भूकंपाशी दोन हात करताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018   
Total Views |


पृथ्वीच्या अंतरंगात - भाग ३

 

मागील लेखात आपण पृथ्वीच्या पोटात शिरून तिच्या रचनेविषयी माहिती घेतली. याचबरोबर भूकंपलहरींचाही थोडासा अभ्यास केला. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे नेऊन भूकंपलहरी व भूकंप यांविषयी माहिती घेऊया.
 

‘भूकंप’ ही संज्ञा सर्वांच्याच परिचयाची आहे. अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये ‘भूकंपामुळे एवढे बळी गेले. एवढ्या इमारती पडल्या. एवढे आर्थिक नुकसान झाले,’ या बातम्या आपण वाचतोच. हे सर्व नुकसान कमी करण्यासाठी भूकंपाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भूकंप म्हणजे काय? भूकंप या शब्दाची फोड भू आणि कंप अशी करता येते. म्हणजेच, भूगर्भातील विविध घडामोडींमुळे जेव्हा जमिनीचा थरकाप उडतो, त्या घटनेला ‘भूकंप’ (Earthquake) असे म्हटले जाते.

 

काही आवश्यक संज्ञा -

१. भूकंपाचे उगमस्थान (Focus) - ज्या ठिकाणी भूकंपलहरींचा जन्म होतो, त्या ठिकाणाला भूकंपाचे उगमस्थान म्हणतात. हे उगमस्थान पृथ्वीच्या पोटात काही मीटर ते शेकडो किलोमीटर इतके खोल असू शकते.

२. भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicentre) - जो प्रदेश पृथ्वीच्या पृष्ठभागावर व उगमस्थानाच्या सर्वात जवळ असतो, त्याला ‘भूकंपाचा केंद्रबिंदू’ म्हणतात. सर्व लहरी सगळ्यात आधी इथेच पोहचतात व सर्वात जास्त नुकसानही इथेच होते.

३. भूकंपलहरींचा वेग - ‘पी’ लहरी सर्वात वेगवान असून साधारणपणे त्यांचा वेग १ ते १४ किमी/सेकंद एवढा असतो. ‘एस’ लहरीचा वेग साधारणपणे १ ते ८ किमी/सेकंद एवढा असतो, तर ‘एल’ लहरीचा वेग सर्वात कमी म्हणजेच सुमारे १ ते ३ किमी/सेकंद एवढा असतो.

 

भूकंप कसा होतो? याचा अभ्यास करण्यासाठी ‘प्लेट टेक्टॉनिक्स (Plate Tectonics)’ हा सिद्धांत समजून घेतला पाहिजे, कारण ‘प्लेट मूव्हमेंट’ (Plate Movement) हेच भूकंपाचे प्रमुख कारण आहे. या प्लेट टेक्टॉनिक्स सिद्धांतानुसार, आपल्या पृथ्वीचे कवच हे अनेक प्रचंड आकाराच्या व वस्तुमानाच्या ‘खंडीय ठोकळ्यां’मध्ये (Continental Plates) विभागलेले आहे. यामध्ये ‘पॅसिफिक प्लेट’ (Pacific Plate) व ‘टेक्टॉनिक प्लेट’ (Tectonic Plate) असे दोन प्रकार आहेत. आपले सर्व खंड व सर्व महासागर हे या प्लेट्सवरच बसलेले आहेत. या प्लेट्स एकमेकांमध्ये घट्ट बसलेल्या असतात. या सगळ्या प्लेट्स मेटल व द्रवरूप गाभ्यावर सायीसारख्या तरंगत असतात. याशिवाय ‘इलॅस्टिक रिबाऊंड हायपॉथेसिस’ (Elastic Rebound Hypothesis) नावाचाही सिद्धांत आहे. हा सिद्धांत लाकडाच्या काठीचे उदाहरण घेऊन समजून घेऊ. सरळ काठीच्या दोन्ही टोकांवर बल लावल्यास व ती मध्ये तोडण्याचा प्रयत्न केल्यास काठी आधी थोडीशी वाकते. तेव्हा त्यात दाब (Stress) निर्माण होतो. तेव्हाच बल काढून टाकल्यास काठी परत तिच्या आधीच्या आकारात परत येते. काठी वाकल्यावरही बल अजून वाढवल्यास दाब वाढतो व सरतेशेवटी काठी तुटते. तेव्हा काठीचे दोन्ही भाग सरळ आकारात परत येतात. ही क्रिया घडत असताना त्यातून ऊर्जा निर्माण होते. अशाच प्रकारची क्रिया दोन ‘काँटिनेंटल प्लेट्स’मध्येही होते. काही कारणांमुळे या प्लेट्स हलल्या, तर त्यांच्यातील संतुलन (Equilibrium) बिघडते; तसेच त्यांच्या प्रचंड आकारमान व वस्तुमानामुळेही फार मोठा दाब त्यांच्यात निर्माण होतो. आपल्या उदाहरणातल्या काठीसारखीच त्यांची परिस्थिती होते व दोन प्लेट्समधील जो समान भाग (Plate Boundary) असतो, त्यावर हा सगळा दाब येऊन तो फाटू (Rupture) शकतो. तो फाटल्यामुळे जी ऊर्जा निर्माण होते, तिचे रुपांतर हादऱ्यांमध्ये होते. हेच हादरे पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रचंड नुकसान घडवतात. खरे तर, भूकंप किंवा कोणताही अपघात हा त्या परिसराचे किंवा क्रियेचे संतुलन ढासळल्यामुळेच होतो.
 

आता भूकंपाची आणखी काही कारणे बघू.

१. भूस्खलन (Landslide/ Rockslide) - मोठे भूस्खलन झाल्यामुळे जमिनीचा बराच मोठा भाग एकीकडून दुसरीकडे सरकतो. त्यामुळे, जिथून तो भाग सरकला आहे, त्या भागाचे वस्तुमान अचानक कमी होते व ज्या ठिकाणी तो भाग सरकला आहे, त्या भागाचे वस्तुमान अचानक वाढते. न्यूटनच्या नियमाप्रमाणे, वस्तुमानात फरक पडला की, वजनात म्हणजेच बलातदेखील फरक पडतो (F=ma/F=mg, m=mass, g=gravitational acceleration). त्यामुळे जमिनीचा बलीय समतोल (Stress Equilibrium) बिघडतो व त्यामुळे भूकंप होऊ शकतो.

 

२. खाणकाम - खाणकाम करताना आपण उत्खनन (Excavation) करतो. म्हणजेच जमीन उकरून आपल्या गरजेची खनिजयुक्त माती आपण काढून घेतो. त्यामुळे तेथे पोकळी निर्माण होते. आधीच खोदकामामुळे खडक अस्थिर होतात. हे अस्थिर खडक त्यांच्या जागेवरून हलू शकतात व प्रसंगी या पोकळीतसुद्धा पडू शकतात. जर एखादा मोक्याचाच खडक नेमका हलला, तर सगळ्या परिसराचे संतुलन बिघडते व भूकंप होतो. तसेच, जमिनीअंतर्गत खाणकाम करताना बऱ्याचदा खाणकाम सोपे होण्यासाठी स्फोट घडवून आणले जातात. त्या स्फोटाच्या अत्यंत तीव्र अशा धक्क्यांच्या लहरींमुळे (Shock Waves) भूकंप होऊ शकतो.

 

3.ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruption) - 

ज्वालामुखीच्या उद्रेकामधून पृथ्वीच्या पोटातील तप्त खडक, विविध वायू, वाफ, मॅग्मा (पृष्ठभागावर यालाच लाव्हा म्हणतात) हे सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. काही वेळा तर अक्षरश: काही क्षणात प्रचंड प्रमाणात हा उद्रेक होतो. क्षणांमध्ये घडणाऱ्या या घटनेमुळे फार मोठ्या परिसरातील बल (Force), तापमान (Temperature), वातावारण (Atmosphere) इ. सर्वांचेच क्षणार्धात संतुलन बिघडते. त्यामुळे भूकंप होऊ शकतो.

 

याशिवाय अण्वस्त्रांच्या स्फोटांमुळे, धरणाच्या बांधकामांमुळे गोष्टींमुळे भूकंप होतो. आता आपण भूकंपाचे परिणाम बघूया.

१. प्रचंड मनुष्य व वित्तहानी होते.

२. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत फरक पडू शकतो.

३. नद्यांचे प्रवाह व दिशा बदलू शकतात.

४. आत्ता अस्तित्त्वात असलेली जमीन पाण्याखाली जाऊ शकते व पाण्याखालील जमीन वर येऊ शकते.

५. समुद्राखाली भूकंप झाल्यास महाप्रचंड त्सुनामी लाटा निर्माण होऊ शकतात.

६. या लेखातच आधी लिहिल्याप्रमाणे जसा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतो, तसा भूकंपामुळेदेखील ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो.

 

अर्थात, सगळेच परिणाम वाईटच नसतात. भूकंपामुळे जमीन ढवळली जाऊन आतील खडक वर येतात. त्यांचा आपण वापर करू शकतो. पृथ्वीची सद्यस्थितीतील रचना बदलून काही अज्ञात गोष्टी समोर येऊ शकतात. त्यांचा अभ्यास करून पृथ्वीबद्दल अजून माहिती व ज्ञान घेता येऊ शकते.

 

आपण घ्यावयाची काळजी

भूकंप थांबवणे हे कोणाच्या हातात नाही; पण काही साधी काळजी घेतल्यास आपले संरक्षण करणे शक्य आहे.

१. भूकंपप्रवण क्षेत्रात राहत असल्यास शक्यतो माळ्यावर पटकन पडेल असे सामान ठेवणे टाळावे.

२.आपण घरात असल्यास व भूकंपात सापडल्यास ताबडतोब घराबाहेर जावे व सर्व बाजूंनी मोकळ्या जागेत आश्रय घ्यावा. झाडाखाली, अथवा कोणत्याही तत्सम गोष्टींजवळ जाऊ नये. भूकंपात झाडे अथवा भिंती पडण्याची शक्यता असते.

३. आपण घरात अडकून पडल्यास व बाहेर जाणे शक्य नसल्यास घरातील टेबल अथवा तत्सम अशा मजबूत फर्निचरखाली लपावे, यामुळे आपला जीव वाचू शकतो. शक्यतो डोक्याला इजा होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी.

४. भूकंपामुळे बऱ्याचदा गॅसवाहिन्या फुटतात व गॅस गळती होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आगीचा वापर करू नये. तसेच शॉर्ट-सर्किटनेही आगीचा धोका असतो. त्यामुळे विद्युतपुरवठा करणारी विद्युत उपकरणे बंद करावीत.

५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधी स्वत:ला वाचवावे आणि मगच लोकांच्या मदतीला जावे. ‘हिरोगिरी’चा प्रयत्न केल्यास दोघांचेही जीवन धोक्यात येऊ शकते.

तर, या लेखात आपण भूकंप म्हणजे काय? त्याची कारणे, परिणाम व आपण भूकंपप्रसंगी घ्यायची काळजी या गोष्टी बघितल्या. पुढील भागात आपण भूकंपमापन पद्धती व भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी लागलेले विविध शोध व युक्त्या यांची माहिती घेऊया.

 

संदर्भ

http://eqseis.geosc.psu.edu/cammon/HTML/Classes/IntroQuakes/Notes/wavesšandšinterior.html - Textbook of Engineering and General Geology - Parbin Singh - S. K. Kataria Sons

@@AUTHORINFO_V1@@