आज सकाळीच मुंबई तरुण भारतच्या ई-वृत्तपत्रावर एक व्हिडिओ बघितला, ज्यात एक अँकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर तरुणांना एक प्रश्न विचारत असते की, "१४ फेब्रुवारीला काय आहे?" सगळे जण सहज त्याचे उत्तर देत म्हणतात की,"व्हॅलेन्टाईन डे" यात कोणाला कशाचेही कन्फ्युजन नाही. मात्र जेव्हा अँकर दुसरा प्रश्न विचारते की, "२१ फेब्रुवारीला काय आहे?" त्याचे उत्तर कोणीही देताना दिसले नाही, किंबहुना व्हिडिओ बघणाऱ्यांना देखील त्याचे उत्तर बघितल्याशिवाय तात्काळ देता आले असतेच असेही नाही. व्हिडिओ बघायला मजेदार वाटत असला, आणि गम्मतशीर रीतीने जरी दाखवला गेला असला, तरी देखील थोडी खंतच मनात राहते. आजची आमची तरुण पिढी मतदान प्रक्रियेप्रती किती उदासीन आहे याचे छोटेसे प्रतिबिंब यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मनात सारखा एकच प्रश्न घोळत आहे की, असे का?
राजकारणाविषयी तिटकारा
आजच्या तरुणांच्या मनात राजकारण आणि राजकारणी मंडळी यांच्या प्रती घोर तिटकारा आहे. अर्थात त्याला कारण ही तसेच आहे. सध्याच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा कळस, गुंड प्रवृत्तीच्या माणसांची भरती, केवळ घराणेशाही अश्या विविध गोष्टी तरुणांना जाम खटकतात. प्रत्येक पक्षात 'भाऊ', 'दादा', 'तात्या', 'साहेब' अशी मंडळी आपापले ठाण मांडून बसलेली दिसते. दिवसरात्र त्यांच्या मागे फिरणे, त्यांचाच उदोउदो करणे, पक्षाचा नेता येणार असल्यास गावभर झेंडे लावत फिरणे, किंवा एखाद्या बॅनरवर फोटो लावून गल्लीतल्या अथवा दिल्लीतल्या भाऊला शुभेच्छा देणे, अश्या सगळ्या गोष्टी आजच्या शिकलेल्या तरुणाईला खटकल्या वाचून राहत नाही आणि त्यामुळेच राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे काय? देशाच्या एखाद्या प्रमुख आणि सर्वात जुन्या पक्षात असलेली घराणेशाही असो किंवा सत्ताधारी पक्षात केवळ सत्तेचे गणित जुळवण्यासाठी जुन्याच भ्रष्टाचारी मंडळींचा प्रवेश असो, सर्व पक्षाची धडपड जेव्हा आजचा तरुण उघड्या डोळ्यांनी बघतो तेव्हा तो मनोमन ठरवतो की, मला असल्या भानगडीत पडायचेच नाही.
सदोष शिक्षण प्रणाली
आजचे राजकारण तरुणांना आवडणारे जरी नसले, किंवा मनात तिटकारा उत्पन्न करणारे जरी असले तरी देखील राजकारणाला लागलेली ही धूळ साफ करायला तरुणाईलाच सरसावले पाहिजे. परंतु तसे देखील होताना दिसत नाही. याचे कारण की, जनतेच्या, विशेषत: तरुणांच्या मनात आपल्याच मुलभूत कर्तव्याप्रती उदासीनता आहे. आपली शिक्षण प्रणाली गुणांवर आधारित आहे. परीक्षा प्रणाली देखील विद्यार्थ्यांच्या मनात हेच ठसवते की, ज्या विषयाला जास्त गुण असतील किंवा ज्या मुद्द्यावर जास्त गुणांचे प्रश्न विचारले जाणार असतील त्यालाच महत्व दिले पाहिजे. आजचे शिक्षक आणि तथाकथित 'एक्जाम एक्सपर्ट' देखील हेच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतात. त्यामुळे केवळ २० गुणांना असणाऱ्या नागरिक शास्त्राकडे कोण फारसे लक्ष देणार! मग तेथूनच, खरी गंमत बिघडायला सुरुवात होते. ९९% विद्यार्थ्यांचा तो आवडीचा विषय कधीच बनत नाही. वर्षानुवर्षे दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या एखाद्या सरकारी प्रकल्पाप्रमाणे नागरिकशास्त्र देखील विद्यार्थी जीवनात उपेक्षितच ठरतो.
हे शालेय विद्यार्थी जेव्हा तरुणाईत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यासाठी लोकशाही, संविधान, संसद, विधानभवन, इत्यादी विषय, 'तो माझा प्रांत नाही' असेच ठरतात. त्यावर एखाद्या कॉलेज तरुणाला विचारले की, "मतदानाप्रती तुला काय वाटते?" तेव्हा तो स्वाभाविकपणे उत्तरतो, "माझ्या एकट्याच्या मतदानाने कोणता मोठा फरक पडणार आहे, इथे वर्षानुवर्षे जे होत आलेले आहे तेच होणार."
केवळ मुलभूत कर्तव्याप्रती असलेल्या उदासीनतेमुळे, आणि सदोष शिक्षण प्रणालीमुळे आपण आपल्या देशाचे, राज्याचे अथवा शहराचे किती मोठे नुकसान करत आहोत, हे देखील तरुणाईला लक्षात येत नाही, याला दुर्दैवच म्हटले पाहिजे.
व्यक्ती केंद्रित जीवनशैली
मी, माझे घर, माझा परिवार, माझे मित्र - मैत्रिणी, त्यात 'एखादी स्पेशल', माझा पुस्तकी अभ्यास आणि माझे करियर, याहून पुढे आमची तरुणपिढी विचारच करत नाही. या 'मी आणि माझा' मध्ये कधीही माझा देश आणि माझा समाज (जात नव्हे) याला सामावून घेणारे खूप कमी दिसतात. तरुणांना देशभक्ती केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या दिवशीच आठवते. त्यातही व्हॉटस् अॅपच्या डी.पी. मध्ये तिरंगा सेट केला आणि एखादे छान देशभक्तीवर स्टेटस अपडेट केले की, संपला विषय. याहून पुढे या मंडळींचा विचार दुर्दैवाने जातच नाही. अश्या पार्श्वभूमीवर त्यांना समाजाप्रती विचार करायला सांगणे म्हणजे, "इट्स सो बोरिंग ना.." असाच विषय होऊन बसतो.
परंतु ही पिढी अशीच राहणे खूप चांगले नाही. म्हणतात की, भारत तरुणांचा देश आहे. तेव्हा या तरुणांना देशाभिमुख आणि समाजाभिमुख बनवणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनाच पुढे आले पाहिजे. आपल्या मित्रांमध्ये, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये 'मतदान, समाजाभिमुखता' इ. विषयांवर चर्चा करावी लागेल. आपण प्रत्येक वेळेला 'सिस्टीम'ला दोष देऊ शकत नाही. त्यासाठी योग्यवेळी आपण आपले कर्तव्य बजावून देशासाठी, राज्यासाठी अथवा शहरासाठी योग्य मंडळींना निवडून दिले पाहिजे. जागृत तरुणाई यात उतरली तर नक्कीच राजकारण करणारी मंडळी कुठलेही विपरीत पाऊल उचलायला धजावेल. परिणामी स्वच्छता हेच राजकारणाचे ब्रीद बनून देश खऱ्याअर्थाने 'आगे बढेगा...' असे मला वाटते.
- हर्षल कंसारा