प्रतिभा आणि संघर्ष - एलिझाबेथ गिल्बर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018   
Total Views |



एखादा गायक असतो. आवाजात गोडवा असतो, गाण्यात भावना असतात. जोडीला काही वर्षांच्या रियाझाची साथ असते. एका मागून एक कार्यक्रम होत जातात. उमेदवारीची वर्षं संपतात. स्वतः चे शोजसुद्धा गाजायला लागतात. गायक एक उंची गाठतो, स्वतः ची अशी बेसलाईन सेट करतो. ह्यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची तुलना स्वतः गायकाने तयार केलेल्या बेसलाईनशी होणार असते. गाठलेली उंची आता त्याला त्रासदायक व्हायला लागते. रसिकांच्या अपेक्षा कायम पूर्ण करत राहणं त्याच्यासाठी आव्हान व्हायला लागतं. यशस्वी झाल्यावर स्वतः च्या प्रतिभेसोबत त्याचा संघर्ष चालू होतो.

एखादी कवयित्री असते. तिच्याकडे शब्दांचं देणं वगैरे असतं, सरस्वतीची कृपा असते. र ला ट लावायची गरज नसते. मुक्तछंदापासून यमकापर्यंत सगळ्यात हातखंडा असतो. आशयघनतेची वानवा नसते. एकामागून एक कविता स्फुरत जातात. रसिकांच्या पसंतीला उतरतात. हिचीही स्वतःची एक बेसलाईन सेट होते. प्रत्येक रचनेनंतर लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. प्रतिभेतला बहर वाढत जातो आणि एक आंतरिक संघर्ष चालू होतो. स्वतः ला सातत्याने त्या बेसलाईनच्या वरती ठेवायचा. अपयश न येऊ द्यायचा. कायम चांगलंच द्यायचा.

वादक, चित्रकार, खेळाडू, कला आणि क्रीडा क्षेत्रातले सगळे, इतकंच काय तर फॅशनपासून कूकिंगच्या क्षेत्रात वावरणारे सगळे ह्या प्रकारच्या कॅटेगरीत येतात. स्वतःच्या मेहेनतीने एका पातळीवर पोहोचलेले, स्वतःची एक बेसलाईन सेट केलेले आणि मग आपणच गाठलेल्या उंचीशी संघर्ष करणारे.

एलिझाबेथ गिल्बर्ट ही एक अमेरिकन लेखिका आहे. 'ईट प्रे लव्ह' ह्या तिच्या पुस्तकाच्या हजारो प्रति संपल्या. त्याच पुस्तकावर एक चित्रपट निघाला. त्या चित्रपटात ज्युलिया रॉबर्टसने काम केलं होतं.

एलिझाबेथला लहानपणापासून लेखनाची आवड होती. मोठेपणी आपल्याला लेखकच व्हायचं आहे हे तिच्या डोक्यात एकदम फिट बसलं होतं. तरुणपणात अनेक वर्षं लेखनाच्या क्षेत्रात तिने उमेदवारी केली. अनेक नकारांनंतर 'ईट प्रे लव्ह' ही तिची कादंबरी आली. ह्या कादंबरीने रातोरात तिला स्टार केलं. पुस्तकाच्या अनेक कॉपीज विकल्या गेल्या आणि तिचं नाव समीक्षक आणि वाचकांमध्ये सर्वश्रुत झालं. प्रसिद्धीच्या एका नवीन उंचीवर ती जाऊन पोहोचली.

वाचकांच्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या. येणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची तुलना आता 'ईट प्रे लव्ह' बरोबर होईल आणि आत्तापर्यंत मिळालेल्या प्रसिद्धीला कारक ठरलेलं अपत्य असलेलं तिचंच पुस्तक तिच्या संघर्षाचं एक कारण ठरेल ह्याची जाणीव तिला झाली.
आपणच प्रस्थापित केलेल्या बेसलाईनशी होणारा संघर्ष, त्यात होणारी घुसमट, यशापयशाची गणितं, प्रायोगिकतेची भिती, लोकांचा नवीन रचनेला अपेक्षित/ अनपेक्षित प्रतिसाद ह्यात तिला इतर कलाकारांचा तोच झगडा दिसायला लागला. त्यांचं नैराश्य जाणवायला लागलं. सर्व रचनाकारांच्या रचनेच्या प्रवासातल्या आनंदाचा, नैराश्याचा आणि संघर्षाचा धांडोळा तिने आपल्या वेगवेगळ्या छोटेखानी भाषणातून घेतला आहे.

प्रतिभा ही प्रत्येक कलाकाराला लाभलेली एक दैवी देणगी असते. ती कलाकाराला सर्वसामान्यांपासून वेगळी करत असते. वेगवेगळ्या मानवी संस्कृतींमध्ये प्रतिभेच्या उगमाच्या स्रोत वेगवेगळा मानला गेलाय. संस्कृती विकसित होत गेल्या तशी ह्या स्रोतांची व्याख्या बदलली आहे.

एलिझाबेथने वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या प्रतिभेच्या स्त्रोतांचा शोध घेतला आहे. काही ठिकाणी प्रतिभा हा एक अंगभूत गुण मानला जातो. मात्र बऱ्याच समूहांमध्ये हे दैवी देणं मानलं गेलंय. जिनियस किंवा प्रतिभा नावाचा प्रकार माणसाच्या आकलनाच्या पलीकडचा असल्यामुळे प्रतिभा शरीराच्या बाहेरून कुठूनतरी प्रवेश करतो, असं आजही मानलं जातं. कर्ता करविता हा कोणीतरी दुसराच असून आपण फक्त त्याचं माध्यम होत असतो, ही जाणीव जवळपास सर्वत्र सर्वमान्य आहे.

काही संस्कृतीत आपल्या सर्वोत्तमाचं श्रेय सैतानाला दिलं तर काहींनी देवाला. भारतीय संस्कृतीने मात्र बव्हंशी ते देवाला दिलंय. कदाचित म्हणूनच बुद्धीच्या आकलनापलीकडच्या कलेला दैवी म्हंटलं जातं. अगदी ज्ञानेश्वरांनीसुद्धा स्वतःच्या सर्व रचनांचा करविता विठोबा असल्याचं म्हंटलं आहे.
बरं ही प्रतिभा कधी कुठे गाठेल ह्याचा चॉईस कलाकारांना नाहीये. कधीकधी इतकं सहज, जातायेता, ट्रेनमध्ये, गर्दीत, अगदी बाथरूममध्येसुद्धा भराभर सुचत जाणारे लोकं आहेत. पाडगावकर आणि खळेंनी काही गाणी अशीच येताजाता बस आणि ट्रेनच्या प्रवासात केली आहेत. अगदी निवांत समाधी वगैरे लावूनच हवं ते सुचेल ह्याची खात्री कुणी देऊ शकलेला नाहीये. हृदयनाथांनी सुरेश भटांचं दिलेलं उदाहरण अगदी त्याला लागू आहे. अनेक दिवस हॉटेलमध्ये निवांत बसून भटांना जे सुचलं नाही ते टॅक्सी पकडायच्या क्षणी उभ्या उभ्या सुचून गेलं.

सुचण्याचा तो क्षण फार युनिक असल्याचं काही जण म्हणतात. तो गाठला नाही, तेव्हा सुचलेलं लिहिलं नाही, तो सूर लिहून ठेवला नाही तर ते हातून सुटून जाईल आणि पुन्हा तितक्या ताकदीने परत यायचं नाही, ह्याची खात्री त्या कलाकाराला झालेली असते. आणि ह्या भीतीतुन प्रतिभेची शिकार झालेला तो ते उतरवून घ्यायला आतुर होतो. ती प्रतिभेची वेळ टळली तर ते पुन्हा गावसणार नसतं. म्हणून सगळी धडपड चालू होते.

एखाद्या वेळी कोणी काही लिहायला सांगितलं, कोणी एखादं चित्रं काढायला सांगितलं, काही गायला सांगितलं तर आपला मूड नसल्याचं कित्येक कलाकार सांगतात. हव्या त्या ताकदीचं त्या क्षणी उतरणार नसतं, ह्याची त्यांना खात्री असते. ज्याला ते लोकं 'मूड' हे नाव देतात, तो नक्की मूडच असतो की त्या वेळेला त्यांच्या बुद्धीत, मेंदूत, शरीरात, हातात असलेला प्रतिभेचा अभाव असतो? असेलही कदाचित!

मानवी शरीर हे त्या त्या प्रतिभेसाठी मध्यम बनलेलं असतं. काही लोकं जन्माला येताना काही घेऊन येतात, त्यांना त्याची जाणीव हळूहळू होत जाते. तो माणूस त्याच्या क्षेत्रात उत्तम होत जातो. प्रॅक्टिसने, रियाझाने, सरावाने परफॉर्मन्स देता येतो. मात्र दैवी काही निर्माण व्हायला प्रतिभेच्या त्या उत्तुंग क्षणाची वाट बघत राहावी लागते. तो क्षण येतो, अत्युच्च निर्मिती होते. आनंदाचे डोही, आनंद तरंग असा काही अनुभव कलाकार स्वतःही घेतो. बेसलाईन प्रस्थापित झालेली असते. प्रतिभेने ती करून घेतलेली असते.

मात्र ती प्रतिभा चिरकालीन नसते. कुठूनतरी आलेली प्रतिभा तशीच निघून जाते. तिचं वाहन बनलेली व्यक्ती प्रतिभावान राहत नाही. ती व्यक्ती पुन्हा एकदा सर्वसामान्य होऊन जाते.


कलाकारांना ह्या सर्वसामान्यतत्वाची भिती वाटत राहते. प्रॅक्टिसने सर्वसाधारण कला सादर करता येते. पण ते दैवी पुन्हा अवतरायला पुन्हा त्या क्षणाची वाट बघत राहावं लागतं. प्रतिभेसाठी आणि आपल्याच बेसलाईनशी संघर्ष पुन्हा चालू होतो.

प्रतिभेच्या ह्याच सर्व प्रक्रियेचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कलाकारांना येणाऱ्या नैराश्यावरच्या उपायांचा मागोवा एलिझाबेथने तिच्या TED talk मध्ये फार प्रवाहिपणे घेतला आहे.

आपल्या आयुष्यात काही ना काही घडवणाऱ्या प्रत्येकाने नक्की पहावी अशी talk ही आहे. लिंक सोबत देतोय.





- सारंग लेले
@@AUTHORINFO_V1@@