"मराठीसाठीची ही एकजूट आणि बाळासाहेबांचं स्वप्न...;" काय म्हणाले राज ठाकरे?
05-Jul-2025
Total Views |
मुंबई : पुढे काय काय गोष्ट घडतील याची कल्पना नाही. परंतू, मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, अशी अपेक्षा बाळगतो, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात आयोजित ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "बाकी सगळ्या युत्या आघाड्या होत राहतील. पण महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा या सगळ्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. यापुढेसुद्धा सर्वांनी सावध आणि सतर्क असणे आवश्यक आहे. पुढे काय काय गोष्ट घडतील याची कल्पना नाही. परंतू, मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, अशी आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो," असे ते म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. दरम्यान, आता दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या भाषणातून यूतीसंदर्भात सूचन विधान केले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत ठाकरे बंधू एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मीरा-भाईंदरच्या घटनेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "समोरच्याला मारताना तो गुजराती निघाला, त्याला काय करायचं? त्याच्या कपाळावर गुजराती आहे, असं लिहीलं होतं का? विनाकारण उठसूठ कुणाला मारायची गरज नाही. परंतू, जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण त्यांची चूक असली पाहिजे. असं करताना कधीही त्याचा व्हिडीओ काढू नका. मारणारा कधी सांगत नसतो तर मार खाणारा सांगत असतो. पण याचा अर्थ उठसूठ कुणालाही मारण्याचे काहीही कारण नाही," असे त्यांनी केले आहे.