शेगावच्या कचोरीची ६८ वी वर्षपूर्ती

    दिनांक  25-Dec-2018 
 
 
बुलढाणा : शेगावची सुप्रसिद्ध कचोरीला आज ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कचोरीला खवय्यांची पसंती मिळत आहे. वर्षानुवर्षे ही कचोरी बुलढाणा जिल्ह्याची ही एक ओळखच बनली आहे. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पंजाबमधून शेगावमध्ये आलेल्या तिरथराम शर्मा यांनी १९५० साली या कचोरी सेंटरची स्थापना केली होती. आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुरुवातीला रेल्वे स्थानकावरील एका छोट्या स्टॉलपासून सुरु केलेला त्यांचा हा व्यवसाय आज शेगावची एक अविभाज्य ओळख बनला आहे. शेगावमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांनाही या चविष्ट अशा कचोरीचा मोह आवरत नाही.
 

सध्या तिरथराम शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. करण शर्मा आणि लोहित शर्मा हे दोघे मिळून हा व्यवसाय करत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन आपल्या कचोरीच्या व्यवसायामध्ये काळानुरुप बदल करण्याचा प्रयत्न ही नवी पिढी करत आहे. या कचोरी सेंटरमध्ये पारंपारिक कचोरीसोबत, कचोरी सॅंडविच, मिक्सव्हेज कचोरी, जैन कचोरी, चीज कचोरी असे कचोरीचे अनेक प्रकारही मिळतात. शेगावची ही प्रसिद्ध कचोरी आता परदेशातही पोहोचली आहे. शेगावची ही प्रसिद्ध कचोरी आम्ही परदेशात नेण्यात यशस्वी झालो आहोत. परदेशात पाठवली जाणारी खास फ्रोझन कचोरी असते. ती तीन दिवस खराब होत नाही. तसेच ती फ्रीजमध्ये ठेवल्यास तीन महिन्यांपर्यंत टिकवली जाऊ शकते. अशी माहिती शेगाव कचोरीचे मालक गगन शर्मा यांनी दिली.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/