कचरामुक्तीचा ठाणे पॅटर्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



ठाणे (भटू सावंत) : सध्या नागरी घनकचऱ्याची समस्या देशभरात भेडसावत आहे. 'स्वच्छ भारत मिशन' सह विविध पातळ्यांवर केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था काम करताना दिसत आहेत. शहरात क्षेपणभूमीला आता जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही, असा धोरणात्मक निर्णयदेखील झाला आहे. रोजच्या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र, ठाण्यातील गेल्या बारा वर्षांतील घनकचरा व्यवस्थापनासाठीची लोकचळवळ समजून घेतली तर कचरामुक्तीसाठीचा हा ठाणे पॅटर्न नक्कीच कचरा समस्येवर रामबाण उपाय ठरू शकेल.

 

कचरा, त्याचे व्यवस्थापन, त्यामागील अर्थकारण आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची चर्चा अनेक दशके होत आली आहे. गाव, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक प्रयोगांची चर्चादेखील या समस्या निवारणासाठी होत असते. घरच्या घरी कचऱ्यापासून खत, वॉर्डस्तरीय कचरा व्यवस्थापन, प्रभागस्तरीय कचरा व्यवस्थापन ते थेट गोव्याच्या धर्तीवर सामूहिक कचरा व्यवस्थापनाचे अनेक प्रयोग लोकांसमोर येत असतात. ठाण्याच्या बाबतीत पाहायला गेले तर गेल्या एका तपापासून ठाण्यातील घनकचरा व्यवस्थापनाची चळवळ उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेलेली दिसते. प्रा. विद्याधर वालावलकर, कौस्तुभ ताम्हणकर, वीणा जोशी, जयंत जोशी, डॉ. लता घनश्यामानी, डॉ. केळशीकर अशी असंख्य नावे या यादीत घेता येतील. पर्यावरण दक्षता मंच, समर्थ भारत व्यासपीठ, हरियाली, आर निसर्ग अशा संस्थांनी ही चळवळ अधिक निष्कर्षापर्यंत नेऊन ठेवली आहे.

 

'इव्हायरो व्हिजिल' या संस्थेने ठाण्यात वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापनाची मुहूर्तमेढ रोवली आणि ठाण्याने आपल्या शहराबरोबर आजूबाजूच्या अनेक महानगरपालिकांना वैद्यकीय घनकचऱ्याच्या शास्त्रशुद्ध विल्हेवाटीचा मार्ग दाखवला. पर्यावरण दक्षता मंच, पर्यावरण शाळेच्या माध्यमातून घरच्या घरी व सोसायटी स्तरावरील कचरा व्यवस्थापनाचा प्रयोग एका तपापूर्वी ठाण्यात राबविण्यात आला. जयंत जोशी, कौस्तुभ ताम्हणकर यांनी ठाण्यात शून्य कचरा मोहीम पुढे नेली. समर्थ भारत व्यासपीठाने निर्माल्यापासून खत, हरित कचऱ्यापासून कोळसा आणि प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचे पथदर्शी प्रकल्प ठाण्यात उभे केले.

 

ठाणे शहरातच पहिल्यांदा बांधकाम कचऱ्यापासून उपयोगी साहित्य बनवणे, थर्माकोलपासून शोभेच्या वस्तू बनवणे, हॉटेलच्या ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सारखे प्रकल्प उभे राहिले. शहर ते देशाला कचरा व्यवस्थापनाची शास्त्रीय पायवाट प्रशस्त करण्याइतपत सामर्थ्य ठाण्यातील कचरा व्यवस्थापन चळवळीत आहे. या चळवळीला अनेक ठिकाणी लोकाश्रय मिळाला आहे. मात्र, जर याला योग्य राजाश्रय मिळाला तर कचरा व्यवस्थापनाचा खूप मोठा पल्ला ही चळवळ गाठू शकते, यात शंका नाही. केवळ सांगीन युक्तीच्या गोष्टी चार, अशात ही चळवळ अडकून न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्यामुळे आज ठाण्यातील जवळपास १० हजारांहून अधिक घरांत घरच्या घरी कचरा व्यवस्थापन होत आहे. जवळपास ४० हजार घरांतील कचऱ्यावर सोसायटी स्तरावरील कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. शहरातील वर्षाकाठी ३ हजार टन निर्माल्य, ४ हजार टन हरित कचरा आणि ७ हजार टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया या शहरात होते, ही अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. या चळवळीतील सर्व सूत्रांना एका माळेत गुंफून शहर व राज्याच्या कचरा समस्येवर उत्तर शोधण्यासाठी त्याचा वापर केला तर एक दिवस शून्य कचरा मोहीम नक्कीच यशस्वी होईल.

 
@@AUTHORINFO_V1@@