मुंबई : भारतीय नौदलाची निवृत्त विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आज लिलावात काढली जाणार आहे. मेटल स्क्रॅब ट्रेड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दुपारी १२ ते ४ दरम्यान हा लिलाव होणार आहे. भारतीय नौदलातील २१ वर्षांच्या सेवेनंतर विराट ६ मार्च २०१७ ला सन्मानाने निवृत्त झाली होती. तेव्हापासून विमानवाहू युद्धनौका विराट ही मुंबईच्या नौदल तळावर उभी होती. ऑनलाइन बोलीद्वारे ही नौका भंगारात काढण्यासाठी रवाना केली जाईल. यामुळे मुंबईतील गोदीत चार ते सहा युद्धनौकांचा तळ नौदलाला मिळणार आहे.
या युद्धनौकेचे रूपांतर संग्रहालयात करण्याबाबत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र सरकारने उत्सुकता दाखवली होती. मात्र यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेतला नाही. त्यातच नौदलाच्या तळावर जागा मर्यादित असतांना विराटमुळे भलीमोठी जागा नाहक अडवली जात होती. या सर्व कारणामुळेच अखेर विराट भंगारात काढण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला.
विराट नौकेच्या लिलावानंतर नौका प्रत्यक्षात तोडताना त्यातील किमान दहा टक्के लोखंड भारतीय कंपन्यांना पुरवून त्याचा व्यावसायिक वापर केला जावा, अशी अट ठेवण्यात आली आहे. नियमात बसणाऱ्या टेंडरद्वारे विराट भंगारात काढली जाणार आहे.
याआधी नौदलाची आयएनएस विक्रांत ही पहिली विमानवाहू युद्धनौका १९९७ ला निवृत्त झाल्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये भंगारात काढण्यात आली होती.