रक्तपेढीशी संबंधित आणि रक्तपेढीतच चाललेल्या एका मीटींगमध्ये असताना माझा फ़ोन वाजला. फ़ोन रक्तपेढीच्याच स्वागतकक्षातून होता. स्वागतकाने मला सांगितलं, ’सर, जोशी हॉस्पिटलमधून कुणी तावरे म्हणून गृहस्थ आले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे.’ कार्यालयीन कामासाठीच्या भेटी शक्यतो पूर्वनियोजित असतात. अशी कोणाची भेट ठरली आहे अथवा नाही हे काही चटकन माझ्या लक्षात येईना. त्यात माझं नाव घेऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली असल्याने भेट कार्यालयीन आणि केवळ माझ्याशीच संबंधित असण्याची शक्यता अधिक होती. मी स्वागतकास म्हटलं, ’त्यांना पाच/दहा मिनिटे बसायला सांगा. एवढी मीटींग संपवून त्यांना भेटतो.’ मोजून दहा मिनिटांनी पुन्हा फ़ोन वाजला. पुन्हा तोच निरोप. कामाचं नित्याचं रहाटगाडगं बघता अशी पूर्वनियोजन नसलेली भेट समोर आली की थोडासा वैताग होतोच. तसा तो माझाही झाला. पण तरीही चाललेली मीटींग आवरुन मी माझ्या कक्षात आलो आणि स्वागतकास या तावरे महाशयांना भेटण्यासाठी पाठवून द्यायला सांगितलं.
काही क्षणातच दोन प्रौढवयीन – साधारण पन्नाशीचे - गृहस्थ आत प्रवेश करते झाले. दोघेही माझ्याकरिता अनोळखी असल्याने क्षणभर ’यांचे काय काम असावे’ या विचारांनी मी संभ्रमात पडलोच. त्यांना बसण्याची सूचना करत मी त्यांच्या भेटीच्या प्रयोजनाची विचारणा केली. प्रथम काही न बोलता त्यांनी रक्तघटकांची मागणी करणारा डॉक्टरांचा अर्ज माझ्यापुढे ठेवला. मी तो पाहिला आणि लक्षात आलं हे दोघेजण रुग्णाचे नातेवाईक असून सध्या या रुग्णासाठी डॉक्टरांच्या सूचनेनुसार ’सिंगल डोनर प्लेटलेट’ (SDP) हा रक्तघटक घेण्यासाठी ते रक्तपेढीत आले होते. त्यातील एकाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण दाटलेल्या कंठामुळे त्यांना ते काही साधेना. शेवटी दुसरे गृहस्थ मला म्हणाले, ’सर, आम्हाला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे. एवढी आमची गरज भागवली तर फ़ार उपकार होतील तुमचे !’ ’सांगा ना. काय मदत करु शकतो मी ?’ मी त्यांना विचारले. यावर त्यांनी जे सांगितले त्यावरुन माझ्या लक्षात आले की, त्यांना आर्थिक सवलतीची आवश्यकता असून जोशी हॉस्पिटलमधील एका परिचित डॉक्टरांनी त्यांना माझे नाव सांगून यासंबंधी बोलण्यास सांगितले होते. मी जरा विचारात पडलो कारण गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर सवलती देणे हा विषय जनकल्याण रक्तपेढीला मूळीच नवीन नाही परंतू ज्या रक्तघटकासाठी या मंडळींना सवलत आणि तीही लक्षणीय स्वरुपात हवी होती, ती देणे जरा कठीण दिसत होते. कारण मुळातच ’सिंगल डोनर प्लेटलेट’ या रक्तघटकासाठी लागणारे कीट्स आयात केलेले असल्याने ते खूपच महागडे असतात. या कीट्सच्या किंमतीबरोबरच, हा घटक तयार करण्यासाठी वापरलेली यंत्रणा, मनुष्यबळ या सगळ्यांचा विचार करुन त्यात एक पैसाही जास्त न आकारता या रक्तघटकाचे प्रक्रियाशुल्क निर्धारित केलेले असते. आणि यामध्येही यांना मोठ्या सवलतीची अपेक्षा आहे हे लक्षात येत होते. या विशिष्ट रक्तघटकावर फ़ार मोठी सवलत देता येणे कसे कठीण असते, हे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझं बोलणं पूर्ण होताच त्यातील एक गृहस्थ स्वत:ला सावरुन म्हणाले, ’सर, आमचं जरा ऐकाल का ? मी आहे एक शेतकरी. शेतीच्या अनिश्चित आणि तुटपुंज्या उत्पन्नाशिवाय माझ्या हातात काही नाही. त्यात घरावर आभाळ कोसळलंय सध्या. बायको रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजते आहे. अशाच वातावरणात माझी आईसुद्धा नुकतीच सोडून गेली मला. अजून दहा दिवसही झाले नाहीत हो तिला. माझी काय अवस्था होतेय हे माझे मलाच ठाऊक. माझी अक्षरश: दया येऊन जोशी हॉस्पिटलमधल्या त्या डॉक्टरांनी मला तुमचे नाव सांगितले आणि म्हणून मोठ्या आशेने तुमच्याकडे आलोय आम्ही.’ त्यांना पुढं बोलणं सुधारेना. ’पत्नीची कॅन्सरशी प्राणांतिक झुंज आणि आईचे निधन होऊन दहा दिवसही झाले नाहीत’ – क्षणभर या अवस्थेत मी गेलो. या गृहस्थांचे मुंडण केलेले मस्तक पहिल्यांदाच मला स्पष्टपणे जाणवले. काहीही न बोलता त्यांनी सवलतीसाठी केलेला अर्ज मी पुढे घेतला आणि त्यावर अधिकारी म्हणून माझा रिमार्क लिहून त्यांच्या हातात दिला. त्यांना आवश्यक असणारी सवलत देण्याविषयीची सूचना त्यावर मी लिहिली होती. त्यांनी तो कागद बघितला आणि त्यांना हुंदका आवरलाच नाही. कसेबसे ते उठून उभे राहिले. ’फ़ार उपकार झाले बघा तुमचे सर. आम्हाला माहितीये यात रक्तपेढीचं नुकसान आहे, पण आम्ही फ़ार कात्रीत अडकलोय हो…!’ ते गृहस्थ बोलले आणि नुसतं एवढं बोलून ते थांबले नाहीत तर माझ्या खुर्चीजवळ येऊन ते माझ्या पायावर झुकायला लागले. मला विलक्षण संकोचल्यासारखं झालं. मी उभा होत त्यांच्या खांद्याला धरलं आणि म्हणालो, ’अहो काका, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. असं नका करु. मी काही फ़ार विशेष केलं नाही. मी तेच केलं, जे आत्ता करायला हवं होतं. काळजी घ्या’ ते दोघे बाहेर पडल्यानंतरही काही वेळ त्यांच्या हुंदक्यांचा आवाज मला स्पष्टपणे जाणवत होता.
त्यांच्या ’यात रक्तपेढीचं नुकसान आहे, हे मला कळतंय’ या वाक्यावर मी विचार करत होतो. अशा सैरभैर अवस्थेतही त्यांचा विवेक जागा असल्याचं ते द्योतक होतं. व्यावहारिक अर्थाने ही बाब खरीच होती. किंबहुना म्हणूनच मी सुरुवातीला थोडा विचारात पडलो होतो. पण त्या क्षणी एका बाजुला या गृहस्थाचं घर माझ्या डोळ्यासमोर येत होतं. साधारण पन्नाशीच्या आत-बाहेर असलेले पती-पत्नी. घरातल्या पुढील पिढीविषयीच्या जबाबदाऱ्या कदाचित अर्धवट अवस्थेतही असू शकतील. त्यात अभावितपणे आलेल्या आजारपणामुळे आर्थिक घडी विसकटून गेल्याचे तर समोर दिसतच होते. एका बाजुला ही स्थिती आणि दुसऱ्या बाजुला रक्तपेढीचे काही हजारांचे नुकसान. पहिल्या बाबतीत मला करता येण्यासारखं काही नव्हतं. पण दुसरी बाजु मात्र हातात होती. काय होईल ? सध्याही चार ठिकाणी झोळी घेऊन आपण फ़िरतोच आहोत, आता या नुकसानीपोटी अजून चार घरी भिक्षा मागावी लागेल. ती नक्कीच मागता येईल आणि समाजही भरभरुन देईल. मग आता नफ़ा-तोट्याचा विचार कशाला ? शिवाय आपले फ़ार उपकार झाले असे समजून आपल्या पायावर डोके ठेवू पाहणाऱ्या या गृहस्थांना आपल्याबद्दल काहीही वाटो, आपल्याला तर नक्की माहिती आहे ना, की आपले काम फ़क्त ’भारवाही हमालाचे’ – माल तर धन्याचाच आहे. हा माल योग्य ठिकाणी नेऊन पोहोचविणे इतकेच आपले काम. अशी एखादी ’हमाली’सुद्धा आयुष्यभर पुरते.
- महेंद्र वाघ