नागपूर : यापुढे कुणी बेशिस्त वर्तवणूक केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, अशा सूचना सर्व मंत्र्यांना दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता जर कुणी अशाप्रकारे बेशिस्त वर्तवणूक केली तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, असे आम्ही तिघांनीही सगळ्यांना सांगितले आहे. आपण जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, कसे वागतो हे सगळे जनता बघत असते. त्यामुळे त्यावर अंकुश असायलाच हवा," असे ते म्हणाले.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबाबत बोलताना ते म्हणाले की, "जी घटना घडली त्या घटनेनंतर मोठा रोष होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे खाते बदलून त्यांना दुसरे खाते देण्यात आले आहे. तर दत्ता मामा भरणे यांना कृषी खाते दिले आहे." तसेच आता तरी मंत्रीडळात कुठलाही बदल होईल अशी चर्चा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रीमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही
"धनंजय मुंडे यांनी तीनवेळा माझी भेट घेतली असून ती वेगवेगळ्या कारणांसाठी होती. कुठल्याही भेटीत मंत्रीमंडळाची चर्चा झालेली नाही. मंत्रीमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे ती करतो," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.