अहमदाबाद : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल.
अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक संरचनांमधून जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या (आय.आर.सी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून ५.५ मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत.
एकूण आठ गोलाकार खांब बांधण्यात आले आहेत, जे ६ ते ६.५ मीटर व्यासाचे आहेत. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले आहेत. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना खांबांचे धोरणात्मक स्थान ठरवून करण्यात आली आहे. हा पूल बॅलन्स्ड कॅंटिलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, ही एक विशेष बांधकाम तंत्र आहे, जी खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.
पुलाचे बांधकाम करताना सर्वोच्च सुरक्षामानके पाळली जात असल्याची खात्री करण्यासाठी विशेषतः उंचीवर काम करणाऱ्या क्रियाकलापांसाठी एक मजबूत सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कार्यस्थळी काटेकोर जबाबदारी व शिस्त सुनिश्चित करण्यासाठी संरचित वर्क परमिट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. बांधकाम प्रक्रियेच्या प्रत्यक्ष देखरेखीसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुलाच्या बांधकामात लक्षणीय प्रगती झाली आहे. सर्व पाया व अधोसंरचना संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, वरील संरचनेची कामे ज्यामध्ये खांबाच्या शिरोभागाचे बांधकाम व विभागांचे कास्टिंग यांचा समावेश आहे, ते सध्या प्रगतीपथावर आहेत. या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये एकूण २५ नदी पूल आहेत, यापैकी २१ गुजरातमध्ये आणि ४ महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी १६ पूल पूर्ण झाले आहेत.