ज्वालामुखींच्या जगात... भाग ६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018   
Total Views |



 

‘भूकंप’ हे प्रकरण संपवून आपण आता दुसर्‍या एका अतिशय संहारक, पण अत्यंत नयनरम्य अशा गोष्टीकडे येऊ. आपण जाणून घेणार आहोत ते अर्थात ज्वालामुखी (Volcano) बद्दल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

  

‘ज्वालामुखीशास्त्रज्ञांना बराचसा ज्ञात आणि तरीही बराचसा अज्ञात असा हा एक अद्भूत प्रकार आहे. संतापला, तर क्षणार्धात शेकडो, हजारो जीवांचा बळी घेणारा... लाखो, कोट्यवधी, अब्जावधी रुपये, डॉलर, पौंड, इ. ची हानी करणारा... पण शांत असल्यास ज्याच्या सौंदर्यावरून नजर निघता निघत नाही... असा हा ‘ज्वालामुखी’ काहीजण ज्वालामुखीला नरकाचे द्वार (Hell’s Gate) असेही म्हणतात. कारण तो अक्षरश: तसाच दिसतो.
 

ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वारंवारतेवरून त्याचे तीन प्रकार आहेत - सक्रिय ज्वालामुखी (Active Valcano), निष्क्रिय ज्वालामुखी (Dormant Valcano) व मृत ज्वालामुखी (Extinct/ Dead Valcano). सक्रिय ज्वालामुखीमध्ये सदैव उद्रेक होत असतो, निष्क्रिय ज्वालामुखीमध्ये दोन उद्रेकांमध्ये फार मोठा कालावधी असतो, तर मृत ज्वालामुखी ही अशी स्थिती आहे, ज्यात आधीच्या उद्रेकामध्ये ज्वालामुखीच्या आतील सर्व मॅग्मा (Magma) व स्फोटक द्रव्ये संपून गेलेली आहेत, त्यांचे पुनर्भरणाचे (Refill) रस्ते बंद झाले आहेत आणि त्यामुळे भविष्यात कधीही व कोणत्याही कारणामुळे त्यात उद्रेक होणार नाही.

 

उद्रेकाच्या स्फोटकताकदीवरून ज्वालामुखीचे दोन मुख्य प्रकार आहेत - केंद्रीय उद्रेक (Central Eruption) व भेगेतून होणारा उद्रेक (Fissure Eruption). केंद्रीय उद्रेकात एकाच केंद्रातून स्फोटकपद्धतीने द्रव्य बाहेर येते. या उद्रेकाचेसुद्धा खालीलप्रमाणे प्रकार आहेत-

 

1. हवाईयन (Hawaiian) - हा उद्रेक स्फोटक नसतो. यातील लाव्हारस फारच पातळ असल्यामुळे केंद्रापासून दूर वाहून जातो व फारच थोडा लाव्हा केंद्राजवळ थिजून राहतो. म्हणून केंद्राच्या आत दाब निर्माण होत नाही व उद्रेकाच्या वेळी स्फोट होत नाही. अमेरिकेतील हवाई बेटांवरील माऊना लोआ (Mauna Loa), माऊना कीया (Mauna Kia) इ. ही या प्रकाराची उत्तम उदाहरणे आहेत. या प्रकारच्या ज्वालामुखींना ‘ढाल ज्वालामुखी’ (Shield Volcano) असेही म्हणतात. कारण त्यांचा आकार एखाद्या ढालीसारखा गोलाकार असतो.

 

2. स्ट्राँबोलियन (Strombolian)- इटलीमधील माऊंट स्ट्राँबोली (Mt. Stromboli) यावरून हा प्रकार आला आहे. या प्रकारात लहानशा केंद्रामधून घट्ट लाव्हारसाचे सतत व लहान लहान उद्रेक होत असतात. ज्वालामुखीय गोळे (Volcanic Bombs) हेसुद्धा याच उद्रेकात प्रामुख्याने आढळतात.

 

3. व्होलकॅनियन (Volcanian)- रोमन कथांमधल्या वुलकॅनस (Vulcanus) या देवाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. या प्रकारात आधी ज्वालामुखीच्या आत खूप दाब निर्माण होतो. मग, अचानकच अत्यंत स्फोटकपद्धतीने हा दाब मोकळा (Release) होतो. हा लाव्हा घट्ट् असल्यामुळे बराचसा केंद्राजवळच थिजतो. त्यामुळे पुन्हा केंद्र बंद (Seal) होते. म्हणून या ज्वालामुखीचा प्रत्येक उद्रेक हा स्फोटकच असतो. एकदा निघून गेलेला दाब पुन्हा निर्माण व्हायला खूप कालावधी लागतो. त्यामुळे दोन उद्रेकांमध्ये खूप कालावधीचे अंतर असते. पण जेव्हा उद्रेक होतो, तेव्हा हाहाकार माजवूनच जातो. उदाहरणार्थ - माऊंट व्हेसुवियस (Mt. Vesuvius), इटली.

 

4. पीलियन (Peelean)- हे ज्वालामुखी फार स्फोटक असतात. यातून उसळलेली राख हजारो किलोमीटरपर्यंत जाते. याची उत्तम उदाहरणे म्हणजे माऊंट पीली- कॅरेबियन बेटे, क्रॅकाटोआ- इंडोनेशिया.

 

भेगीय ज्वालामुखीमध्ये अजिबात स्फोट होत नाही. जमिनीला पडलेल्या भेगांमधून लाव्हारस हा दिवस, आठवडे, महिने, अगदी वर्षांनुवर्षेदेखील (वर्षांनुवर्ष म्हणजे अक्षरश: हजारो वर्षे) सतत वाहत राहतो. या प्रकारच्या उद्रेकामुळे प्रचंड मोठी पठारे तयार होतात. या प्रकारच्या उद्रेकाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले ‘दख्खनचे पठारच’ आहे. हे संपूर्ण पठार अत्यंत कठीण अशा ‘बेसॉल्ट’ (Basalt) खडकाचे असून सुमारे 6 हजार 500 फूट जाड आहे.

 

केंद्रीय प्रकार व भेगीय प्रकार याशिवाय आणखी एक प्रकारचा ज्वालामुखी असतो, तो म्हणजे महाज्वालामुखी (Supervolcano). जगात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकेच महाज्वालामुखी आहेत. महाज्वालामुखींचा उद्रेक साधारणत: लक्षावधी वर्षांतून एकदा वगैरे होतो. इतिहासातील आत्तापर्यंतचा शेवटचा महाज्वालामुखी उद्रेक हा टोबा (ढेलर), इंडोनेशिया या महाज्वालामुखीचा असून तो सुमारे 74 हजार वर्षांपूर्वी झालेला आहे. गेल्या 25 दशलक्ष वर्षांत झालेला हा सर्वांत मोठा ज्ञात उद्रेक आहे. उद्रेकाचा जोर इतका प्रचंड होता की, पूर्ण टोबा पर्वतच कोसळून तिथे खूप मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्यात पाणी भरून तळे तयार झाले. हेच आजचे लेक टोबा. टोबा कॅटेस्ट्रॉफी थिअरी (Toba Catastrophe Theory) नुसार या उद्रेकामुळे इतकी जास्त राख बाहेर पडली की, पुढील 6 ते 10 वर्षे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचूच शकला नाही. त्यामुळे हिमयुग आले. त्याचा परिणाम पुढील शेकडो वर्षे राहिला. अशा प्रकारच्या हिमयुगाला ‘ज्वालामुखीय हिमयुग’ (Volcanic Ice Age) म्हणतात. पृथ्वीच्या इतिहासात अशी कितीतरी ज्वालामुखीय हिमयुगे आल्याचे आढळून येते.

 

याचबरोबर काही ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर घडणाऱ्या घटनाही (Post Volcanic Activity) आहेत. यात गरम पाण्याचे झरे (Hot Springs), तप्त वायूचे प्रदेश (Fumaroles) व गेइझर्स (Geysurs) यांचा समावेश होतो. पृथ्वीच्या पोटात मॅग्माची पातळी सगळीकडे जशी समान नाही, तशीच भूजलाचीही नाही. काही वेळा मॅग्मा व भूजल एकमेकांच्या बरेच जवळ असतात. या मॅग्माच्या उष्णतेमुळे भूजल गरम होते व वाट मिळेल तसे झऱ्याच्या रूपात पृष्ठभागावर येते. हेच ते गरम पाण्याचे झरे. महाराष्ट्रातील वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. फ्युमारोल्स म्हणजे अशी जागा, जिथून तप्त वायू पृथ्वीच्या पोटातून बाहेर फेकला जातो. जेथे या वायूत प्रामुख्याने गंधक असते, त्या जागेला सोल्फाटारा (Solfatara) असे म्हणतात. ज्या ठिकाणी काही ठराविक कालावधीनंतर गरम पाणी व वाफ फवाऱ्याच्या स्वरूपात बाहेर सोडले जाते, त्या ठिकाणाला ‘गेइझर’ असे म्हणतात. अमेरिकेतील येल्लोस्टोन नॅशनल पार्क (Yellowstone National Park) मधील ओल्ड फेथफुल (Old Faithful) हे गेइझर प्रसिद्ध आहे. तर,ज्वालामुखीच्या प्रकारांची इतकी सखोल माहिती घेतल्यावर याची रचना, उद्रेकाची कारणे व परिणाम यांविषयी आपल्या मनात कुतूहल जागृत झाले असेलच. पुढील लेखात आपण या सर्व गोष्टी पाहू.

 

(संदर्भ - इंटरनेट – Textbook of Engineering and General Geology

–Parbin Singh- S. K. Kataria and Sons)


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@