मुंबई, वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी एक तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १५ जणांना वाचविण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, ही घटना आज सकाळी ७.५० वाजता घडली. प्राथमिक तपासानुसार, इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला, त्यानंतर इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि बीएमसी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलेल्या १५ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी २ जण ५० टक्के पेक्षा जास्त भाजले आहेत.
अपघातस्थळी आठ अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचावकार्य जोरात सुरू आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पथके दिवसरात्र काम करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चाळ क्रमांक ३७ पूर्णपणे कोसळली आहे. या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक त्यांच्या घरांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत.