भिवंडी धर्मांतरण प्रकरणातील परदेशी नागरिक अमेरिका सेनेचा माजी अधिकारी?

    08-Oct-2025
Total Views |

मुंबई : भिवंडीतील चिंबीपाडा येथील भुईशेत पाड्यावर आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पैशाचे आणि चमत्काराचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला अमेरिकी नागरिक जेम्स वॉटसन अमेरिका सेनेचा माजी अधिकारी आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.

दरम्यान एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, जेम्स वॉटसन हा अमेरिकन सैन्याचा अधिकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या मते, वॉटसनने अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित काही प्रकाशनांमध्ये लेख लिहिले असून, त्याचे सैनिकी पार्श्वभूमीचे पुरावे अमेरिकन डिफेन्स वेबसाईटवरही आढळले आहेत. परंतु अद्याप अधिकृत स्तरावर या दाव्यांची पुष्टी झालेली नाही.

भिवंडी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांपासून त्यांच्या परदेशी संपर्कांपर्यंत सर्व पैलूंची माहिती गोळा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेम्स वॉटसन त्याच्या पत्नीसोबत ठाणे पश्चिम येथील हिरानंदानी इस्टेट येथे भाड्याने राहत आहे. पण त्याच्या मालकीची स्वत: ची स्कॉर्पिओ गाडी आहे. तो महाराष्ट्र, छत्तीसगड, आसाम या राज्यांमध्ये जात असल्याचे आढळून आले आहे. तसेच मुंबईतील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये फिरत होता.

हाती आलेल्या माहितीनुसार, अबाइड बाप्तिस्म फाऊंडेशन नावाची संस्था धर्मांतर प्रकरणात कार्यरत असून ज्याचा साईनाथ गणपती सरपे हा सचिव आहे. साईनाथ सरपे हा जेम्स वॉटसन सोबत भिवंडी परिसरात अनेक आदिवासी पाड्यांवर एका विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी फिरत असल्याचे आढळले आहे. तसेच भुईशेत येथील पाड्यावर एका व्यक्तीच्या धर्मपरिवर्तनासाठी अडीच लाख रूपये मिळाल्याचे समजले आहे.

पोलिसांनी जेम्स वॉटसनला अटक केल्यानंतर त्याच्याकडे एक डायरी सापडली आहे. त्या डायरीमध्ये रायगड येथे बोरलीच्या आसपास चार पाच गावांमध्ये, भिवंडीतील सतरा गावांमध्ये, वसई, पालघर येथे गेल्याच्या नोंदी आढळून आल्या. त्याच डायरीमध्ये त्यांच्या प्रचारकांना पैसे दिल्याचे लिहले आहे. त्यांना गाडी पुरवून त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याचे देखील लिहले आहे.

दरम्यान एका हिंदी वृत्तवाहिनीने जेम्स वॉटसनच्या अटकेबद्दल अमेरिकन दूतावासाला विचारणा केली. परंतु अमेरिकेत बंद चालू असल्यामुळे अमेरिकन दूतावासाने प्रतिसाद देण्यास असमर्थता दर्शविली.