मुंबई : उबाठा गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच उबाठा गटात भूकंप येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
सोमवार, २ जून रोजी सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर मी पक्षात नाराज असल्याचे त्यांनी स्वत: कबुलही केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, "शहरातील प्रश्न स्थानिक पातळीवर सुटले नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवावे लागतात. ती जबाबदारी मी काल पार पाडली आहे. नाशिक कामगार सेनेचा मी अध्यक्ष असून त्यात २७०० कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेत ३ हजार ६०९ जागा रिक्त आहेत. सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे. त्यासाठीचे नियोजन व्हावे आणि नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर तणाव येऊ नये या भावनेने मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो."
पक्षातील १० ते १२ जण नाराज!
ते पुढे म्हणाले की, "पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून मीच नाही तर संघटनेतील कमीत कमीत १० ते १२ लोक नाराज आहेत आणि मी ते वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर टाकले आहे. तेव्हापासून अस्वस्थता आहे. त्यात सुधारणा करावी अशीही मागणी झाली. परंतू, अजून काही निर्णय झाला नसल्याने नाराजी आहे. संजय राऊत साहेब कुटुंबातील नेते आहेत. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्याबद्दल नाराजी नाही. पण संघटनात्मक बदल करताना काही गोष्टींना विश्वासात घ्यायला हवे होते. परंतू, तसे झाले नाही. त्यामुळे विलास शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहे. महानगरप्रमुख म्हणून काम करताना त्यांना वरीष्ठ पद मिळावे, अशी अपेक्षा असताना ते मिळाले नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. माझी नाराजी कुणावर नसून मी स्व:त नाराज आहे. पुढचा निर्णय काय घ्यायचा याबाबत अजून कोणतीही भूमिका नाही. येणारा काळच त्याबद्दल सांगेल," असे सूचक विधानही सुधाकर बडगुजर यांनी केले आहे.