भाजपचा नवा विक्रम! महारक्तदान संकल्पाद्वारे विक्रमी रक्तदान; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

    23-Jul-2025
Total Views |


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यभरात राबवण्यात आलेल्या 'महारक्तदान संकल्प' या उपक्रमाद्वारे रक्तदानाचा विक्रम केला आहे. या विक्रमी उपक्रमाची नोंद मानाच्या 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये घेण्यात आली आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे वरिष्ठ परीक्षक संजय भोला आणि सीमा मनीकोट यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश ठाकूर, प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री रवि अनासपुरे आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी महारक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला होता. राज्यातील १ हजार ८८ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 'महारक्तदान संकल्प' उपक्रमात एकूण ७८ हजार ३१३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. एकाच दिवशी सर्वाधिक ठिकाणी राबवण्यात आलेले रक्तदान शिबीर आणि एकाच दिवशी सर्वाधिक रक्त संकलित करणे असे दोन्ही विक्रम या एकाच उपक्रमातून रचले आहेत.