मुसळधार पावसामुळे बिबट्याचे पिल्लू घरात आसऱ्याला ; आईकडे सुखरुप पाठवणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2019   
Total Views |



 

रत्नागिरीच्या खर्डेंच्या घरी आईपासून दुरावलेल्या पिल्लाचा आसरा ; दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पिल्लू आईकडे सुपूर्द


मुंबई (अक्षय मांडवकर) : रत्नागिरीत गेले दोन दिवस घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव कार्यकर्त्यांना बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईकडे सोपविण्यात यश मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे आपल्या आईपासून दुरावलेले बिबट्याचे एक पिल्लू बुधवारी रात्री रत्नागिरीतील मेर्वी गावाच्या खर्डेवाडीमधील एका ग्रामस्थाच्या घरी आसऱ्याला आले होते. वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक प्राणिमित्रांनी या पिल्लाला ताब्यात घेऊन गुरुवारी रात्री त्याची सुटका केली. त्यानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास हे पिल्लू त्याच्या आई आणि दुसऱ्या भावडांसोबत कुर्धे गावाच्या परिसरात वावरताना आढळून आले.

 

 
 
 

रत्नागिरीच्या मेर्वी गावातील खर्डेवाडीच्या ग्रामस्थांना यंदाचा पावसाळा स्मरणात राहणारा ठरला आहे. कारण, बुधवारी रात्री येथील जर्नादन खर्डे यांच्या घरात चक्क बिबट्याचे एक पिल्लू आसऱ्याला आले होते. साधारण चार महिन्यांचे हे मादी पिल्लू मुसळधार पावसात आईपासून दुरावले होते. घरासमोरील झुडुपात चकाकणाऱ्या चिमुकल्या डोळ्यांना पाहून खर्डे कुटुंबीय त्या ठिकाणी चाचपणीसाठी गेले. इतक्यात पिल्लाने धाव घेत खर्डे यांच्या घरात शिरकाव केला. घरात शिरलेल्या बिबट्याच्या पिल्लामुळे खर्डे कुटुंबीयांची काही काळ तारांबळ उडाली. ही वार्ता गावभर पसरली. संपूर्ण गाव पिल्लाला पाहण्य़ासाठी लोटला. मात्र, पिल्लाच्या शोधार्थ त्याची आई आसपासच्या परिसरात फिरत असेल या भितीने गावकरी चिंतातुर होते. त्य़ांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर आणि सिद्धेश पावसकर यांना दिली. खर्डेवाडीत पोहोचल्यावर या ठिकाणी भितीचे वातावरण पसरले असल्याने आम्ही सर्वप्रथम वन विभागाला कळवून पिल्लाला ताब्यात घेतल्याची माहिती प्रदीप डिंगणकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यानंतर वनपाल रवी गुरव, वनरक्षक महादेव पाटील, मिताली कुबल आणि विक्रम कुंभार यांच्या मदतीने पिल्लाला जंगलात सोडण्यात आले.

 

 
 

मात्र विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाचा मागोवा घेत हे पिल्लू बुधवारी मध्यरात्री पुन्हा गावात शिरले. गुरुवारी पहाटे गावकऱ्यांना हे पिल्लू पुन्हा दिसल्यानंतर त्यांनी वन विभागाला तातडीने याची माहिती दिली. डिंगणकर यांनी पिल्लाला पुन्हा ताब्यात घेऊन गुरुवारी दिवसभर त्याची काळजी घेतली. या दरम्यान मार्गदर्शनासाठी आम्ही संशोधनकर्त्या डाॅ. विद्या अत्रेय, माणिकडोह बिबट्या बचाव केंद्राचे पशुवैद्यक डाॅ. अजय देशमुख आणि डाॅ. किशोर बाटवे यांच्या संपर्कात असल्याचे डिंगणकर यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही गुरुवारी रात्री या पिल्लाला वस्तीपासून दूर सोडल्याचे, ते म्हणाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हे पिल्लू त्याच्या आई आणि दुसऱ्या एका भावडांसमेवत कर्धे गावातील बेहेेरे परिसरात वावरताना दिसल्याची माहिती डिंगणकर यांना स्थानिकांकडून मिळाली आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@