"उद्धवराव आपण सामनाला सविस्तर मुलाखत देऊन...;" केशव उपाध्येंचा टोला
21-Jul-2025
Total Views | 42
मुंबई : उद्धवराव आपण सामनाला सविस्तर मुलाखत देऊन खूप चांगले काम केले, असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या विचारांमध्ये विरोधाभास असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "उद्धवराव आपण सामनाला सविस्तर मुलाखत देऊन खूप चांगले काम केले. कालच्या भागात तुमच्या विचारातला विरोधाभास दिसला आणि आज नुसता गोंधळात गोंधळ. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना मिठी मारायची आणि त्याच वेळी मनसैनिक अमराठी हिंदूंना चोपत असतानाच आपल्याला अमराठी लोकांनी बहोत अच्छा किया अशी प्रतिक्रिया दिल्याचे सांगायचे."
राज ठाकरेंशी चर्चा करणार आहात का?
"धारावीचा पुनर्विकास मी करत होतो म्हणायचे आणि तुम्ही ठरविलेल्या कंत्राटातील अटी शर्थीवर आता देवेंद्रजी खरंच धारावीकरांना पक्की घरे देत असताना विरोध करायचा. क तर तू राहशील नाही तर मी असे देवेंद्रजींना आव्हान देणारे तुम्ही आता त्यांना हिताचे सल्ले देऊ लागलात. वर हा टोमणा नाही म्हणून सांगता. एक गोष्ट मात्र सातत्यपूर्ण आणि स्पष्टपणे केलीत, ती म्हणजे तुमचे मुसलमानप्रेम दाखवून दिले, ते सुद्धा मुसलमानांचाच हवाला देऊन. एवढ्या मोठ्या मुलाखतीतही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. जसा तुम्ही राज ठाकरेंशी चर्चा करणार आहात का? की तिथेही गोंधळच आहे?" असा सवालही केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंना केला.