अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन गर्भपिशवी काढणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

    18-Jun-2019
Total Views | 84



मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांवरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

 

शिंदे म्हणाले, "बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार दोषी आढळलेल्या रुग्णालयाची मान्यता रद्द केली जाईल. दोषी डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी रद्द करण्याबाबत शिफारस केली जाईल. रुग्णांना नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी सहाय्य केले जाईल."

 

गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्याबाबत तज्ज्ञांच्या मदतीने एसओपी तयार करणे. ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या महिलांची वर्षातून दोन वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तपासणी केली जाईल. प्रथम तपासणी ऊस तोडणीसाठी जाताना व नंतर ऊस तोडणीवरुन आल्यावर. ऊसतोड चालू असताना त्या ठिकाणी आशा, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.

 

बीड येथील अवैध शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या प्रकरणाची बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश करुन महिला आमदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली जाईल. साखर कारखान्यांशी ऊस तोड करणाऱ्या कामगारांची मूलभूत आरोग्य तपासणी करण्यासाठी करार (एमओयू) करण्यात येईल.

 

बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीने तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी बीड जिल्ह्यातील ९९ खासगी रुग्णालयाची तपासणी केली असता सन २०१६ ते १९ या तीन वर्षांत ४ हजार ६०५ एवढ्या गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया प्रसूतीचे प्रमाण नैसर्गिक प्रसूतीच्यापेक्षा कमी असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री हेमंत टकले, विनायक मेटे, शरद रणपिसे, विद्या चव्हाण, डॉ. मनीषा कायंदे, ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121