मुंबई : सी सदानंदन मास्टर यांचे जीवन हे चिकाटी आणि ध्येयाच्या प्रतीबद्धतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे मत प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय समन्वयक जे. नंदकुमार यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिल्लीतील मल्याळी समुदायाच्या वतीने राज्यसभा खासदार सी. सदानंदन मास्टर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सदानंदन मास्टर यांची राज्यसभेत उपस्थिती ही देशभरातील देशभक्तांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे जे. नंदकुमार म्हणाले. शिक्षक, शिक्षण सुधारक, जन्मभूमीचे माजी सहयोगी संपादक आणि राष्ट्रीय शिक्षक वृत्तपत्राचे संपादक म्हणून असलेल्या सदानंदन यांचे कौतुकही केले. ते म्हणाले, राष्ट्रपतींनी राज्यसभेत शालेय शिक्षकाची नियुक्ती करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. ते भारतातील लाखो शालेय शिक्षकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे जीवन चिकाटी आणि ध्येयाच्या प्रतीबद्धतेचे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. राष्ट्राच्या विकासात सदानंदन मास्टर यांचे योगदान नक्कीच अभूतपूर्व राहील.
सदानंदन मास्टर यांनी राष्ट्र उभारणीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. "आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी, पंतप्रधानांनी कल्पिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नात आपण योगदान दिले पाहिजे," असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबू पणिकर होते. सदानंदन मास्टर यांच्या कन्या यमुना भारती यांनी या कार्यक्रमात गीत गायले. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि भाजप केरळ सेलचे नेते चोलाईल शशिधरन यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. हा प्रसंग समर्पण, सेवा आणि प्रेरणेचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.