पाचोरा येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण
धरण क्षेत्रात अनधिकृत खोदलेल्या विहिरी बुजविण्याची मागणी
पाचोरा, २६ ऑक्टोबर
पाचोरा तालुक्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे सावट असून ते दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पावले उचलली जात आहे. मात्र, काही राजकीय पक्ष त्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड. अभय शरद पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील धरणांमध्ये संपादित केलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून खोदलेल्या अनधिकृत खासगी विहिरी तातडीने बुजवण्याबाबत प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन प्रशासनाने दखल न घेतल्याने येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
ऍड. अभय पाटील यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते की, पाचोरा तालुक्यात सुमारे १२ लघुपाटबंधारे व ३ मध्यम प्रकल्प असे १५ जलाशय आहेत. या जलाशयांसाठी तत्कालीन सरकारने मोठी नुकसान भरपाई देऊन शेतकर्यांकडून जमिनी संपादित केल्या आहेत. त्यासाठी शासनाने शेतकर्यांना भूसंपादन मोबदलाही दिला आहे. मात्र, अलीकडच्या काळात पाटबंधारे अधिकार्यांच्या सल्ल्याने व संगनमताने काही लोकांनी या धरणाच्या संपादित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनधिकृत खासगी विहिरी खोदल्या असून त्यातून दिवसरात्र धरणातील पिण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा उपसा करत आहे.
याबाबत २४ ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील सर्व जलाशयातील अतिक्रमण करून खोदलेल्या या अनधिकृत खासगी विहिरी तातडीने बुजवण्यात याव्यात व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती केली होती. जर प्रांत कार्यालयामार्फत कारवाई झाली नाही तर २५ ऑक्टोबर २०१८ पासून तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा गंभीर इशारा निवेदनाद्वारा देण्यात आला होता. निवेदनाच्या प्रती आ. किशोर पाटील, तहसीलदार, उपविभागीय अभियंता पाचोरा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
...तर भीषण पाणीटंचाई
या अनधिकृत विहिरी तातडीने बुजवल्या गेल्या नाही, तर गावांना या धरणांमधून होणारा पाणीपुरवठा बंद होईल. त्यामुळे तालुक्यात मोठ्या गंभीर व भीषण स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होणार आहे. या टंचाईला सर्वस्वी या बेकायदेशीर विहिरीवर अंकुश न घालता बघ्याची भूमिका घेणारे पाटबंधारे विभाग व टंचाई निवारण करणारे आपल्या नियंत्रणाखाली असलेले अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील.