'कॅशलेस'साठी पर्याय निवडा पण सावधपणे

    04-Jan-2017   
Total Views |

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करायचा निर्णय घेतला आणि सगळीकडे एकच गोंधळ माजला. नोटांची चणचण भासू लागल्यामुळे दैनंदिन व्यवहारांसाठी सर्वत्र मग इतर पर्यायांचा विचार सुरू झाला. त्यातूनच मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा पर्याय पुढे आला. त्याचाच फायदा घेऊन मग पेटीएम आणि मोबिक्विक सारख्या कंपन्यांनी आपल्या मोबाईल अॅपची जाहीरात करायला सुरुवात केली. लोकांनीही लगेच कशाचाही विचार न करता ते अॅप आपापल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून व्यवहार सुरू केले. त्यातून अनेकांचा तात्कालिक प्रश्नही सुटला. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनीही मग याच अॅपचा वापर करायला सुरूवात केली. नोटा बाजारात मुबलक येईपर्यंत हेच वापरणं चांगलं असा विचार करून सामान्य माणूस सुखावला होता. दुसरीकडे सरकारनेही आपला मोहरा इंटरनेट बँकिंगकडे वळवला. त्यामुळे हा शुभ संकेत समजून अनेकांनी आपण ही अॅपस् घेतल्याचे समाधान व्यक्त केले. मात्र या कंपन्यांचे सत्य जाणण्याचे कष्ट कोणीच घेतले नाहीत. नोटाबंदीमधून सुटका म्हणून पाहिल्या गेलेल्या या मोबाईल अॅपस् चे वास्तव जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

पेटीएम हे मोबाईल बँकिंगसाठीचे अॅप One97 Communications या कंपनीद्वारे चालवले जाते. ही कंपनी भारतातील प्रमुख मोबाईल इंटरनेट बँकिंग कंपन्यांपैकी एक आहे. मात्र केवळ इतकेच माहिती असणे पुरेसे नसून या कंपनीमध्ये ओतलेला पैसा नेमका कोणाचा आहे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. One97 Communications या कंपनीमध्ये अनेकांनी पैसे गुतवले असले तरी एकंदर ६ कंपन्यांचा त्यातील हिस्सा अधिक आहे. त्यात प्रामुख्याने अलिबाबा ग्रुप, अँट फायनान्शियल, सैफ पार्टनर्स, मिडियाटेक, सफायर व्हेन्चर्स आणि सिलिकॉन व्हॅली बँक यांचा समावेश होतो. यातील अपवाद वगळता सर्व कंपन्या या परदेशी आहेत. यातील बहुतांश कंपन्या या बहुराष्ट्रीय आहेत व भारतात त्यांची कार्यालये आहेत. साहजिकच पेटीएम कंपनीला मिळणारा सर्व फायदा या कंपन्यांनाही मिळतोच. या भांडवल पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांची आणि पालक कंपनीची प्राथमिक माहिती जाणून घेण्यासारखी आहे. 

अलिबाबा ग्रुप -

ही एक चायनिज ई-कॉमर्स कंपनी आहे. वेब पोर्टलच्या माध्यमातून ग्राहक आणि व्यापारी यांच्यात आर्थिक व्यवहार करून देण्याची सेवा ही कंपनी पुरवते. तसेच इलेक्ट्रनिक पेमेंट, ई-शॉपिंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगसारख्या सेवाही पुरवल्या जातात. १९९९ मध्ये जॅक मा याने चीनमध्ये ही कंपनी सुरू केली. पेटीएम ची पालक कंपनी असलेल्या One97 Communications मध्ये अलिबाबा ग्रुपचे २५ टक्के भाग भांडवल आहे.

अॅन्ट फायनान्शियल -

अलिपे (Alipay) असे या कंपनीचे पूर्वीचे नाव होते. ही कंपनी अलिबाबा ग्रुपशी संबंधित आहे. याद्वारे अलिपे पेमेंट प्लॅटफॉर्म तसेच सेसमे क्रेडिट रेटिंग सिस्टीम सारख्या सेवाही पुरवल्या जातात.

 सैफ पार्टनर्स -

ही एक गुंतवणूक कंपनी आहे. प्रामुख्याने दक्षिण आशियातील इंटरनेट, मोबाईल इंटरनेट आणि आयटी क्षेत्रातील  कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यावर या कंपनीचा भर असतो. पेटीएममध्ये सैफ पार्टनर्सची मोठी गुंतवणूक आहे. यातील आणखी एक महत्त्चाची बाब म्हणजे याच कंपनीची आणखी एक कंपनी चीनमध्येही कार्यरत आहे.

मिडियाटेक -

ही एक तैवानस्थित फॅबलेस सेमिकंडक्टर बनवणारी कंपनी आहे. वायरलेस कम्युनिकेशन व HDTV,  DVD व अन्य उपकरणांसाठी सिस्टीम ऑन चिप सोल्युशन ही यंत्रणा कंपनीद्वारे पुरवली जाते. १९९७ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने पेटीएम कंपनीत ४०० कोटी रुपयांची गुतवणूक केली आहे. गमतीचा भाग म्हणजे पेटीएमची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या मोबिक्विक कंपनीतही मिडियाटेकने ३०० कोटी रुपयांची गुतवणूक केली आहे.

 सफायर व्हेंचर्स -

ही एक सिलिकॉन व्हॅलीस्थित गुंतवणूक करणारी कंपनी आहे. प्रामुख्याने जगभरातील तंत्रज्ञानविषयक नव्या कंपन्यांमध्ये गुतवणूक सफायर व्हेंचर्सद्वारे केली जाते. कंपनी अमेरिका, युरोप, इस्राइल आणि भारतात कार्यरत आहे.

 सिलिकॉन व्हॅली बँक -

ही एक अमेरिकास्थित मोठी बँक आहे. जगभरातल्या ३० हजाराहून अधिक स्टार्टअप कंपन्यांना या बँकेने आजवर अर्थसहाय्य केले आहे.

 तात्पर्य, आपण जेव्हा एखाद्या मोबाईल अॅपचा वापर सुरू करतो आणि तेही त्यात आपली सर्व माहिती भरून  व्यवहार सुरू करतो तेव्हा ती माहिती आणि इतर तपशिल नेमके कोणाकडे जात आहेत याची माहिती घेतली पाहिजे. आपली तात्कालिक सोय बघून आपण एखाद्या चुकीच्या कंपनीला आपली सगळी माहिती सांगून तर नाही ना बसलो याचाही विचार व्हायला हवा. तसेच या व्यवहारांमधून मिळणाऱ्या नफ्याचे वाटेकरी नेमके कोण कोण आहेत तेही माहिती असल्यास आपला पैसा आणि माहिती खरंच सुरक्षित आहे अथवा नाही याचाही अंदाज येतो. नोटाबंदी ही एक तात्कालिक परिस्थिती आहे. येणाऱ्या काही महिन्यांत या बदलाचा मागमूसही राहणार नाही, मात्र आपण या गडबडीत काही चुकीचे पाऊल तर उचलले नाही ना याचा विचार सूज्ञ वाचकांनी करावा.

गेल्या २ दशकांत असे अनेक बदल भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सातत्याने घडत आहेत. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांच्या आधारे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र दुसरीकडे तेच तंत्रज्ञान अनेक कुप्रवृत्तींनाही चालना देत आहे. जगभरातल्या कंपन्या भारतासारख्या समृद्ध बाजारपेठेत गुंतवणूक करायला उत्सूक आहेत. तर दुसरीकडे अनेक भारतीय कंपन्याही परदेशात आपले बस्तान बसवू पाहात आहेत. तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत चालले आहे, मात्र त्यातूनच अनेक धोकेही उत्पन्न होत आहेत. केवळ पेटीएमच नाही तर इतर अनेक परदेशी कंपन्या आपल्या घरात सुखेनैव नांदत आहेत. जागतिकीकरणात हे सर्व अपरिहार्य असले तरी माहिती विस्फोटाच्या आजच्या काळात विशेषतः सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध असताना तरी किमान आपण कोणाची कोणती सेवा स्वीकारत आहोत याचे भान ग्राहकांनी ठेवायला हवे. परदेशी भांडवलाच्या बळावर उभ्या असलेल्या अशा कंपन्यांपेक्षा त्याला देशी पर्याय काय आहे याचा शोध घेऊन त्याचा वापर केल्यास धोका निश्चितच कमी होतो. अर्थात सरकारनेही आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे आहे याचे भान राखत तितक्या दर्जाच्या सुविधा नागरिकांना पुरवायला हव्यात. तरच नव्या आर्थिक आव्हांनांना आपण समर्थपणे सामोरे जाऊ शकतो.

अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121