गजाननभक्तांचे समग्र चित्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018   
Total Views |



संतसाहित्याचे निरंतर वाचन, चिंतन, मनन करूनही भक्तांची आध्यात्मिक तहान काही भागत नाही. भक्तांना वारंवार अभंग, ओव्या, उपदेश नकळतपणे खुणावत असतात. अशा भक्तिपूर्ण ग्रंथांच्या पारायणानेही भक्त भक्तिसागरात अगदी आकंठ बुडून जातात. संतांच्या, गुरूंच्या पारमार्थिक शक्तीइतकीच भक्ताची निस्सीम भक्ती, आस्था यामुळे संतांसोबत जोडले गेलेले ते अदृश्य नाते शब्दातीत होऊन जाते. त्या संतांना, गुरूवर्यांना त्यांच्या भक्तांना आपण प्रत्यक्ष पाहिले नसले तरी, ग्रंथांतून त्यांचे अवघे चारित्र्य उलगडते. त्या दिव्य शक्तीची एक अनुभूती अलगद मनाला स्पर्शून जाते. आपणही मग त्या भक्तिशक्तीशी एकरूप होऊन जातो आणि भक्तीचा हा अनुपम सोहळा साहित्यातून मनात पाझरतो. जीवन अधिक समृद्ध, संपन्न होते आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात जगण्याची एक स्फूर्ती, प्रेरणा हे ग्रंथ जागरूक ठेवतात. याचाच प्रत्यय प्रा. शरयू जाखडी यांच्या ‘समकालीन भक्त अंतरंगात-शेगावचा योगिराणा’ या पुस्तकाच्या वाचनानंतर येतो.

 

गजानन महाराज... केवळ महाराष्ट्रभूमी नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातूनही महाराजांच्या दर्शनाला शेगावला आवर्जून भेट देणारे भक्त आजही दिसतात. महाराजांप्रती असलेली असीम निष्ठा आणि परमोच्च भक्ती अनेकांना या शेगावनगरीत आपसुक घेऊन येते. गजानन महाराजांच्या, त्यांच्या भक्तांच्या कथा श्री गजानन विजय ग्रंथात विस्ताराने वाचायला मिळतातच. पण, तरीही प्रा. शरयू जाखडी यांनी याच गजानन भक्तांच्या अंतरंगात डोकावण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद म्हणावा लागेल. कारण, महाराजांचे चरित्र उलगडणारे त्यांच्या भक्तांचे असे अनेक ग्रंथ यापूर्वीही प्रकाशित झाले आहेत आणि ते तसे यापुढेही होतही राहतील. पण, या पुस्तकात प्रा. शरयू जाखडी यांनी महाराजांच्या जीवनप्रवासात त्यांना भेटलेल्या काही भक्तांचे, त्यांच्या अनुभवांचे सुबोध चित्रण प्रस्तुत केले आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, उपलब्ध आध्यात्मिक ग्रंथांची अशाप्रकारे चिकिस्तक पद्धतीने मांडणी करणे तितकेसे सोपे नाही. कारण, बरेचदा मग नवीन पुस्तकातील साहित्याकडे मूळ ग्रंथाचीच सुधारित प्रत वगैरे दृष्टिकोनातूनही पाहण्याची शक्यता असते. पण, प्रा. शरयू जाखडी यांनी अतिशय समर्थपणे, गांभीर्याने आपल्या पुस्तकाची एकूणच मांडणी केलेली दिसते.

 

बंकटलाल, बाळाभाऊ, बायजाबाई, भास्कर पाटील, हरी पाटील, जानकीराम, जानराव देशमुख यासारख्या महाराजांच्या काही निवडक भक्तांच्या गोष्टी या पुस्तकात सुलभ पद्धतीने लेखिकेने शब्दबद्ध केल्या आहेत. पुस्तकाचे वाचन करताना त्याचा तसा पदोपदी प्रत्ययही येतोच. महाराजांच्या संपर्कात ही भक्तमंडळी कशी आली? सुरुवातीपासूनच त्यांचा महाराजांवर विश्वास होता का? या भक्तांच्या आयुष्यात झालेले चमत्कार, गजानन महाराजांचा साक्षात्कार आणि त्यानंतर त्यांचे बदलेलेले आयुष्य यांचा सांगोपांग विचार या पुस्तकात केलेला दिसतो. ‘लेखनामागची भूमिका’ मध्ये विशद केल्याप्रमाणे, लेखिका भक्तांच्या मनातील आर्तभाव साकारताना कल्पनाविलासातही रममाण झाल्या आहेत. तसेच काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचाही विचार लेखिकेने केलेला दिसतो. त्यासाठी भगवद्गीता, ज्ञानेश्वरीचाही आधार घेतल्याचे लेखिका अगदी प्रांजळपणे नमूद करतात. सोपी, सहज शुद्ध भाषा हे लेखिकेच्या लेखणीचे वैशिष्ट्य पुस्तकाचे अगदी शेवटचे पान वाचेपर्यंत कायम राहते.

 

प्रभाकर पांचाळ यांच्या चित्रांनी पुस्तकाचे अंतरंग अधिक खुलवले आहेत. त्यांनी काढलेले गजानन महाराज-बंकट भेटीचे चित्र असो अथवा मंडालेच्या तुरुंगातील भगवद्गीतेत तल्लीन झालेले लोकमान्य टिळक असो, प्रत्येक चित्रात भावनांचा जीवंतपणा प्रतिबिंबित होतो. शेगावीच्या योगिराणाचे मुखपृष्ठावर कांचन गोडबोले यांनी रेखाटलेले चित्रही विशेष लक्ष वेधून घेते. लेखिकेने पुस्तकाच्या मजकुराबरोबरच त्याच्या एकूणच दर्जाची विशेष काळजी घेतली, याबद्दलही त्या कौतुकास पात्र ठराव्या. गजानन महाराजांचे चरित्र, त्यांच्या भक्तांचा महिमा अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे, गजानन भक्तांना भेट द्यावे, असेच.

 

पुस्तकाचे नाव : समकालीन भक्त अंतरंगात- शेगावचा योगिराणा

लेखिका : प्रा. शरयू जाखडी

प्रकाशन : विजया प्रकाशन

पृष्ठसंख्या : २२४

मूल्य : २०० रुपये

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@