दिल्ली : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मुसलमान पक्षकारांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता बाबरी मशीद कृती समितीने न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे.
बाबरी मशीद कृती समितीने मोडकळीस आलेल्या बाबरी मशिदीचे अवशेष कृती समितीला सोपवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी इस्लामिया डिग्री कॉलेजमध्ये मौलाना यासीन अली उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बाबरी मशिदीचे अवशेष अजूनही विवादित जागेवर आहेत. त्यामुळे कृती समितीने हे अवशेष सुपुर्द करण्याची मागणी केली आहे. याआधी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली असली तरी १९९२मध्ये बाबरी मशीद उद्धवस्त करण्याच्या कृतीला न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. त्यामुळे मोडकळीस आलेले साहित्य, इतर बांधकाम साहित्य जसे दगड, दांडे इत्यादी अवशेष मुसलमानांच्या ताब्यात देण्यात द्यावेत, अशी मागणी समितीचे संयोजक अॅडव्होकेट जफर्याब जिलानी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.