अमृतसर: "संबंधित स्थानकावरुन हिरवा सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली. ते बघताच मी गाडीचा मोठा हॉर्न दिला आणि इमर्जंसी ब्रेकही लावला. मात्र, गाडीचा वेग लक्षात घेता गाडी जागेवर थांबली नाही. त्यामुळे अनेकजण गाडीखाली येऊन मोठी दुर्घटना घडली. मात्र, त्यानंतर तेथील लोकांनी रेल्वेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. अशावेळी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी रेल्वे जागेवर न थांबवता पुढील स्टेशनवर नेली. तसेच, याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती दिली." असे या डीएमयु रेल्वेचे चालक अरविंद कुमार यांनी लेखी स्वरुपात दिली आहे.
अमृतसर रेल्वे दुर्घटनेत ६० पेक्षा अधिक नागरिकांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या चालकाविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर, आज रेल्वे चालकाने आपला लेखी जबाब दिला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी सांगितले होते कि, यामध्ये रेल्वेची काही चूक नाही. तिथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना नव्हती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे सांगितल्यानंतर २८ दिवसात त्याबद्दलचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/