते मात्र एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येत नव्हते. मात्र आता या विधेयकात महत्वाचा बदल केल्याने दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करता येणार आहे. त्यामुळे आता दहशतवादी कारवायांना आळा घालणे शक्य होणार आहे. दरम्यान, यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकाचे समर्थन करत, विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.