ते पंधरा दिवस : ४ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2018   
Total Views |
 

 
आज चार ऑगस्ट. सोमवार. दिल्लीत व्हॉइसरॉय, लॉर्ड माउंटबेटन यांचा दिवस जरा लवकरच सुरु झाला. दिल्लीतली हवा दमट होती. आभाळ भरून आलं होतं. तरी पाऊस पडत नव्हता. मळभ आल्यासारखं झालं होतं. एकुणातच वातावरण तसं मरगळलेलंच होतं. खऱ्या अर्थानं जबाबदारीतून मुक्त व्हायला लॉर्ड साहेबांना फक्त अकरा रात्रीच उरल्या होत्या. नंतरही अर्थातच ते भारतात राहणार होते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून. पण त्यात विशेष अशी जबाबदारी नव्हती. सारं काही भारतीय नेत्यांच्या खांद्यावर येणार होतं तेव्हा.
 
 
मात्र पुढील अकरा दिवस आणि अकरा रात्री या त्यांच्याच नियंत्रणात असणार होत्या. यातील प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टीचं खापर हे त्यांच्यावर आणि म्हणजेच पर्यायानं ब्रिटीश साम्राज्यावर फुटणार होतं. म्हणूनच ही जबाबदारी मोठी होती आणि तितकीच चिंताही..!
 
सकाळची पहिलीच बैठक ही बलोचिस्तान प्रांतासंबंधी होती. सध्या या संपूर्ण प्रांतावर इंग्रजांचं निर्विवाद वर्चस्व होतं. राज्य होतं. इराणला लागून असलेला हा प्रांत मुस्लिमबहुल होता. त्यामुळे अर्थातच हा प्रांत पाकिस्तानात जाणार हे अध्याहृत होतं. मात्र इथेच गोची होती. बलुच लोकांची तार कधी पंजाब आणि सिंधच्या पाकिस्तानवादी मुसलमानांशी जुळलीच नव्हती. बलुच लोकांची स्वतःची अशी संस्कृती होती. स्वतःची अशी भाषा होती. ती बरीचशी इराणच्या बलुच लोकांशी साधर्म्य असलेली होती. या बलुच भाषेत, संस्कृतशी जवळीक साधणाऱ्या ‘अवस्ता’ भाषेची झलक दिसत होती. त्यामुळे पाकिस्तानात सामिल होणे हा काही त्यांच्यासमोरचा पाहिला पर्याय नव्हता.
 
त्यांच्यापैकी काही जणांची इच्छा इराणबरोबर विलीन व्हावं ही होती. मात्र इराणमध्ये शिया मुसलमानांचं शासन होतं आणि ही बलुच मंडळी तर सुन्नी मुसलमान होती. त्यामुळे हा पर्याय बारगळला. भारतात विलीन व्हावं असाही एक प्रवाह होता. त्याला काही नेत्यांचं पाठबळ ही होतं. मात्र ‘मध्ये सिंध आणि पंजाब असल्याने भौगोलिक सलगता शक्य नाही’ या सबबीवर हा पर्याय ही मागे पडला. स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण उभे राहू शकू, की आपल्याला पाकिस्तानात विलीन व्हावं लागेल, या दोन पर्यायांवरच खल चालू होता. आजची ही बैठक त्याच संदर्भात होती. बैठकीत बलोचिस्तानचे ‘खान ऑफ कलात’, मीर अहमदयार खान आणि महंमद अली जीना होते. जीनांना सात ऑगस्टला कराचीला जायचं असल्याने त्यांच्या सोयीनेच ही सकाळची वेळ ठरवली होती.
 
बैठकीत मीर अहमदयार खान यांच्या, ‘भविष्यातील पाकिस्तान’ बद्दल अनेक शंका होत्या. अनेक प्रश्न होते. माउंटबेटनचा स्वार्थ होता की त्यांनी पाकिस्तानात विलीन व्हावे. कारण लहान स्वतंत्र राष्ट्रांमध्ये सत्तेचं हस्तांतरण करणं त्यांना जड जाणार होतं. आणि म्हणूनच बैठकीत जेव्हा महंमद अली जीना, हे मीर अहमदयार खान यांना भरमसाठ आश्वासनं देत होते, तेव्हा त्यातील काही आश्वासनांचा फोलपणा लक्षात येऊनही माउंटबेटन हे जीनांचेच समर्थन करत होते. मात्र दीड / दोन तासांच्या या बैठकीत, मीर अहमदयार खान हे पाकिस्तानच्या बाजूला जरासे झुकलेले वाटले, तरी त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर केला नाही आणि ही बैठक तशी अनिर्णय स्थितीतच संपली...!
 
तिकडे दूर पंजाबात, लायलपुर जिल्ह्यात दहशतीने आज आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती. लायलपुर हा सुपीक जिल्हा. आणि म्हणूनच श्रीमंत आणि समृद्ध ही. भरपूर कापूस. मुबलक गहू. कापसामुळे अनेक सूत गिरण्या, कारखाने या जिल्ह्यात आले होते. पिठाच्या आणि साखरेच्या ही भरपूर गिरण्या होत्या. लायलपुर, गोज्रा, तंडेनवाला, जरनवाला या ठिकाणी मोठमोठे दाणे बाजार होते. आणि हा सर्व व्यापार, या सर्व गिरण्या, कारखाने, बाजार हे हिंदू – शिखांच्याच हातात होते. साठ जॉइंट स्टॉक कंपन्या हिन्दू – शिखांच्या होत्या, तर मुसलमानांच्या फक्त दोन. शीख लोकांकडे जिल्ह्यातली ७५% पेक्षा जास्त जमीन होती आणि एकूण शेतसाऱ्याच्या ८०% शेतसारा, फक्त शीख भरत होते. १९४६ मधे हिंदू – शिखांनी ६१ लाख ९० हजार रुपये कर भरला होता, तर मुसलमानांनी फक्त ५ लाख ३० हजार रुपये..!
 
 
त्यामुळे जेव्हा हा जिल्हा पाकिस्तानात सामिल होईल अशा बातम्या येऊ लागल्या आणि मुस्लिम लीगची पत्रकं दिसायला लागली, तेव्हाही हिंदू – शीख व्यापाऱ्यांनी त्याला गंभीरतेनं घेतलं नाही. जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर हमीद हे मुसलमान असूनही निःपक्षपाती वागत होते. त्यामुळे इथे काही त्रास होईल असं कोणालाही वाटलं नाही.
 
 
आज सोमवारी, चार ऑगस्टला जिल्ह्याच्या जरनवालामध्ये ‘मुस्लिम नॅशनल गार्ड’ची एक बैठक चालू होती. ‘पंधरा ऑगस्टच्या आत, या हिंदू – शीख व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना इथून कसं हुसकावून लावता येईल आणि त्यांची मालमत्ता कशी आपल्या ताब्यात घेता येईल’ या संबंधी गंभीरपणे खल चालू होता. ‘हिंदूंच्या पोरींना उचलण्यावर’, लाहोरहून आलेल्या ‘मुस्लिम नॅशनल गार्ड’च्या पदाधिकाऱ्याने भर दिला होता. आज छोटी – मोठी कार्यवाही करण्याचं निश्चित झालं. मध्यरात्री तिथल्या सूतगिरणीच्या मालकाच्या घरावर हल्लाबोल करायचं हे ही ठरलं.
 
 
‘पुढच्या फक्त तीनच आठवड्यात लायलपुर जिल्ह्यातले जवळ जवळ सर्व हिंदू – शीख आपापली संपत्ती, समृद्धी, घर, दार सोडून निष्कांचन अवस्थेत शरणार्थी शिबिरात भाकरीच्या एका तुकड्यासाठी लाचार होणार आहेत, त्यांच्यातील अर्धे हिंदू – शीख कापून काढले जाणार आहेत आणि काही हजार हिंदू मुली पळवल्या जाणार आहेत’ असं कोणी सांगीतलं असतं, तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं..!
 
 
दिल्लीच्या १७, यॉर्क रोड, या नेहरूंच्या निवासस्थानी तशी धावपळच होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचं गठन होत होतं. त्या संबंधीच्या अनेक औपचारिक बाबी पूर्ण करायच्या होत्या. काल डॉ. राजेंद्र प्रसादांना मंत्रिमंडळ स्थापने विषयीचं पत्र देण्याचे राहून गेले होते. ते आज सकाळी नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसादांच्या घरी पाठवले.
 
 
श्रीनगरमध्ये गांधीजींची सकाळ रोजच्यासारखीच झाली. गेल्या तीन दिवसांपासून त्याचं निवासस्थान झालेलं किशोरीलाल सेठी यांचं घर तसं प्रशस्त होतं. मात्र आता प्रस्थान करण्याची वेळ येऊन ठेपली होती. पुढचा मुक्काम जम्मूचा होता. मात्र तिथे फारसं न थांबता गांधीजींना पंजाबात जायचं होतं. त्यामुळे प्रार्थना आटोपल्यावर गांधीजींनी त्यांचा अल्प -स्वल्प नाश्ता केला. सकाळपासूनच त्यांना निरोप द्यायला शेख अब्दुल्लांची बायको बेगम अकबर जहान आणि मुलगी तिथे आले होते. गांधीजींनी आपलं पूर्ण वजन खर्च करून शेख साहेबांना तुरुंगातून बाहेर काढावं, ही बेगम साहेबांची तहे दिल इच्छा होती. त्या अनुषंगाने बेगम साहिबा, गांधीजींना वारंवार त्याची आठवण करून देत होत्या. गांधीजी ही, आपल्या बोळक्या तोंडानं, दंतविहीन हास्य करत, त्यांना दुजोरा देत होते. (त्या वेळी बेगम साहिबांना याचा बिलकुल अंदाज नव्हता की गांधीजींना केलेल्या या विनवणीचा उपयोग होऊन शेख साहेब त्यांच्या शिक्षेच्या किती तरी आधी, फक्त दीड महिन्यांनीच तुरुंगातून बाहेर येतील)
 
 
दाराबाहेर गाड्यांचा काफिला उभा होता. घरमालक किशोरीलाल सेठी स्वतः जातीने व्यवस्थेवर लक्ष ठेवायला होते. राज दरबारातूनही एक अधिकारी निरोप देण्यास आलेला होता. बरोबर दहा वाजता गांधीजींच्या काफिल्यानं, गांधीजींची पहिली काश्मीर यात्रा संपवून, जम्मूच्या दिशेनं कूच केलं होतं.
 
 
सईद हारून हा पोरगा अवघ्या १९ वर्षांचा. पण जीनांचा परमभक्त. कराचीतच लहानाचा मोठा झाला. पुढे कॉलेजमध्ये आल्यावर ‘मुस्लिम लीग नॅशनल गार्ड’च्या संपर्कात आला आणि त्यांचा खंदा कार्यकर्ता झाला.
 
 
 
 
 
दुपारी चार वाजता, कराचीच्या क्लिफ्टन या अत्यंत पॉश वस्तीत असलेल्या मशिदीत त्याने मुस्लिम तरुणांची एक बैठक बोलावली होती. कराचीमधून सगळ्या हिंदूंना हुसकावून लावण्याच्या वेगवेगळ्या उपायांवर तिथे चर्चा होत होती.
 
 
सात तारखेला स्वतः जीना कराचीमध्ये यायचे होते. त्यांच्या स्वागताची तयारी, हा देखील बैठकीत चर्चेला आलेला मुद्दा होता. नॅशनल गार्डचे सर्व तरुण कार्यकर्ते भारून गेलेले होते. गेले काही दिवस या सर्वांचे प्रशिक्षण चालले होते. मात्र ‘ते आरएसएसवाले जास्त चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देतात’, असं गुलाम रसूलचं म्हणणं पडलं. आरएसएसचे कार्यकर्ते आणि काही कडवे शीख सोडले तर आपल्याला प्रतिकार फारसा होणार नाही, यावर त्या ‘मुस्लिम लीग नॅशनल गार्ड’च्या तरुणांचं एकमत झालं...!
 
 
सकाळची व्हॉईसरॉय हाऊसमधली बैठक आटोपून आता बॅरीस्टर महंमद अली जीना हे त्यांच्या ‘१०, औरंगजेब रोड’ या बंगल्यात परत आले होते. दिल्लीच्या लुटीयन्स झोन मधला हा बंगला जीनांनी १९३८ मध्ये विकत घेतला होता. अत्यंत प्रशस्त अशा या बंगल्याने गेल्या चार / पाच वर्षांत अनेक राजकीय बैठकी बघितल्या होत्या. जीनांना काही महिन्यांपूर्वीच कळून चुकलं होतं की आता आपले दिल्लीतले दिवस हे संपत आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी हा बंगला एक महिन्यापूर्वीच प्रसिद्ध व्यवसायी रामकृष्ण दालमिया यांना विकून टाकला होता.
 
 
 
 
जीनांना हे कुठे तरी जाणवत होतं की आपल्या पुढच्या दोन – तीन रात्रीच फक्त या बंगल्यातल्या (आणि कदाचित भारतातल्या ही) शेवटच्या रात्री आहेत. त्यामुळे त्यांना आवरासावर करायला ही थोडा वेळ हवा होता. गुरुवार, सात ऑगस्टला, दुपारी ते व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी देऊ केलेल्या त्यांच्या डाकोटा प्रकारातल्या विशेष विमानाने कराचीला जाणार होते. कराचीला. पाकिस्तानात. त्यांच्या स्वतःच्या स्वप्नातल्या देशात..! मात्र एका शिष्टमंडळाला त्यांनी वेळ देऊन ठेवला होता. हे प्रतिनिधीमंडळ होतं, दख्खनमधल्या हैदराबादच्या निझामाचं. निझामाला भारतात विलीन व्हायचं नव्हतं. पाकिस्तानात विलीन होणं हे भौगोलिकदृष्ट्‍या शक्य नव्हतं आणि म्हणूनच निझामाला स्वतंत्र राहायचं होतं. स्वतंत्र हैदराबाद स्टेट..!
 
 
अशा या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या निझामाच्या ‘राष्ट्राला’, इतर देशांबरोबर व्यापार करण्यासाठी एखाद्या बंदराची आवश्यकता होती. हैदराबाद स्टेटला लागून समुद्र नव्हता. आणि अर्थातच बंदरही नव्हते. त्यामुळे स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या हैदराबाद स्टेटला, समुद्री बंदरासाठी भारतातून मार्ग (एक्सेस) मिळावा, यासाठी जीनांनी व्हॉईसरॉय माउंटबेटनना पत्र लिहावे ही विनंती घेऊन हे प्रतिनिधीमंडळ आले होते. जीनांनी त्यांची आवश्यक ती खातिरदारी केली. निझामाला दुखावून चालणार नव्हते. एका मोठ्या भूभागावर त्याचे राज्य होते. अफाट पैसा होता. आणि तो मुसलमान होता. म्हणूनच जीनांनी त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतलं. व्हॉईसरॉयना तसं पत्र लिहिण्याचं आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली.
 
 
एव्हाना संध्याकाळ होत आलेली होती. आकाशात अजूनही ढग होते. संध्याकाळच्या या वातावरणात एक प्रकारचं औदासिन्य पसरलेलं वाटत होतं. मात्र या मरगळलेल्या वातावरणातही, ‘दोनच दिवसांत आपल्या स्वप्नातल्या देशात जाणार’ म्हणून जीना, आपल्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करत होते...!
 
तिकडे दूर मुंबईत, लेमिंगटन रोडवर, नाझ सिनेमा जवळचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय. कार्यालय तसं लहानसंच. मात्र आज या संपूर्ण परिसरातच चैतन्य जाणवत होतं. अनेक स्वयंसेवक कार्यालयाकडे जाताना दिसत होते. संध्याकाळ होऊन दिवेलागणी झालेली होती. आज कार्यालयात सरसंघचालक श्री गुरुजी प्रत्यक्ष हजर होते. गुरुजींच्या बरोबर ठरलेली मुंबईच्या संघ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपलेली होती. बैठकीनंतर संघाची प्रार्थना ही झालेली होती. विकीर झाले. स्वयंसेवक व्यवस्थित रांगांमधून बाहेर आले. सर्वांनाच गुरुजींना भेटायचं होतं. गुरुजींबरोबर अश्या अनौपचारिक बैठकी खूपच रंगत.
 
 
 
 
आज मात्र स्वयंसेवकांच्या मनात या बैठकीच्या कुतुहलाबरोबरच चिंतेची छटा ही होती. उद्यापासून चार दिवसांसाठी गुरुजी सिंध प्रांताच्या प्रवासाला निघाले होते. तीन जूनच्या फाळणीच्या निर्णयाप्रमाणे सिंध प्रांत हा पूर्णच्या पूर्ण पाकिस्तानात जाणार होता. कराची, हैदराबाद, नवाबशाह ही शहरं असलेला सिंध भारतात नसणार ही जाणीव प्रचंड वेदना देणारी होती. मात्र त्याचबरोबर स्वयंसेवकांना चिंता वाटत होती ती सिंधमध्ये भडकलेल्या दंग्यांची. मुस्लिम लीग च्या ‘मुस्लिम नॅशनल गार्ड’ने पंधरा ऑगस्टच्या आत सिंधमधून हिंदूंना हुसकावून लावण्याचा चंग बांधला होता. कराची ही होऊ घातलेल्या पाकिस्तानची तात्पुरती राजधानी असल्यासारखी झाली होती त्यामुळे कराचीत बराच पोलीस आणि लष्करी बंदोबस्त होता. अर्थातच कराचीत हिंदुंवर होणाऱ्या आक्रमणांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र हैदराबाद, नवाबशाह सारख्या शहरांत आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या मुली पळवणे, त्यांच्या घरांना / कारखान्यांना आगी लावणे, दोन-चार हिंदू वेगळे सापडले तर त्यांना कापून काढणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालले होते.
 
अशा परिस्थितीत गुरुजींच्या सुरक्षेची चिंता स्वयंसेवकांना वाटत होती आणि ती त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत होती. सिंध पेटलेलं होतं. दंगे उसळलेले होते. मोठ्या प्रमाणावर हिंदू मुलींना मुसलमान गुंड उचलून नेत होते. अनेक ठिकाणी तिथल्या पोलिसांचं सक्रिय समर्थन या मुसलमान गुंडांना होतं. आणि अश्या स्थितीत संघ स्वयंसेवक, हिंदूंना जमेल तशी मदत करत होते. त्यांना भारतात सुखरूप आणण्याचा प्रयत्न करत होते. अशा बहाद्दर संघ स्वयंसेवकांना भेटायला, गुरुजी, डॉ. आबाजी थत्त्यांना बरोबर घेऊन सिंध मधल्या दंगलींच्या वणव्यामध्ये चालले होते....!
 
रात्रीचे अकरा वाजलेले. ऑगस्टची ती दमट हवा. सिंध, पंजाब, बलोचीस्तान, बंगाल या प्रांतांमध्ये अधिकांश हिंदू – शीख घरात जागरण चालू होते. दहशतीच्या या वातावरणात कोणालाही झोप येणे शक्यच नव्हते. घराबाहेर तरुणांची गस्त चालू होती तर घरांमध्ये, असलेली शस्त्र जमवून म्हातारे – कोतारे, वडील माणसं, चिंतातूर चेहऱ्यांनी बसली होती. देशाच्या फाळणीला आता फक्त दहा रात्रीच शिल्लक होत्या.
 
लायलपुर जिल्ह्याचं जरनवाला गाव. हे शहराशी साधर्म्य सांगणारं गाव तसं जागंच होतं. हिंदू – शीख मोठ्या संख्येने होते. त्यामुळे मुसलमानांचे आक्रमण होणार नाही हा आशावाद होता. मात्र रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक गावाच्या तीन बाजूंनी पन्नास – साठ, मुस्लिम नॅशनल गार्डचे कार्यकर्ते धावत आले. जवळपास प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण धार असलेल्या तलवारी किंवा फरसे होते. ’अल्ला हुं अकबर..’चे नारे गर्जू लागले आणि सरदार कर्तारसिंहांच्या घरावर ही टोळधाड आली. घर कसले, गढीच होती ती. आत सरदारांचा १८ लोकांचा परिवार होता. कृपाण आणि तलवार घेऊन ती सारी पुरुष मंडळी सज्ज झाली. स्त्रियांच्या ही हातात लाठ्या आणि चाकू होते. कर्तारसिंहांच्या डोळ्यात रागाने रक्त उतरले होते. तितक्यात बाहेरून फेकलेला, केरोसीनमध्ये भिजवलेला, कापसाचा पेटता बोळा आत आला आणि नेमका बाहेर असलेल्या खाटेवर पडला. खाट जळू लागली. तोवर दुसरेही पेटते बोळे घराच्या आत पडू लागले आणि मग कर्तारसिंह आणि त्यांच्या परिवाराला बाहेर जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
 
‘जो बोले सो निहाल... सत् श्री अकाल...!’ अशा घोषणा देत, क्रोधाच्या ज्वाळा डोळ्यांनी फेकत, कर्तारसिंहांच्या परिवारातले ते ११ रणझुंजार तलवारी अन् कृपाण चमकवत बाहेर पडले.. सुमारे अर्धा तास दिगदिगंत शौर्याने लढले आणि त्यातील नऊ जणं अक्षरशः कापले गेले. धावून आलेल्या हिंदू गावकऱ्यांच्या मदतीनं त्यातील दोघे वाचले. घरात लपलेल्या सात बायकांपैकी चौघींना या मुस्लिम नॅशनल गार्डच्या कार्यकर्त्यांनी जाळून मारलं, तर दोन तरण्याताठ्या पोरींना ते घेऊन पळाले. खुद्द कार्तारसिहांची बायको कुठे गेली कोणालाच कळलं नाही..!
 
दहशत निर्माण झाली होती.. चार ऑगस्टच्या मध्यरात्री असं अनेक ठिकाणी घडत होतं. हिंदू शीख कुटुंबं आपलं सारं सारं सोडून हिंदुस्थानात जाण्याच्या मनःस्थितीत येत होते...!!
 
 
 
 
प्रशांत पोळ
‘मैत्र’, ११२६, समाधान हॉस्पिटलच्या बाजूला,
राईट टाऊन,
जबलपुर – ४८२ ००२
भ्रमणध्वनी : ०९४२५१ ५५५५१ ई-मेल : [email protected]
 
 
 
 
 मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ३ ऑगस्ट १९४७
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@