मुंबई : मोहरमच्या निमित्ताने श्रीनगर येथे निघालेल्या मिरवणुकींमध्ये हिजबुल्लाह समर्थनार्थ नारेबाजी आणि इराणचे झेंडे फडकवल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थित हजारोंच्या जमावाने उघडपणे हिजबुल्लाह आणि इराणी झेंडे फडकावत इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी आणि मारल्या गेलेल्या इराणी कमांडर्सचे फोटो घेऊन मोर्चा काढला. पोलिसांनी याची दखल घेत जेव्हा मिरवणुकीतून हिजबुल्लाहचा ध्वज काढून टाकला तेव्हा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांनी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहरमच्या आठव्या दिवशी शिया समुदायाने श्रीनगरमध्ये मिरवणूक काढली. पोलिसांनी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. मिरवणूक गुरु बाजार येथून सुरू झाली आणि जहांगीर चौक, मौलाना आझाद रोड मार्गे दालगेट येथे पोहोचली. मिरवणुकीदरम्यान पोलिसांना इराण आणि हिजबुल्लाहशी संबंधित झेंडे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणांहून काढून टाकले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी इराणच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.
गेल्या वर्षी, उपस्थितांनी पॅलेस्टिनी समर्थक घोषणा दिल्याने अशाच प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांना अनेक एफआयआर नोंदवावे लागले होते. सध्या या प्रकरणाकडे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे कसे पाहतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक