सोशल मीडिया हे जसे सर्वसामान्यांच्या हातात अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी मिळालेले हत्यार आहे तसेच त्याचा गैरवापर झाल्यास ते तितकेच घातकही आहे. या दुधारी शस्त्राचा वापर आपला विवेक सांभाळून करणारे बहुतांश असले तरीही काही विकृत मानसिकतेचे लोक मात्र याचा वापर आपला आणि आपल्या विचारांचा स्वार्थ जपण्यासाठी तसेच असत्य पसरविण्यासाठी करत असतात. नुकताच असेच एक उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियाचा अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या फेसबुकवर ‘गोवा स्पीक्स’ या पानावर गोव्यातील अनेक जण आहेत. प्रत्येक जण आपल्याला आवडतील अशा पोस्टस् त्यावर टाकत असतो. मात्र त्यातही काही जण असे आहेत जे या पानाचा राजकीय वापर करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. या पानाचे ४७ हजार २०० सदस्य आहेत. स्वाभाविकच ते निरनिराळ्या विचारांचे आणि स्वभावांचे असणार. आणि त्यामुळेच या पानावर ‘न्यूट्रल’ पोस्टस् टाकाव्यात असे त्या पानाच्या अँडमिननी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे. या पानाचे एकूण ११ अँडमिन आहेत. इतक्या अधिक संख्येचे पान चालवताना काही किमान संकेतांचे पालन होणे अपेक्षित असते. मात्र आपल्याकडे असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे अनेक जण या संकेतांचे उल्लंघन करतात आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
गोवा विधानसभेच्या निवडणूका आता जवळ आल्या आहेत. साहजिकच प्रत्येकच राजकीय पक्ष त्यासाठी मिळेल त्या माध्यमातून आपल्या विचारांचा आणि पक्षाचा प्रचार करत आहे. फेसबुकवर त्यासाठी गोवा स्पीक्स सारख्या माध्यमांचा सर्रास उपयोग होताना दिसतो. नुकताच दसरा होऊन गेला. देशभरातीलच नव्हे तर जगभरातील भारतीयांसाठी हा विशेष सण. हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक. साहजिकच त्यादिवशी सर्वत्र रामलीला आणि रावणदहन अनेक कार्यक्रम होतात. आणि त्याचे अनेक फोटोही आजकाल सोशल मीडियावर फिरत असतात. मात्र त्यातही काहीजण चावटपणा करतात आणि मग टीकेचे धनी होतात. या गोवा स्पीक्स च्या फेसबुक पानावरही असाच एक खोडसाळपणा एका सदस्याने केला. एन्जेलो पायस असे या सद्गृहस्थाचे नाव. त्यांनी मुद्दाम दसऱ्याला नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे महाराष्ट्रात दहन झाले अशा आशयाचा फोटो टाकला. अर्थातच तो खोटा होता. फोटोशॉपमध्ये मॉर्फ करून अपलोड केलेला होता. त्यामध्ये मोदींच्या कटआऊटला १० तोंडे दाखविण्यात आली आहेत. आणि त्याखाली महाराष्ट्रात रावणरूपी मोदींच्या पुतळ्याचे दहन अशा आशयाच्या काही ओळी लिहिल्या आहेत.
त्या पानावर असलेल्या काही सदस्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला मात्र त्याला अँडमिननी काही दाद लागून दिली नाही. मात्र त्यानंतर त्या सदस्यांनी पायस यांनी टाकलेल्या फोटोचा मूळ फोटो टाकल्यावर अनेकांना त्यातले सत्य उमगले. तो मूळ फोटो २०१५ मधील एका कार्यक्रमातील होता. त्यामध्ये मोदींचा पूर्णाकृती कटआऊट आहे जो व्यवस्थित आहे. मात्र तरीही तो फोटो त्या पानावरून अँडमिन गटाने मागे घेतला नाही अथवा काढून टाकला नाही. अधिक तपास केल्यावर असे समजले की पायस हे आम आदमी पक्षाचे समर्थक आहेत आणि मग सगळेच चित्र स्पष्ट झाले. इतरांनी प्रामाणिकपणा शिकवणाऱ्या या पक्षाचे सगळेच रंग आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेत. नव्हे नव्हे झालेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून यापेक्षा वेगळे काही अपेक्षित करणेच चुकीचे आहे. पण निवडणूकांसाठीच्या प्रचाराचा स्तर या टोकाला इतक्या लवकर जाईल असे वाटले नव्हते. असो. ज्यांचे अर्धे मंत्रिमंडळ काही ना काही कारणाने तुरूंगाची हवा खाऊन आले आहे त्या बापुड्यांकडून हेच होणार यात नवल ते काय. पण वातावरण हळूहळू तापायला सुरूवात झाली आहे याची ही नांदीच म्हणावी लागेल.