विजयवाडा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला सोबत घेऊन समाजाच्या सहयोगातून काम करतो. आगामी काळात संघाचा प्रत्येक स्वयंसेवक सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची गती वाढवली जाईल. भारतीय मूल्य व सांस्कृतिक जीवनपद्धतीच्या आधारावर समाजात परिवर्तन व्हावे, यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाला जागृत करून प्रशिक्षण देऊन सक्रिय केले जाईल, असे प्रतिपादन संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.
डॉ. वैद्य यांनी विजयवाडा येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारक बैठकीच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आंध्रप्रदेशचे प्रांत संघचालक श्रीनिवास राजू आणि संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरूण कुमार हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. वैद्य म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक ग्रामविकासासाठी काम करत आहेत. सध्या देशभरात ग्राम विकास गतिविधिच्या प्रयत्नांतून तीनशे गावांमध्ये पूर्ण परिवर्तन झाले आहे आणि एक हजार गावांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. सेंद्रिय शेती व गोसंवर्धन, समाजात सद्भावना जागृत करण्यासाठी समरसता, कुटुंब प्रबोधन असे विषय घेऊन स्वयंसेवक काम करत आहेत.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान सरसंघचालकांनी शतप्रतिशत मतदानासाठी आवाहन केले होतं. मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि राष्ट्रीय मुद्द्यांच्या आधारावर मतदानासाठी मतदारांना जागृत करण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक जनजागरण अभियान करत होते. यावेळी स्वयंसेवकांनी घरोघरी संपर्क केला, छोट्या छोट्या बैठका घेतल्या. देशभरात ५.५ लाख गावांमधून ४.५ लाख गावांमध्ये स्वयंसेवकांनी संपर्क केला होता. संघ रचनेतील ५६ हजार मंडलांपैकी ५० हजार मंडलांपर्यंत संघाचे स्वयंसेवक पोहोचले असून जनजागरण अभियान, स्वयंसेवक, समाजातील बंधू-भगिनी असे एकूण ११ लाख लोक जनजागृती अभियानात सहभागी झाले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.
समाजाचे समर्थन वाढते आहे
समाजाकडून संघाला समर्थन आणि स्वागत उत्तरोत्तर वाढत आहे. संघासोबत काम करण्यासाठी, संघाविषयी माहिती घेण्यासाठी उत्सुकता वाढली असल्याचे डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले. संघाच्या संकेतस्थळावरील ‘जॉईन आरएसएस’ या उपक्रमाच्या माध्यमातून संघात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वर्ष २०१४ मध्ये पहिल्या सहा महिन्यात ३९ हजार जणांनी संघात दाखल होण्याची इच्छा दर्शवली होती. २०१६ मध्ये याच कालावधीत ४७ हजार, २०१८ मध्ये ५६ हजार, आणि २०१९ मध्ये ६६ हजार लोकांनी संघात दाखल होण्याची इच्छा दर्शवली. यामध्ये वय-वर्षं ४० खालील मंडळींचा अधिक भरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat