अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019   
Total Views |



सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडीयन अँग्लो इंडियन महाविद्यालयाची स्थापना केली आणि १९२० साली या महाविद्यालयाला ‘अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय’ म्हणून मान्यता मिळाली. मुस्लीम समाजाने शिकावे, स्वत:ची प्रगती करावी अशी त्यांची इच्छा होतीच. मात्र, एका बाबतीत ते ठाम होते की, भारतीय मुसलमानांनी इंग्रजांशी वफादार राहू नये. याचाच अर्थ भारतीय मुसलमानांनी स्वदेशी स्वातंत्र्याशी वफादार राहावे, असा होतोच. पण या विद्यापीठात काय चालले आहे, हे पाहिले तर वाटते की, धर्मांधता आणि फुटिरतावादाचा तक्षक आज कालियानाग झाला आहे का? अलिगढ विद्यापीठाला केंद्र सरकारकडून भरपूर निधी प्राप्त होतो. उद्देश हा की अल्पसंख्याक(?) समाजाच्या नावाने चाललेल्या विद्यापीठामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे. शिकून त्यांची दृष्टी मानवतावादी व्यापक व्हावी. पण अलिगढ विद्यापीठाबाबत वेगळेच संकेत दिसतात. हे विद्यापीठ स्वत:ला निधर्मी धोरणांना पाठिंबा देण्याचे अवसान आणते. मात्र, नाव आहे ‘अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय.’ युजीसीने मागे मुस्लीम शब्दाच्या धर्मनिदर्शकाबाबत प्रश्न उठवला असता, विद्यापीठाने इतिहासाची ग्वाही वगैरे देत भूतकाळापासून हे विद्यापीठ कसे ‘मुस्लीम’ नावाशी संबंधित आहे, याचे स्पष्टीकरण दिले. तर मुद्दा असा आहे की, हे विद्यापीठ गुणवत्ता सोडून इतर सर्वच नकारात्मक बाबीत चर्चेत असते. का? कारण विद्यापीठाची मुस्लीम कट्टरता छबी बनवण्यामध्ये काही नतद्रष्ट लोकांना कायम रस असतो. त्यामुळेच विद्यापीठामध्ये २६ जानेवारी रोजी तिरंगा रॅली काढली म्हणून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून जाब विचारला जातो. त्यामुळेच विद्यापीठामध्ये भारतविरोधी नारे लावणाऱ्या आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या काही सापांची पिलावळही तयार होते. त्यामुळेच विद्यापीठामध्ये प्रसारमाध्यमांना अडवण्याचीही मानसिकता तयार होते. असो, या विद्यापीठातूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे मानणारे नसिरुद्दिन शाहही काही काळ शिकायला होते म्हणे. ते अत्यंत सेक्युलर वगैरे आहेत. पण, ‘अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालया’तला धार्मिक उल्लेख त्यांनाही बिलकूल खटकला नाही आणि त्यांना इथे दिलेल्या देशविरोधी नाऱ्यांचेही काही वाटले आहे. असे का? याबाबत त्यांची ‘सेक्युलरीवाणी’ अजून ऐकू आली नाही. असे का?

 

राबडी आणि केजरीवाल

 

बारावी पास माणसाला पंतप्रधान बनवले. आता उच्चशिक्षित व्यक्तीला पंतप्रधान बनवा. अर्थात, बारावी पास पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आणि उच्चशिक्षित म्हणजे ते स्वत:, असे अरविंद केजरीवालांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदाच्या व्यक्तीला भारतीय जगण्याच्या अस्मितांची जाणीव असायला हवी, भारतीय मनांची संवेदनशीलता आणि संस्कृती याची पंतप्रधानाला जाणच असायला हवी. या सगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी १०० टक्के खरे उतरले आहेत. पण उच्चशिक्षित केजरीवालांचे भारतीय माणूसपण तपासले तर? तर स्पष्ट दिसते की, ज्या अण्णा हजारेंच्या जीवावर ते जळूप्रमाणे तगले आणि मुख्यमंत्री झाले, त्या अण्णांनी नुकतेच उपोषण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई केली आणि अण्णांनी उपोषणही सोडले. या सगळ्या घटनाक्रमात केजरीवाल कुठे होते? तर त्या काळात, अण्णांचे समर्थन न करता कोलकात्यामध्ये हुकूमशाहीची रंगीत तालीम करणाऱ्या ममतांचे प्रवक्ते म्हणून भूमिका निभावत होते. पण ‘कुत्ता भोकता है हाती चलता है’असे सध्या दिवस आहेत. त्यामुळे केजरीवालांचे म्हणणे लोकांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले. दुसरीकडे बिहारमध्ये काय झाले? तर, स्वत: तुरूंगात भ्रष्टाचाराबाबत शिक्षा भोगत असताना पतीने जिला मुख्यमंत्रीबाई बनवले त्या राबडीदेवींचे विधान पाहा. आज राबडीदेवींनी विधान केले की, ‘मुलायम सिंग यांचे वय झाले आहे.’ त्या असे म्हणाल्या, कारण मुलायम सिंग यांनी, ’मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या.’ राबडींचे पित्त खवळले. सगळे सोमेगोमे पंतप्रधानांविरोधात असताना मुलायम सिंगांनी पंतप्रधानांना शुभेच्छा का द्याव्यात? सध्या असहिष्णूता, अभिव्यक्ति स्वातंत्र्य दडपले जाते... वगैरे... वगैरे... कंठशोष करणाऱ्या गटातल्याच एक सदस्य म्हणून राबडीदेवी आहेत. मुलायम यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे की नाही. त्यांनाही अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे ना? मग मुलायम यांच्या विधानाबाबत राबडीदेवी आणि त्यांच्या गटाची सहिष्णूता कुठे पेंड खाते? असो. एक वाटते की, राबडीदेवी आणि केजरीवाल यांचा बुद्ध्यांक नक्कीच मिळताजुळता असावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@