राष्ट्रपुरूषांच्या बलिदानामुळे भारत स्वतंत्र - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    01-Aug-2025
Total Views |

पुणे
: राष्ट्रपुरुषांनी जे बलिदान दिले त्यांच्या मुळे आपण जीवन जगत आहोत. आपण चांगले काम करत राहणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व हे खूप महान आहे. सत्कार हे कार्याचे होत असतात.' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा २०२५ चा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक स्मारक ट्रस्टच्या वि३्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, ' जीवनात जेव्हा शिकायला मिळते तेव्हा ज्याला आपण मोठा समजतो तेवढा तो मोठा नसतो. आणि ज्याला आपण लहान समजतो तेवढा तो लहान नसतो. हे लक्षात येते. राजकारणात स्पष्ट बोलणे आणि खरे बोलणे यामुळे अडचण होते. टिळकांच्या काळात राष्ट्रकारण होत असे. समाजाचा आणि देशाचा विचार करणारा देशाचा पुढल्या १०० वर्षांचा विचार करतो.'

'आपला देश खूप ताकदवान देश आहे. देशाच्या अनेक गोष्ट जगभरात पोहोचल्या आहेत. आत्मविश्वास आणि अहंकार यात खूप फरक आहे. अंगी अहंकार असू नये. विश्वगुरू बनून जगाला आपले अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता आहे. जे जगात नाही ते भारतात झाले पाहिजे.' असे गडकरी म्हणाले.

मुख्यंमत्री फडणवीस म्हणले की,' नितीनजींचे कार्य खूप मोठे आहे. देशातील मनाचा पुरस्कार असणारा हा राष्ट्रीय पुरस्कार नितीनजींना दिला जात आहे. 'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' हे वाक्य देशातील मरगळ दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले. लोकमान्य यांनी ब्रिटिशांना ठामपणे ठणकावून 'स्वराज्य' आमचे आहे हे सांगितले. त्यांनी सर्वसामान्य माणसाला एकत्र आणले. लोकमान्य टिळकांनी ज्या बाण्याने काम केले त्याच बाण्याने काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. नितीनजी हे त्यातील एक आहेत. नितीनजी हे संशोधक आहेत. ते निराश कधी दिसत नाहीत. मुंबई पुणे महामार्गाचे काम हे त्यांच्या कामाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या कामातून भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. या देशाच्या सोइ सुविधांमध्ये जे सकारात्मक बदल झाले ते फक्त नितीनजींच्या वेळेत झाले आहेत. आदिवासी भागात शिक्षण गडकरी यांनी पोहचवले आहे. राजकारणात सत्य माहित असून सुद्धा बोलू नये पण नितीनजी कायम सत्य बोलतात. कोणत्याही गोष्टीच्या गुणवत्ते बद्दल नितीनजी आग्रही असतात.'

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,' लोकमान्यांच्या विचारांवर चालणाऱ्या पुरस्कारासाठी नितीन गडकरी यांची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्काराची उंची मोठी आहे. गडकरी हे प्रगतशील शेतकरी आहेत. ते सतत नवीन नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात. धडाकेबाज निर्णय घेणारे नेते आहेत. देशांत त्यांना रोडकरी म्हणून ओळखले जाते. कोविड काळात समाजकारणाचे काम त्यांनी केले आहे. राज्याच्या विकास कामात त्यांचे बारीक लक्ष असते. ते सतत संपर्कात असतात. त्यांच्या विभागाचा महाराष्ट्राला जास्त फायदा झाला आहे. गडकरी दिल्लीत असल्याने आपला माणूस दिल्लीत आहेत असे वाटते.'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,' गडकरी हे मराठी मातीतील नेते आहेत. काम जास्त करा आणि कमी बोला ह्याचा अवलंब ते करतात. पंतप्रधानांनी नव्या भारताचे स्वप्न पाहिले त्याचे शिल्पकार गडकरी आहेत. गडकरी साहेबांची दूरदृष्टी म्हणजे मुंबई पुणे महामार्ग हे उदाहरण आहे. बाळासाहेबांचे स्वप्न गडकरी साहेबांनी पूर्ण केले आहे. त्यांना विविध नावाने संबोधले जाते. काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे गडकरी यांचे नाव आहे. रस्ते विकासाचा महामेरू ही त्यांची खरी ओळख आहे. अटल सेतू, कोस्टल रस्ता बनवताना गडकरी यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत असतो.'

पुण्यात पन्नास हजार कोटींची कामं सुरू होणार आहेत. नवीन पुणे मुंबई हायवे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. दीड तासात मुंबई वरून पुण्यात येणे शक्य होणार आहे. या देशांत टेक्नॉलॉजी आणि पैश्यांची कमी नाही. परंतु देशासाठी इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. पुण्यात ऑटो मोबाईल उद्योग आहेत. सर्वात जास्त जीएसटी इथून मिळतो. जगात उद्योगजगतात भारताचा नंबर तिसरा आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत आघाडीवर येऊ शकतो
असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.