१ डिसेंबरपासून ताडोबात मोबाईल बंदी

    17-Nov-2018
Total Views | 25



चंद्रपूर : दि. १ डिसेंबरपासून ताडोबाच्या जंगलात पर्यटकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ताडोबाच्या जंगलात एक वाघ गाडीचा पाठलाग करत असल्याची चित्रफित व्हायरल झाली होती. याच पार्श्वभूमीवर मोबाईल बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दि. १ डिसेंबरनंतर ताडोबात पर्यटकांकडे मोबाइल दिसल्यास संबंधित पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक ए. आर. प्रवीण यांनी परिपत्रक काढून ताडोबातील मोबाइल बंदीचे आदेश जारी केले आहेत. ताडोबात बिबट्या किंवा वाघ दिसल्यास पर्यटनाला आलेले पर्यटक इतर वाहनचालकांना किंवा पर्यटकांना मोबाइलवरून त्याची माहिती देत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे इतर वाहनचालक घटनास्थळी पोहोचण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवतात. परिणामी पर्यटक आणि वाहनचालकांच्या जीवाला त्यामुळे धोका पोहोचू शकतो. शिवाय एकाच ठिकाणी सर्व पर्यटक एकत्र आल्यावर वन्यप्राण्यांचा मार्ग रोखला जातो, त्यामुळे ताडोबात मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे प्रवीण यांनी या परिपत्रकात नमूद केले आहे.

 

जिओ टॅगिंगचा दुरूपयोग होण्याची शक्यता

 

काही पर्यटक, जिप्सी चालक वन्यप्राण्यांचे जिओ टॅग फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे या प्राण्यांचा ठावठिकाणा त्यांना कळू शकतो. त्याचा काही लोक दुरुपयोग करण्याची शक्यता असते. शिवाय प्राण्यांसोबत सेल्फी काढताना पर्यटकाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121