साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |




पुणे : पूर ओसरला असला तरीही नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतील, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता संतोष त्रिंबके यांनी केले.

 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या दवाखान्यात पुरग्रस्तांची तपासणी व सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अनुषंगाने औषधांची कमतरता भासू नये, यासाठी महापलिकेने दवाखान्यांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पाण्यामुळे उद्भवणारे लेप्टोस्पायरोसिस, विषाणूजन्य आजार, अतिसार, उलटी-जुलाब, ताप, सर्दी, खोकला या आजारांवरील पुरेसा औषधसाठा देखील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.

 

पूरग्रस्तांना तत्काळ औषधोपचार देण्यासाठी आपत्कालीन सुविधा कक्ष २४ तास सुरु ठेवण्यात आला आहे. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त घरी परतल्यामुळे सध्या दैनंदिन वेळेबरोबरच सुट्टयांदिवशी महापालिकेचे सर्व दवाखाने सुरु ठेवण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन डॉ. त्रिंबके यांनी केले आहे.

 

निवारा कॅम्पमधील सुमारे ३५० नागरिकांची तपासणी ४ ऑगस्टपासून करण्यात आली आहे. निवारा केंद्रामधील पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय अधिकारी, नर्स व मदतनीस या वैद्यकीय पथकामार्फत पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधोपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही डॉ. त्रिंबके यांनी सांगितले.

 

कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी सुसज्ज ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. गर्भवती महिलेला प्रस्तुती कळा सुरु झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जाण्यास त्वरीत वाहन उपलब्ध न झाल्यास ०२०-२५५०८५००, या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ही व्हॅन तत्काळ मोफत मिळेल. तसेच या व्हॅनद्वारे संबंधित महिलेला इच्छित हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात येईल. ही सेवा महापलिकेतर्फे मोफत व २४ तास पुरविली जाईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 

 
 
@@AUTHORINFO_V1@@