सुप्रजा : भाग १३

    24-Jun-2019
Total Views | 84




गर्भिणींना या नाजूक अवस्थेत आहारापासून ते विहारापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या बाबींची माहिती घेणे अत्यावश्यक आहे. कारण, या अवस्थेत बाहेरच्या औषधांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा सल्लाच डॉक्टरांकडून दिला जातो. त्यासाठी नेमके काय करावे, याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया....

 

आयुर्वेदिक उपचारांबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात काही मोठे गैरसमज आहेत. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, आयुर्वेदिक औषधांना 'साईड इफेक्ट्स' नसतात. या औषधांना 'मुदतसमाप्ती' नसते. त्यामुळे एकाला दिलेले औषध सर्रास घरातील सर्व मंडळी वापरतात. जुने झालेले, खूप वर्षांपूर्वीचे औषधही वापरतात.पण, एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आयुर्वेदशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीचा (शारीरिक, मानसिक, भावनिक, नैसर्गिक) खोल विचार करते. त्यामुळे केवळ लक्षणांवर किंवा रुग्णावर 'उपचार करणे' हा उद्देश नसून शरीरामध्ये 'समत्त्व' (stage of balance, equilibrium) राखणे हा आहे. या उद्देशाने दिलेले औषध त्या त्या व्यक्तीस चपखल उपयोगी पडते. पण, तेच औषध सर्वांना तेवढेच गुणकारी ठरेल असे नाही. सामान्यपणे म्हटले जाते की, आयुर्वेदाचा गुण यायला वेळ लागतो. जे आपल्या प्रकृतीसाठी तयार केलेले नाही, ते आपल्याला उपयुक्त कसे ठरेल? हे म्हणजे वाढत्या अंगाचे कपडे घेऊन ते मोठे होत आहेत म्हणण्यासारखे झाले! असो.

 

तसेच 'आसव-अरिष्ट' या औषध प्रकारांमध्ये 'Self Generated Alcohol' असते. त्यामुळे त्याला बुरशी येत नाही. उलट ते अधिक परिणामकारक होते. याचाच अर्थ केवळ 'आसव-अरिष्टे' ही जुनी घेतलेली उत्तम. अन्य कोणतेही आयुर्वेदिक औषधप्रकार (चूर्ण, गुटी-वटी इ.) जुने झालेले वापरू नये तसेच, वैद्यांच्या सल्ल्याशिवाय दुकानावर, टीव्हीवर पाटी वाचून औषध घेऊ नये. कारण, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भवती अवस्थेमध्ये ही खबरदारी तर अधिक घ्यावी. साधे-सोपे घरगुती उपाय आधी करून बघावेत. बाह्य औषधोपचार (applications) आणि आहारातील घटकांमधून जेवढे होईल तेवढे बदल घडवून आराम वाटेल, याकडे लक्ष द्यावे. औषधे का सांगत नाहीत लेखमालेतून, असे मला विचारलेजाते. त्याचे कारण हेच आहे. व्यक्तिश: रुग्णाला तपासल्याशिवाय योग्य औषधोपचार पद्धती अवलंबिता येत नाही.

 

गर्भवती अवस्थेमध्ये होणारे आणखी काही त्रास म्हणजे झोपेच्या तक्रारी आणि अस्वस्थता, रक्तदाब वाढणे. आपण बघितलेच आहे की, गर्भिणीमध्ये बर्‍याच शारीरिक व मानसिक उलाढाली होत असतात. दुसर्‍या व तिसर्‍या तिमाहीमध्ये गर्भाचा आकार व वजन झपाट्याने वाढते. याचा परिणाम म्हणजे, गर्भिणीची झोपेची स्थिती पूर्ववत राहत नाही.काहींना पोटावर झोपण्याची सवय असते, तर काहींना पाठीवर. गर्भधारणा झाल्यावर पोटावर झोपणे थांबवावे, ही पहिली सूचना दिली जाते. ज्याप्रमाणे गर्भाची वाढ होते, आकार वाढतो, तेव्हा गर्भिणीला पाठीवर झोपणे शक्य होत नाही. कुशीवर झोपूनही अस्वस्थ वाटते. काही वेळेस आरामखुर्चीतच बसून झोपावे लागते. अशा वेळी जर 'गॅसेस'चा, आम्लपित्ताचा, मलबद्धतेचा जर त्रास होत असेल, तर झोपण्याची अजूनच पंचाईत होते. अशा वेळेस जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान दोन तासांचे अंतर राहील असे बघावे. (यासाठी उशिरा झोपू नये, पण लवकर जेवावे) तसेच ऋतुमानानुसार आहारात बदल करावा. पावसाळ्यात पचायला हलका आहार व थंडीत थोडा पौष्टिक आहार असल्यास चालतो. तसेच झोपताना आधी थोडा वेळ (१५-२० मिनिटे) डाव्या कुशीवर झोपावे.

 

याने अन्नही पचण्यास मदत होते. जेवल्यावर थोडा वेळ 'शतपावली' करावी. या उपायांनी गॅसेस कमी होतात. आम्लपित्त व जळजळ कमी राहते. ज्यांना शांत झोप लागत नाही, मनात खूप विचार सुरू असतात, अशांनी संध्याकाळी अंगाला कोमट तेल हलक्या हाताने चोळावे आणि कोमट पाण्याने (थंडी असल्यास गरम पाण्याने) अंघोळ करावी. शांत 'instrumental music' ऐकावे. झोपण्यापूर्वी अर्धा तास मंद प्रकाशात बसावे. तसेच लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल झोपण्यापूर्वी किमान एक तास बंद ठेवावा नाहीतर झोपतानाही तेच विचार मनात सुरू राहतात आणि झोप शांत व गाढ लागत नाही. शरीरात खूप उष्णता वाढल्यासारखी वाटत असेल आणि त्याने तगमग होऊन झोप लागत नसेल, तर टाळूवर तेल घालावे किंवा तेलात बुडवलेला कापसाचा बोळा टाळूवर ठेवावा.

 

तसेच याने शरीरातली उष्णता शोषून घेतली जाते आणि शांत वाटू लागते. याचबरोबर पायाचे तळवे थोडावेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवावे आणि नंतर पुसून त्याला थोडं खोबरेल तेल वा एरंडेल तेल चोळावे. त्याने शरीरातील वाढलेला वात व पित्त कमी होऊन मन शांत होते आणि झोप चांगली लागते. बेंबीतही थोडे खोबरेल तेल सोडले की बरे वाटते. (याला 'नाभिपूरण' असे आयुर्वेदात म्हटले जाते.) वाताच्या त्रासांना आटोक्यात ठेवण्यासाठी शरीरातील ज्या 'नैसर्गिक पोकळ्या' (openings) आहेत, जसे कान, नाक, बेंबी, गुदद्वार व योनी याला रोज तेल लावावे किंवा दोन-दोन थेंब तेल सोडावे. आपल्या त्वचेवरही बारीक रंध्रे असतात. त्याही 'Natural Pores' आहेत. म्हणून 'अभ्यंग'ही (सर्वांगाला तेल लावणे) नित्य करावे. या सर्व गोष्टी केल्याने झोप शांत लागण्यास मदत होते. झोपेसाठी गर्भवतीने आभ्यंतर औषध घेणे टाळावे.

 

काही वेळेस शेवटच्या तिमाहीमध्ये गर्भिणीचा रक्तदाब वाढतो. याची विविध कारणे आहेत. शौचास खडा होणे, झोप अपुरी होणे, वजन खूप वाढणे, अंगाला सूज येणे, आहारातून मिठाचे प्रमाण खूप जाणे इ. या कारणांमुळे तर रक्तदाब वाढत असेल, तर ती कारणे कमी करणे आधी गरजेचे आहे. खूप चिडचिड, दगदग होत असल्यास अपुरी विश्रांती खूप नकारात्मक विचार, भीती-दडपण या कारणांनी रक्तदाब वाढत असेल, तर या मानसिक कारणांना आधी दूर सारावे. लगेच रक्तदाबाची औषधे सुरू करू नयेत. हल्ली लग्नाचे वय उशिरा व त्यानंतर अपत्यप्राप्ती अजून उशिरा बहुतांशी वेळा होताना दिसते. त्यामुळे शरीराची शारीरिक क्षमता व लवचिकता थोडी कमी होते. यामुळे ही गर्भिणी अवस्थेत रक्तदाब वाढू शकतो. योग्य विश्रांती, योग्य वेळी आणि काळापुरती (सहा ते आठ तास) झोप आणि सूप, पोषक आहार जर घेतला तर ८० टक्के गर्भिणीमध्ये ज्यांना रक्तदाब वाढल्याचे दिसून येते, त्यांचा रक्तदाब आटोक्यात येतो. केवळ २० टक्के गर्भवतींना औषधोपचार द्यावे लागतात. तेव्हा औषधांपेक्षा नियमितता हा गुरूमंत्र गर्भिणीने अवलंबावा, हे अधिक महत्त्वाचे.

 

गर्भवतीमध्ये हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर मुख्यतः चेहर्‍यावर वांग (Butterfly patch Hyperpigmentation) उद्भवते. काही वेळेस प्रसुतीनंतर वांग डाग कमी होतात. पण, बरेचदा पुसटसर होऊन राहतात. हे होऊ नये म्हणून शतावरीचा वापर करावा. त्याचबरोबर चेहर्‍यावर जात्यादी तेल, कुमकुमादी तेल इ. तेलाने 'अभ्यंग' करावे. जसे 'Hyperpigmentation Patch' येतो. तसेच 'Stretch marks' चा ही त्रास गर्भिणींमध्ये दिसतो. विशिष्ट शरीरावयांची वाढ अधिक होते, वजन वाढते. असे झाल्यामुळे त्वचा फाकते.त्वचा फाकताना त्यातील स्तर वेगवेगळे होतात, एकसंधता राहत नाही. 'डढठएढउक चअठघड' आल्यावर ते घालवणे खूप कठीण आहे. पण, येऊ नये यासाठी खबरदारी गर्भवतीने घ्यावी. त्वचेत जर लवचिकता असली, तर त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. सगळे स्तर एकत्र ताणतात. एुरिपवहोतात. ती लवचिकता आणण्यासाठी व्यायामाचा फायदा होतो. तसे अभ्यंगाचाही खूप फायदा होतो. रोज तीळ तेल, खोबरेल तेल, आल्मंड ऑईल, चंदन बला इ. पैकी एखादे तेल लावावे. विशेषतः पोटाला, ओटीपोटाला, गुद, स्तन व मांड्या यांना नित्यनियमाने तेल लावावे. त्याचा फायदा होतो. पुढील लेखात गर्भिणींमधील व्यसनाधीनता याबद्दल जाणून घेऊया.

 

(क्रमशः)

वैद्य किर्ती देव

vaidyakirti.deo@gmail.com

९८२०२८६४२९

 

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121