रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : दिवसेंदिवस अधिकच अत्याधुनिक आणि सुसज्ज होत चाललेल्या भारतीय सैन्यदलांच्या शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात लवकरच 'नाग' या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा समावेश होईल. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओने रविवारी पोखरण फायरिंग रेंजवर नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
पोखरण फायरिंग रेंज येथे दिवसा एक आणि रात्री दोनवेळा या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या तीनही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओमधील सूत्रांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाग क्षेपणास्त्राचा समावेश भरतोय सैन्याच्या ताफ्यात होण्याची प्रक्रियादेखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलने गेल्याच वर्षी डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीला व त्यासाठी सुमारे ५२४ कोटी रूपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. यामध्ये क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. आता या क्षेपणास्त्राची क्षमता तपासण्यासाठी भारतीय लष्कर व डीआरडीओकडून 'नाग'च्या आणखी काही चाचण्या केल्या जाण्याचीही शक्यता आहे.
१९८० च्या दशकात 'एकात्मिक क्षेपणास्त्र विकास योजनें'तर्गत भारताने ५ क्षेपणास्त्रे विकसित करण्याची योजना आखली होती. 'नाग' हे त्यापैकी एक आहे. तसेच, अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्रे याआधी विकसित करण्यात आली आहेत. आता 'नाग'च्या समावेशामुळे दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळेसही शत्रूचे रणगाडे उध्वस्त करण्याची क्षमता भारतीय सैन्यदलांना मिळणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat