यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर!

    23-Jul-2025   
Total Views |

मुंबई : (Nitin Gadkari To Be Honoured With Lokmanya Tilak National Award) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ सालचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाईल. लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी नितीन गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले, असे डॉ. रोहित टिळक म्हणाले. सार्वजनिक - खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत नितीन गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही, ही गडकरींची भूमिका महत्त्वाची असल्याचेही डॉ. टिळक यांनी अधोरेखित केले.

यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत. 




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\