अभिनंदनातून अहंकाराचा दर्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019   
Total Views |



भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्थापनेपासूनच स्वतःच्या हिमतीच्या जोरावर पृथ्वीच्या कक्षेबाहेरील विश्वाचा वेध घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने चंद्राच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले. श्रीहरिकोटा येथून 'चांद्रयान-२' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी झेपावले, त्या देदीप्यमान क्षणाचा कोट्यवधी भारतीयांनी उत्साहाने आनंद लुटला. दरम्यानच्या दोन दिवसांत समाजमाध्यमांवर इस्रो, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ आणि तेथील कर्मचार्‍यांवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच शेजारी देश-पाकिस्तानची खिल्ली उडवणारे विनोद, मीम्सही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. 'पाकिस्तानच्या झेंड्यावर चंद्र तर आमच्या देशाचा चंद्रावर झेंडा,' हा विनोद त्यातल्या त्यात जास्तच प्रसारित झाला. एकीकडे या घडामोडी घडत असतानाच अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था-'नासा'ने मात्र 'इस्रो'च्या या कामगिरीला कमी लेखण्याचे काम केले. 'नासा'ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट केले की, “चांद्रयान-२च्या प्रक्षेपणासाठी 'इस्रो'चे अभिनंदन! आम्हाला अभिमान वाटतो की, आपल्या या मोहिमेत आमच्या 'डीप स्पेस नेटवर्क'चा वापर करण्यात आला. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबतच्या माहितीसाठी उत्सुक आहोत, कारण येत्या काही वर्षांत आम्ही आर्टेमिस मोहिमेंतर्गत अंतराळवीरांना पाठवणार आहोत.” परंतु, 'नासा'च्या 'इस्रो'चे अभिनंदन करणार्‍या या ट्विटमुळे भारतीय चांगलेच नाराज झाले. कारण, 'नासा'च्या या ट्विटमधून त्या संस्थेचा अहंकारच दिसून आला. कारण, 'नासा'ने आपल्या ट्विटमधून स्वतःचीच शेखी मिरवल्याचे दिसते. 'नासा'चे 'डीप स्पेस नेटवर्क' नसते तर इस्रोला 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण करता आलेच नसते, असा आविर्भाव यातून दिसून येतो. परिणामी, या ट्विटवरून भारतीयांनी 'नासा'ला चांगलेच ट्रोल केले. वस्तुतः 'चांद्रयान-२' मोहीम ही संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या तंत्रावर आधारलेली आहे. 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रमाच्या बळावर अतिशय किफायतशीर असे अंतराळयान आणि प्रक्षेपक तयार केले. सोबतच आठवड्यापूर्वीचे प्रक्षेपण इंधन गळतीमुळे थांबवले, तेव्हाही त्यातला बिघाड देशातल्याच शास्त्रज्ञांनी ओळखला व त्याची दुरुस्ती केली. त्यामुळे 'नासा'ने या मोहिमेत आपण फार काही मोठी भूमिका बजावल्याचा दावा करण्याची गरज नाही. 'नासा'ला निखळ अभिनंदन करायचे असेल तर जरूर करावे, पण त्यासाठी आपल्या 'डीप स्पेस नेटवर्क'ची प्रौढी दाखविण्याची गरज नाही.

 

हम किसीसे कम नही!

 

विद्यापीठीय परीक्षांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर त्याने जी वही, पेन-पेन्सिल, राईटिंग पॅड वगैरे सामग्री वापरली, त्याच्या निर्मात्यांनी हे आमच्याचमुळे शक्य झाल्याचा दावा केला तर? नक्कीच या वस्तूंचे उत्पादन करणारे भानावर नसल्याचे म्हटले जाईल, 'नासा'ने आपल्या ट्विटमधून नेमके तेच केले. भारतीयांनी केलेल्या टीकेमुळे नंतर 'नासा'ने आणखी एक ट्विट करत सारवासारव केली, हे खरेच. परंतु, 'नासा'च्या या ट्विटमागे इतरही अनेक अर्थ दडल्याचे दिसते. कारण, कोण्या एकेकाळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बैलगाडीवरूनही आपली प्रक्षेपके वाहून नेली. तसेच भारताकडे कित्येक वर्षांपर्यंत अंतराळ संशोधनविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानही नव्हते. अमेरिकेसह जगातील अन्य बड्या देशांनी भारताला असे नवनवे तंत्रज्ञान द्यायला नेहमीच नकार दिला होता. अण्वस्त्र चाचणीनंतर तर अमेरिकेने भारतावर निरनिराळी बंधने लादून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला. पण, कितीही संकटांचे, समस्यांचे अडथळे आले तरी भारताने कधी जिद्द सोडली नाही. अमेरिकेने नवतंत्रज्ञानाचा, नवसंशोधनाचा दरवाजा भारतासाठी बंद केलेला असताना भारतीय शास्त्रज्ञांनी स्वबळावर नवीनच राजमार्ग निर्माण केला. तेही किमान कालावधीत, कमी किमतीत आणि हेच कारण असेल की, आज 'नासा'ने कुत्सितपणाचा दर्प येईल, अशा शब्दांत 'इस्रो'चे अभिनंदन केले. पण, हे एवढ्यापुरतेच थांबणारे नाही, कारण ही तर केवळ सुरुवात आहे. अंतराळ संशोधन, उपग्रह प्रक्षेपणात 'इस्रो'चे नाव जगाच्या बाजारपेठेत नावाजले जात आहे. अनेक देश आपापले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी 'इस्रो'ची मदत घेत आहेत. दुसरीकडे अमेरिकेकडे पैसा तर अफाट आहे, पण तिथे काम करणारे मेंदू भारतीय आहेत. म्हणजेच अमेरिका असो वा भारत, सर्वत्र भारतीयांच्या बुद्धीचे तेज लखलखताना दिसते. कदाचित यामुळे 'नासा'च्या, अमेरिकेच्या एकमेवाद्वितीयतेला आव्हानही मिळाले असेल. 'इस्रो'ची आताची चांद्रमोहीम केवळ १ हजार कोटीत झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. हा खर्च डार्क फिनिक्स, स्टार वॉर्स, अ‍ॅव्हेंजर्स या हॉलिवडूपटांपेक्षाही कमी आहे. 'नासा'च्या डोकेदुखीमागे हेही एक कारण असू शकेल. यावरूनच 'इस्रो'ची स्पर्धा आता पाकिस्तान वगैरेशी नव्हे, तर 'नासा'शी असल्याचे म्हणता येते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@