चाळीसगावात संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अग्रणी संस्था

    21-Nov-2018
Total Views | 59

शैक्षणिक विश्वात क्रांती : गुरुकुल ट्रस्ट संचालित ‘बालविकास मंदिर, हरणाताई जोशी शाळा’ सामंत माध्य.विद्यालय’


चाळीसगाव
संस्कारक्षम गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अग्रणी संस्था म्हणून सर्वच थरातील विद्यार्थी आणि पालक तसेच विद्वान विचारवंत यांच्या कौतुकाचा विषय आहे,
 
चाळीसगाव येथील गुरुकुल ट्रस्ट संचलित ‘गुरुकुल बालविकास मंदिर, हरणाताई जोशी प्राथमिक विद्यालय’ तसेच तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय’ हे 3 स्तरीय सरस्वतीचे मंदिर सर्वच क्षेत्रात एवढी अभिमानास्पद कामगिरी करीत आहे, की त्याचा त्रोटक, संक्षिप्त आढावा घेणे हाही प्रबंधाचा, डॉक्टरेटचा विषय होऊ शकतो.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सेवाभावासोबत पारदर्शी, प्रामाणिक व्यवहार करणारी ही वर्धिष्णू संस्था समर्पण भावनेने उभी केली आहे. चाळीसगाव परिसरात या संस्थेने मिळवलेले यश आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे नियोजनपूर्वक उपक्रम, त्यांची फलनिष्पत्ती, पायंडे आणि प्रगती अचंबित करणारे आहेत.
 
संस्थापक स्व.डॉ.वासुदेव रघुनाथ कुळकर्णी आणि स्व. प्रा.सौ.मंदाताई देव, स्व. मेजर जनरल अ.वि.नातू यांच्या पुढाकाराने 7 मान्यवर विश्वस्तांनी या संस्थेची 1984 मध्ये स्थापना केली, नोंदणीपत्र मिळाले. सध्या ल.वि.पाठक आणि सहकारी विश्वस्त धुरा पाहत आहेत.
 
विजयवाडीतील स्व. अनंत घनश्याम सामंत यांची 5 हजार 500 चौरस फूट जागा संस्थेला दान मिळाली. ताडपत्री आणि कुडातील ही शाळा. 94-95 ला नवीन वास्तूूत भरु लागली. नंतर 2013-14 ला बाजूची 5 हजार चौरस फूट जागा संस्थेने घेतली. 15-16 ला तिथे वर्गखोल्या आकाराला आल्या.
 
सध्या सकाळी बालवाडी ते प्राथमिकचे वर्ग आणि दुपारी पाचवी ते दहावी असे माध्यमिकचे वर्ग भरतात. बालवाडी-150, प्राथमिक वर्गात 400 आणि माध्यमिक वर्गात 725 असे एकूण 1275 विद्यार्थी आहेत. तर शिक्षक संख्या बालवाडी-8, प्राथमिक 11 आणि माध्यमिक 27 तर शिक्षकेतर कर्मचारी संख्या आहे 20.
 
वाचन चळवळ संवर्धनासाठी सुसज्ज ग्रंथालयात प्राथमिक 800 आणि माध्यमिक विभागात 11 हजार 192 अशी ग्रंथसंपदा (पुस्तके) आहे. आठवड्यातून 1 तास वाचनालय उपक्रमात पुस्तक वाचन आणि ‘काय वाचले, याबाबत विवेचन... अशी सक्तीची योजना आहे, यात अनेक मुलं भाग घेतात. गुरुकुल काम्प्युटर अकॅडमी अंतर्गत 55 संगणक उपलब्ध व प्रशिक्षण सक्तीचे आहे.
 
दरवर्षी 100 वर विद्यार्थी एमएससीआयटी परीक्षा देतात. संडे काम्प्युटर स्कूूल या ‘संगणक साक्षरता’ उपक्रमात 100 वर विद्यार्थी सहभागी होतात. रोज सायंकाळी साडेपाचला सर्व शिक्षकांची दिवसभराचा आढावा, उद्याचे व अन्य नियोजन याविषयी बैठक होते. 700 प्रश्नोत्तरांद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांचे वृषाली व्यवहारे या आठवड्यातून एकदा समुपदेशन करतात. स्वच्छतेबाबत काटेकोर धोरण व यंत्रणा, सर्वांशी एकाच वेळी संभाषण करण्यासाठी मध्यवर्ती ध्वनीक्षेपण कक्षही आहे.
 
वर्गावर्गातही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा आहे. येत्या 4-5 वर्षात खडकी रोडवर 2 एकर जागेत माध्यमिक शाळा आणि लगतच भव्य क्रीडांगणाचे स्वप्न. विशेषत: हँड आणि सॉप्ट बॉलमध्ये राज्य स्तरावर हजार आणि राष्ट्रीय स्तरावर 300 ते 350 विद्यार्थ्यानी तर सॉप्ट बॉलमध्ये जागतिक स्तरावर मृणाल पाठक व दीपाली पवार यांनी चमक दाखविली, हे ऐतिहासिक यश होय.
सलग 16 वर्षापासून 100 टक्के निकाल
 
संस्थाचालक आणि शिक्षक वर्गाचा तळमळपूर्ण अध्यापनावर भर, शिस्तबद्ध नियोजन आणि उपक्रमशीलता याचा सुपरिणाम विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून दहावीचा निकाल सलग16 वर्षापासून 100 टक्के आहे.
 
90 टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळवण्याच्यांची संख्या असते निम्म्यावर...अभावानेच अशी गुणवत्ता आढळते. यामुळे प्रवेशप्रक्रिया जाहीर होताच एकाच दिवसात संपते.
जन्म, कर्मभूमीचे ऋण मानतो जोशी परिवार
कायमस्वरुपी भूखंड दाते स्व.तात्यासाहेब सामंत यांचे व त्यांच्या परिवाराचे संस्था आणि शिक्षणप्रेमी जनतेवर ऋण आहेच...पण यातही परिसिमेचे उदाहरण आहे, मातृतुल्य हरणाताई जोशी यांच्या अमेरिकेतील परिवाराचे. त्यांची मुलं गजानन, रमेश, स्व. शशिकांत आणि सौ.वसुधा कुलकर्णी यांनी कर्मभूमी, जन्मभूमीचे ऋण मानत दरवर्षी सुमारे 5 ते 10 लाख रु, आणि वारंवार अर्थसाह्य दिलेले आहे. ही उदात्त ऋणभावना आणि दातृत्त्व पुढच्या पिढीनेही कायम जपावे, यासाठी ‘लेखणी मित्र, संवाद समन्वयक’ म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर विंचूरकर यांची नियुक्ती संस्थेने केली आहे. ते 5 निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात चाळीसगावच्या भारतीय संस्कृती आणि शिक्षण प्रणाली प्रगती जोशी परिवाराला इंग्रजीत कळवत राहील, आणि तिकडून संवादाअंती रोख भरीव मदत शाळेला मिळत राहील...अशी ही अथांग मानवी मूल्यांचे संवर्धन करणारी थक्क करणारी अभिनव योजना आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121