मुंबई : “भाजप सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करणारा पक्ष आहे. ही परंपरा आजही आम्ही कायम ठेवली आहे. आपल्या कार्यकत्यांमधूनच एक धडाडीचा नेता प्रदेशाध्यक्षपदी आला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिक वेगाने विस्तारेल,”असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १ जुलै रोजी व्यक्त केला.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या राज्य परिषद अधिवेशनात केंद्रीय मंत्री आणि निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. चव्हाण हे भाजपचे १२वे प्रदेशाध्यक्ष ठरले. यावेळी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे केंद्रीय महामंत्री आणि निवडणूक पर्यवेक्षक अरुण सिंह, अखिल भारतीय महामंत्री विनोद तावडे, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आ. सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पंकजा मुंडे, खा. नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आज अनेकांनी भावना व्यक्त केली की, भाजपचा एक अध्यक्ष कोकणातून यावा. ती अपेक्षा आज पूर्ण झाली आहे. चव्हाण यांच्यात जिद्द, चिकाटी, आणि संघटन कौशल्य आहे. २४ तास, सातही दिवस त्यांच्या मनात भाजप असतो. दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याची त्यांची हातोटी आहे. भाजपचा कार्यकर्ता चहावाला असो वा पदाधिकारी, पक्ष त्यांना संधी देतो, हे उदाहरण देताना फडणवीस म्हणाले, “आजवरचे भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातून आलेले आहेत. त्यात कोणीही रक्ताचा नातेवाईक नाही. आमचं नातं हिंदुत्वाचं आणि भारतीयत्वाचं आहे. अन्य पक्षांमध्ये घराणेशाहीतून अध्यक्ष निवडले जातात; आमच्यात कार्यकर्ते उभे राहतात”, असे फडणवीस यांनी नमूद केले.
या वेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव करत फडणवीस म्हणाले, “बावनकुळे यांनी पक्षात दीड कोटी सदस्यांची भर घातली. त्यांच्या नेतृत्वात 'फेक नरेटिव्ह'ला थेट उत्तर देऊन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत यश मिळवलं.” राज्याच्या आगामी राजकारणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला विकसित राज्यांच्या यादीत नेऊन ठेवायचं आहे. मात्र फेक नरेटिव्हची फॅक्टरी अजून बंद झालेली नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट पुन्हा होईल, असे भाषण सुरू होतील. पण मी स्पष्ट सांगतो, कोणाच्याही बापात ती हिंमत नाही!”
त्रिभाषा धोरणाबाबत टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, “निवडणुकीत यांना मराठी माणूस आठवतो, मराठीचे प्रेम उफाळते. खरेतर त्रिभाषा सूत्र उद्धव ठाकरे यांनीच मान्य केलं आणि कॅबिनेट मिटिंगमध्ये सहीही केली. आम्ही कोणतीही तिसरी भाषा सक्तीने शिकवणार नाही. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची आहे. आम्हाला हिंदी आणि भारतामधील प्रत्येक भाषेचा अभिमान आहे. हिंदीला विरोध करून आम्ही इंग्रजीला पायघड्या घालणारे नाही. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण करणारे आम्ही आहोत", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष - नितीन गडकरी
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, जिथे सामान्य कार्यकर्ता देखील सर्वोच्च स्थानावर काम करू शकतो. मी अध्यक्ष असताना रविंद्र चव्हाण डोंबिवलीत ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते, तर मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षात येण्यापूर्वी रिक्षा चालक होते. हा आजी-माजी अध्यक्षांमधील अनोखा योगायोग आहे. भाजप कोणाच्या सहानुभूती किंवा आशीर्वादाने मोठा झालेला नाही, तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने वाढलेला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केला आहे. या संकल्पाला रविंद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक नेतृत्वातून बळ मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
चव्हाण यांचा स्वभाव कार्यकर्ते जोडणारा - किरेन रिजिजू
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा आणि अटलजींच्या सरकारमध्ये खादी विभागाची जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्राशी त्यांचे जवळचे नाते निर्माण झाल्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रातून बरेच काही शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवणारे काँग्रेसला मतदान करणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ वर्षांनंतर बौद्ध विचारसरणीच्या व्यक्तीला कायदा मंत्री बनवल्याचे सांगत, रविंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या संविधानानुसार झालेल्या नियुक्तीची घोषणा केली. रिजिजू यांनी चव्हाण यांच्या साध्या कार्यकर्ता स्वभावाचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक चांगले कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होणे, केवळ भाजपमध्ये शक्य - रविंद्र चव्हाण
- "यापुढे ‘रवी दादा’ किंवा ‘रविंद्र चव्हाण आगे बढो’ नाही, तर ‘भाजप आगे बढो’ हीच घोषणा असावी," असे रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले. "पक्षाने मला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देऊन उपकार केले. माझी खरी ओळख ही भाजपच आहे. २००२ मध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू केलेला प्रवास आज या उंचीवर पोहोचला, याचा मला अभिमान आहे. एक सामान्य कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे. काहीजण मला वेडा म्हणतात. होय, मी वेडा आहे! पक्षासाठी काहीही करायला तयार असलेला वेडा!"
- "सर्वसामान्य नागरिकांना फक्त भाजप कार्यकर्त्यांकडूनच अपेक्षा आहेत, कारण त्यांचा विश्वास आपल्यावर आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाला नवी उंची दिली, त्यामुळे माझी जबाबदारी आता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. २०२९ चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करावेत, अशी मी विनंती करतो. तुमच्या साथीने हे उद्दिष्ट नक्की गाठू. मी शब्द देतो, महाराष्ट्रातील कार्यकर्ता थकणार नाही, थांबणार नाही. येत्या काळात भाजपला सशक्त करण्यासाठी माझा प्रत्येक क्षण अर्पण असेल!", अशी ग्वाही नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे झाले भावुक
रविंद्र चव्हाण हे रामभक्त, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चा स्वयंसेवक आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी दमदार कामगिरी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्यानंतर त्यांनी उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला. भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सुरुवातीला मलाही भीती वाटली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावर या पदाची प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा जाणवली. भाजप हा एक परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. चुका झाल्या तेव्हा फडणवीस यांनी नेहमी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दीड कोटी सदस्यसंख्या असलेली भक्कम संघटना उभी केली. हे यश सर्व कार्यकर्त्यांचे आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. २०२४ हे नेत्यांचे वर्ष होते, तर २०२५ हे कार्यकर्त्यांचे वर्ष आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा फडकवून विकसित महाराष्ट्राला बळ देऊया! आज माझ्या आईचे पुण्य स्मरण. मी आईला फार वेळ देऊ शकलो नाही. पण माझ्यासाठी आई म्हणजे पक्ष. त्यामुळे हात जोडून विनंती करतो, माझ्या काही चुका झाल्या असतील तर राज्यातील तमाम कार्यकर्त्यांनी माफ करावे, असे भावुक उद्गार मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
रविंद्र चव्हाण विरोधकांना पुरून उरतील - आशिष शेलार
चंद्रशेखर बावनकुळे, मातीतील रांगडा पहेलवान! सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला खंबीर आधार दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत दमदार यश मिळवले. रवींद्र चव्हाण आता अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. चंद्रशेखरापासून रवींद्रापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. आता लढाई सूर्याशी आहे, हा सूर्य रोज तळपेल, महाराष्ट्रभर सोनेरी किरणे पसरवेल. उबाठा, काँग्रेस, शरद पवार आणि शिवतीर्थ... विरोधकांच्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्ररूपी सूर्य भस्म करेल. वैयक्तिकरित्या बारावे आणि क्रमाने तेरावे असलेले आमचे नवे अध्यक्ष, विरोधी पक्षाचे बारावे आणि तेरावे घालतील, अशा शब्दांत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वागत केले.