सहकार आणि संस्कार मंत्राचा आदर्श जोपसणारी दि कल्याण जनता सहकारी बँक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019   
Total Views |

suresh_1  H x W


१९७० मध्ये ‘ठाणे जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. साधारणतः १९७१ साली ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’ची, तर २३ डिसेंबर, १९७३ साली ‘दि. कल्याण जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. मध्यंतरी लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “सहकार हा एक मंत्र व संस्कार आहे.” त्याच ध्येयाने ‘दि कल्याण जनता बँके’ची स्थापनेपासून वाटचाल सुरु आहे.



बँकेच्या स्थापनेपासूनच समर्पित अशा संचालकांचा लाभ बँकेला मिळाला
. आपली नोकरी, आपला व्यवसाय सांभाळून संस्थापक, संचालकांपासून आजपर्यंत बँकेची धुरा, बँकेच्या सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांच्या मदतीने संचालक मंडळ वाहत आहे. १९७३ साली बँकेची ज्यावेळी स्थापना झाली, त्यावेळी ५० हजार रुपयांच्या ठेवी गोळा करणे, हे तसे जिकिरीचे काम होते. परंतु, सुरुवातीच्या ३०० सभासदांनी त्यामध्ये सहभाग घेऊन आवश्यक असणारी रक्कम पूर्ण केली. १८० चौरस फूट जागेत सुरू झालेली कल्याण जनता सहकारी बँक आज आपल्या ४२ शाखांसह पाच हजार कोटींचा व्यावसायिक टप्पा ओलांडत आहे. ‘दि कल्याण जनता सहकारी बँके’ला अगदी पहिल्या वर्षीपासून नफा मिळतो आणि पहिल्या वर्षीपासून नफ्यात असलेली बँक, अशी वेगळी ओळख त्यामुळेच जपता आली. आज कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात सुमारे १४ हजार चौ. फुटांची मुख्य कार्यालयाची वास्तू बँकेच्या मालकीची आहे, हे त्याचे मोठे उदाहरण...


याशिवाय याच इमारतीत बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै
. भगवानराव जोशी यांच्या स्मरणार्थ बँकेने प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या प्रशिक्षण केंद्राचा लाभ, बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी हे नेहमीच घेत असत. बँकेतर्फे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. कल्याणमध्ये ‘जनता भवन’ नावाची वास्तू बँकेच्या मालकीची आहे. या वास्तूतदेखील बँकेने प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था केलेली आहे. वर्ष २०१० मध्ये सातार्‍यातील ‘सातारा मर्चंट को. ऑप. बँक’ अडचणीत आली. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या विलीनीकरणाला परवानगी दिली. त्यानुसार या बँकेचा पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरपर्यंत विस्तार झाला. हा विस्तार लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या शाखांकरिता पुण्यात क्षेत्रीय कार्यालय सुरु केले आहे. त्यामुळे या विभागातील शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना क्षेत्रीय कार्यालयाद्वारे आपली कामे करून घेता येतात.


आजच्या युगात आवश्यक बँकिंग व्यवहार प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा बँकेने आपल्या व्यवसायामध्ये समावेश केला
. त्यामध्ये संगणकीकृत सेवा, रुपे डेबिट, एटीएम, ऑनलाईन पेमेंट, मोबाईल बँकिंग या सर्व सुविधा बँक खातेदारांना पुरवित असते.


सर्व सहकारी बँकांसाठी दरवर्षी चिंतेचा विषय म्हणजे अनुत्पादितकर्ज खाती
, म्हणजेच ‘एनपीए’. परंतु, अनुत्पादित कर्ज नियंत्रणात राहतील म्हणून बँकेकडून दरवर्षी सातत्याने प्रयत्न केला जातो. रिझर्व्ह बँकेच्या मापदंडात कर्ज राहतील, याची खबरदारी घेतली जाते. आर्थिक व्यवहारात प्रगती करत असताना सामाजिक उत्तरदायित्वाची जोपासना बँकेने सुरुवातीपासूनच केली आहे. त्यात सभासद कल्याण निधी, कर्मचारी कल्याण निधी, धर्मादाय निधी अनुदान या गोष्टींचा समावेश आहे. बँकेला होणार्‍या नफ्याच्या एक टक्का रक्कम धर्मादाय निधी स्वरूपात वितरीत करता येते. त्याप्रमाणे दरवर्षी समाजातल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, नाट्य, वैद्यकीय आदी क्षेत्रांत काम करणार्‍या सुमारे शंभर ते सव्वाशे संस्थांना दरवर्षी बँकेतर्फे सन्मानपूर्वक अनुदान दिले जाते. अशा संस्थांना अनुदान देऊन बँक सामाजिक उत्तरदायित्वाचा आपला खारीचा वाटा उचलत असते. ‘संचालक समाजसेवा पुरस्कार’ हा सामाजिक उत्तरदायित्वाचाच एक भाग म्हटला पाहिजे. बँकेच्या स्थापनेपासूनच संचालक कोणताही सभा भत्ता घेत नाही आणि ही रक्कम ‘संचालक समाजसेवा पुरस्कार’ नावाने या ट्रस्टमध्ये जमा केली जाते. त्यामधून सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना बँकेतर्फे ‘संचालक समाजसेवा पुरस्कार’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. आजपर्यंत १७ विविध व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आणि यावर्षी तीन सुप्रसिद्ध उद्योजकांचा गौरव महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आपआपल्या क्षेत्रात काम करत असताना या तिन्ही उद्योजकांची सामाजिक बांधिलकीची जपणूक कायम केली आहे.

- अ‍ॅड. सुरेश पटवर्धन

(लेखक दि कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@